computer

फक्त सात आठवड्यांत आठ सौद्यांतून रिलायन्सला ९७८८५.६५ कोटी मिळवून देणारा इन्व्हेस्टमेंट गेम नक्की आहे तरी काय?

काही दिवसांपूर्वीच 'बोभाटा'ने प्रकाशित केलेला "रिलायन्सने नक्की काय गेम करून मंदीत चांदी केली?" हा लेख वाचला असेलच. त्यानंतर काहीच दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीचा राइट्स इश्यू आला आणि तुडुंब भरला. राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीला ५३१२४ कोटी उभे करायचे होते आणि प्रत्यक्षात ८४००० कोटी रुपयांचे अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत जमा झाल्याची नोंद आहे.  पण आजच्या लेखाचा विषय त्या ८४००० कोटी रुपयांचा नाही. आज आम्ही रिलायन्सच्या अत्यंत हुशारीने खेळलेल्या 'इन्व्हेस्टमेंट गेम' बद्द्ल लिहितो आहोत. पण ते समजून घेण्यापूर्वी काही प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. अर्थातच या प्रश्नांची तर्कशुध्द उत्तरे 'बोभाटा' देणार आहे. 

रिलायन्सला इतक्या मोठ्या भांडवलाची गरज आहे का?

होय, रिलायन्सला मार्च २०२१ पर्यंत 'कर्जमुक्त कंपनी' व्हायचं आहे. हे 'शून्यकर्ज' (Zero Debt) स्टेटस मिळवण्यासाठी रिलायन्स त्यांचे २० टक्के भागभांडवल सौदी अ‍ॅरामॅको या कंपनीला विकणार होती. पण याच दरम्यान तेलाचे भाव घसरले, डिसेंबर २०१९ मध्ये भारत सरकारने हा सौदा मंजूर नसल्याचं कळवत थेट कोर्टात धाव घेतली आणि इथेच सौदी अ‍ॅरॅमॅकोवाला Plan-A फसला. फसला तर फसला. रिलायन्सकडे Plan-B तयार होताच. त्यानंतर Plan-B प्रमाणे जिओमधील भागभांडवल विकण्याचा मनसुबा समोर आला आणि काही दिवसांतच फेसबुकने जिओमध्ये पैसे गुंतवले. 

यादरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव ५० टक्क्याने घटून नंतर १०० टक्के वाढला होता. इथे गेम संपला असं सगळ्यांनाच वाटलं. पण हा तर फक्त 'हाफ टाइम' ब्रेक होता हे आता सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. आज हा लेख लिहिताना रिलायन्सच्या शेअरचा भाव रु. १५८४ आहे.

आता हे ९७८८५.६५ कोटी आले कसे?

हा प्रश्न बोभाटाच्या वाचकांना नक्कीच पडला असेल. तर त्याचं असं आहे पाहा..  Plan-B मध्ये फेसबुकपर्यंतची स्टोरी २२ एप्रिलपर्यंतची आहे. त्यानंतर ३ मे ते ७ जूनपर्यंत म्हणजे काल-परवापर्यंत आणखी ७ सौदे करून कमीतकमी वेळात विक्रमी भांडवल जमा करण्याचा विक्रम रिलायन्सने  केला आहे. आपण या कंपन्या आणि त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर एक नजर टाकूया! 

  1.  सिल्व्हर लेक-(१)५६५६
  2.  व्हिस्टा- ११३६७
  3. जनरल अ‍ॅटलांटिक-६५९८ 
  4. केकेआर-११३६७
  5.  मुबादला-९०९३
  6. सिल्व्हरलेक (२)-४५४७
  7. अबू धाबी इनव्हेस्टमेंट ऑथॉरीटी -५६८३.५ 


एकूण ५४३११.५ कोटी रुपये

आता यामध्ये फेसबुकचे ४३५७४ कोटी जोडले, तर त्याचा अर्थ असा होतो की रिलायन्सने फक्त सात आठवड्यांत आठ सौद्यांतून ९७८८५.६५ कोटी रुपये जमा केले!

हे इतके पैसे आल्यावर ५३१२४ कोटीच्या राइट्स इश्यूची काय गरज होती?

१) येत्या काळात रिलायन्सचे अनेक मोठे इंस्टिट्युशनल स्टेक होल्डर्स म्हणजे समभागातील संस्थात्मक भागीदार असतील. उदाहरणार्थ, जेव्हा सौदी-अ‍ॅरॅमॅकोला २० टक्के हिस्सा देण्याची वेळ येईल तेव्हा मूळ प्रवर्तकांचे समभागातील मालकी हक्क आहेत त्याच प्रमाणात ठेवण्याची गरज असेल.

२) वर उल्लेख केले सर्व गुंतवणूकदार फक्त जिओचे भागीदार आहेत. रिलायन्स कंपनीचे नाहीत. जिओमधील २१ टक्के समभाग(शेअर्स) बाहेर गेल्यावर वरचष्मा राखण्यासाठी मूळ कंपनीतही पुरेसे समभाग असायला हवेत.

३) ५३१२४ कोटी रुपयांच्या राइट्स इश्यूसाठी ८४००० कोटी रुपयांचे अर्ज आलेले आहेत. या नव्या भागभांडवलाचे फक्त १/४ पैसे आता घेण्यात आलेले आहेत. उर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने येणार आहे. या समभागांचे लिस्टींग वेगळे होईल अशी आशा आहे. थोडक्यात १/४ पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना लाभांश वगळता बाकीचे सर्व फायदे इतर भागधारकांइतकेच मिळणार आहेत. 

४) पुढच्या काही वर्षांत, कदाचित डिसेंबर २०२१च्या आसपास जिओ ही स्वतंत्र कंपनी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज ही स्वतंत्र कंपनी असेल.

५ )जिओचे फक्त सॉफ्ट अ‍ॅसेट बाजूला झाले की हार्ड अ‍ॅसेट म्हणजे प्लँट-मशिनरी-बिल्डींग फक्त रिलायन्सच्याच हातात राहील. 
थोडक्यात, आपण जेव्हा २०२० या वर्षाचा विचार करतो आहे तेव्हा रिलायन्स २०३०चा विचार करते आहे.

फक्त सॉफ्ट अ‍ॅसेटच आपल्या वाट्याला येणार आहेत हे उमजूनही या कंपन्या जिओमध्ये का गुंतवणूक करत आहेत?

प्रत्येक कंपनीचा गुंतवणूकविषयक दृष्टिकोन वेगवेगळा असतो. 

१. फेसबुक-जिओच्या वापरकर्त्यांच्या संख्येकडे बघून गुंतवणूक करते आहे. हे वापरकर्ते ग्राहक ही आहेत. फेसबुकची 'शॉप' या कन्सेप्टकडे जी वाटचाल चालू आहे त्यासाठी त्यांना जिओ आवश्यक आहे.

२. मुबादला- सौदी अरेबियाच्या कच्च्या तेलाच्या व्यापातून येणारे पैसे आतापर्यंत ब्रिटिश आणि अमेरिकन कंपन्या करत होत्या. एक प्रकारे गुंतवणूक करणे हा परावलंबी व्यवसाय होता. आता मुबादला ही सौदी अरेबीयाचा Sovereign Wealth Fund आहे. ही सौदी अरेBईयाची नवी ओळख (New Identity)  आहे.

3. जनरल अ‍ॅटलांटीक यांचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. या कंपनीचे लक्ष्य high-growth businesses कडे असते. जनरल अ‍ॅटलांटीक ही दीर्घ मुदतीचे पर्याय शोधत असते कारण कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचे सर्वस्व जनरल फिलाँथ्रॉपीक या परोपकारी संस्थेला देऊन टाकले आहेत.

४. केकेआर ही कंपनी अनेक मोठ्या कंपन्यांना गुंतवणूकीचे सल्ले देत असते. प्रायव्हेट इक्वीटी आणि मर्जर टेक ओव्हर या क्षेत्रात अग्रणी समजली जाणारी ही कंपनी आहे. जिओचा पब्लिक इश्यू आला तर कदाचित ही कंपनी नफा घेऊन बाहेर पडू शकते.

५. सिल्व्हर लेक  उगवत्या टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या व्यवसायात आहे. उदाहरणार्थ - सिल्वरलेकने या आधी अलिबाबा, एअर बीएनबी,  ट्वीटर  या टेक कंपन्यात गुंतवणूक केली आहे.

६. व्हिस्टा- ही कंपनी पण टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. 

७. अबू धाबी इनव्हेस्टमेंट कंपनीचा दृष्टिकोन पण दीर्घकालीन गुंतवणूक करण्याकडे असतो. 

 

या सगळ्या कंपन्यांचा दृष्टीकोन ??

या सगळ्या कंपन्यांचा दृष्टीकोन तपासला तर काही महत्वाच्या बाबी लक्षात येतात. बोभाटाच्या वाचकांसाठी आम्ही त्या इथे देत आहोत.

१. केकेआरचा अपवाद वगळता सर्व कंपन्या कमीतकमी भविष्यातल्या दहा वर्षांचा विचार करत आहेत.

२. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि मुबादला या आखाती देशातल्या कंपन्यांना केवळ ऑइल रिफायनरी या क्षेत्रात गुंतवणूक न करता इतर क्षेत्रात प्रवेश करायचा आहे.
कच्च्या तेलाचा साठा आज नाही तर उद्या घटणार आहे हे भविष्य त्यांच्या नजरेसमोर आहे. Data is next oil हे त्यांना दिसते आहे.

३. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि मुबादला यांचा कल गुंतवणूकीसोबत भौगोलिक जवळीकेशी (जिओग्राफीकल प्रॉक्सिमीटी) जोडला गेला आहे. त्यांना युरोप आणि अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही आहे.

४. सिल्व्हर लेक आणि व्हिस्टा यांचा निर्णय नव्या उगवत्या टेक मार्केटमध्ये गुंतवणूक या मुद्द्यावरच आहे. त्यांच्या दृष्टीने भारत येत्या दहा वर्षात टेक मार्केटचे मोठे ग्राहक आणि विकासक असेल याबद्दल खात्री आहे.

५. यापैकी कोणतीही कंपनी एफआयआय वर्गवारीत मोडत नाही. याचाच अर्थ असा की ही गुंतवणूक अनेक वर्षांचा पल्ला लक्षात घेऊन केली आहे.

हे सर्व बोभाटाच्या वाचकांनी का वाचावे ?

ज्यांना पुढच्या दहा वर्षांचा भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करायची आहे त्यांच्या दृष्टीने जिओ हे गुंतवणूकीची सुवर्णसंधी आहे. पण सध्या तरी जिओत थेट गुंतवणूक करता येत नाही तर त्यावर उपाय काय? 

१. ज्यांच्याकडे रिलायन्सचे समभाग आहेत त्यांनी ते विकू नयेत.

२. ज्यांच्याकडे मोठी गुंतवणूक करण्यासाठी बजेट आहे, त्यांनी रिलायन्सचे शेअर घेऊन ठेवावेत.

३. ज्यांच्याकडे छोटे बजेट आहे त्यांनी रिलायन्सचे पार्टली पेड शेअर लिस्टींग झाले तर घेऊन ठेवावेत. त्यांची किंमत कमी असेल त्यामुळे आठवड्याला एक दोन शेअर अशी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. (पार्टली पेड शेअर लिस्टींग झाले तर )

वि.सू. - हे बोभाटाचे निरिक्षण आहे. गुंतवणूक करण्याचा निर्णय योग्य अर्थविषयक सल्लागाराला विचारूनच घ्यावा.

सबस्क्राईब करा

* indicates required