computer

लंडन-भारत-सिंगापूर ते थेट ऑस्ट्रेलियापर्यंत असलेल्या ११ देश ओलांडणाऱ्या ओव्हरलँड बससेवेची गोष्ट!! ती केव्हा आणि का बंद पडली?

आपण आयुष्यात कधी ना कधी हा विचार करतोच की पासपोर्ट व्हिसाची कटकट नसती तर मी हवं तसं, हवं तेव्हा आणि हवं तिथं जगभर भटकलो असतो. हे आजच्या काळात अशक्य आहे. पण ७० च्या दशकापूर्वी हे तितकंसं कठीण नव्हतं. लंडन ते भारत आणि भारतातून पुढे सिंगापूर ते थेट ऑस्ट्रेलियापर्यंत बसने प्रवास शक्य होता.

या गोष्टीवर विश्वास बसणं थोडं अवघड आहे. कारण लंडन ते कलकत्ता (त्यावेळचं कलकत्ता आणि आजचं कोलकाता) या दोन शहरांत जवळजवळ ११ देशांचं अंतर आहे. याबद्दल माहिती शोधली असता समजलं की अशी बस सेवा त्याकाळी खरंच अस्तित्वात होती. हा एवढा मोठा प्रवास कसा शक्य होता आणि तो कसा चालायचा, या प्रवासाला सुरुवात कुठून झाली आणि त्याचा अंत कसा झाला या सर्व मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत.

ही बससेवा कधी सुरु झाली?

या प्रवासाला म्हणतात ओव्हरलँड (overland) ट्रॅव्हल, म्हणजे देशाच्या सीमा ओलांडून केला जाणारा प्रवास. अशा प्रकारची पहिली बस सेवा ‘इंडियामॅन’ कंपनीने १९५७ साली सुरु केली होती. त्यानंतर स्वॅगमन टूर्स कंपनीनेही आपली बस सेवा सुरु केली. पुढे प्रवाशांची संख्या आणि प्रसिद्धी वाढलेली बघून इतर कंपन्या या व्यवसायात उतरल्या. यातलं एक प्रसिद्ध नाव होतं ‘अल्बर्ट टूर्स’.

पण पुढे जाण्यापूर्वी ‘इंडियामॅन’ कंपनी आणि तिच्या जन्माविषयी वाचूया.

इंडियामॅनची कल्पना पॅडी गॅरो-फिशर या व्यावसायिकाच्या डोक्यातून निघाली होती. पॅडी गॅरो-फिशर हा मुळचा डब्लिनचा. त्याने युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये (RAF) काम केलं होतं. त्याच्या नशिबाने तो RAF मध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्याची बदली आशिया आणि मध्यपूर्वेत झाली. याच दरम्यान त्याचा भारताशी संपर्क आला. तो भारताच्या प्रेमातच पडला. त्याने हिंदी आणि फारसी शिकून घेतली. युद्ध संपल्यानंतर त्याने भारताशी संपर्क तोडला नाही. महायुद्धानंतर तो इंजिन पार्टस विकण्याच्या व्यवसायात उतरला. सेल्समन म्हणून तो युकेपासून भारतापर्यंत मोटारबाईकवर प्रवास करायचा. त्याच्या मोटारबाईकचा फोटो पाहा.

त्याचा व्यवसाय वाढला तसं त्याच्या लक्षात आलं की मोटारबाईक आपल्या कामासाठी पुरेशी नाही. आधी त्याने कारवन(caravan) विकत घेण्याचा विचार केला. कारवनमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते शिवाय आत संपूर्ण घरासारखं वातावरण असतं. हा विचार लवकरच निकालात निघाला. यानंतर त्याला बसची कल्पना सुचली. त्याने बस विकत घेऊन तिच्यात आपल्या कामासाठी हवे तसे बदल करून साजेसं रूप द्यायचं ठरवलं. पण नंतर त्याने विचार केला की यापेक्षा बस बससारखीच ठेवून आपण वाटेत भेटणाऱ्या लोकांना सोबत घेऊन प्रवास करू शकतो. या प्रवाशांकडून भाडं आकारता येईल आणि आपलंही काम होईल. अशा प्रकारे ‘इंडियामॅन’चा जन्म झाला.

त्यांनी प्रवासासाठी बसची निवड काळजीपूर्वक केली होती. त्या काळातल्या प्रसिद्ध असोसिएटेड इक्विपमेंट कंपनी (AEC) च्या बसची निवड करण्यात आली. निवडलेल्या बसने आधीच प्रचंड प्रवास केला होता त्यामुळे ती ११ देश ओलांडायला योग्य होती. १९५७ साली पहिल्यांदा इंडियामॅनची बस लंडन ते कलकत्ता धावली. चालक होते अर्थातच पॅडी गॅरो-फिशर. त्याकाळी प्रत्येक प्रवाशाकडून ८० पाउंड्स इतकं भाडं घेण्यात आलं होतं. आजच्या भारतीय चलनाप्रमाणे  जवळजवळ ८,००० रुपये. फ्रान्स, इटली, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्की, इराण आणि पाकिस्तान या देशांना ओलांडून बस कलकत्ता येथे थांबली. पुढच्या काळात जेव्हा प्रवाशांची संख्या वाढली तेव्हा पॅडी गॅरो-फिशर यांनी आपल्या बस सर्व्हिसमध्ये बदल केले. शरद ऋतूत पूर्वेकडील प्रवास तर वसंत ऋतूत पश्चिमेकडचा प्रवास असा नवीन नियम सुरु झाला. कलकत्त्यासोबतच लंडन ते मुंबई आणि मुंबई असाही प्रवास  इंडियामॅन’ने केला होता.

अल्बर्ट टूर्स सोबतचा आरामदायी प्रवास

इंडियामॅनने श्रीगणेशा केल्यानंतर ज्या नवीन कंपन्या या व्यवसायात उतरल्या त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रलोभनं दिली. यातली एक कंपनी होती अल्बर्ट टूर्स.

अल्बर्ट टूर्सची सुरुवात ६० च्या दशकात झाली. ही बस डबल डेकर होती. बसमध्ये एकाच जागी बसून कंबरडं मोडू नये म्हणून त्यांनी बसमध्ये प्रवाशांना फिरता येईल याची व्यवस्था केली होती. जेवणाखाण्याची आणि झोपण्याची चोख काळजी घेण्यात आली होती. प्रवासात गाणी ऐकण्याची सोय होती. आरामासाठी पंखा आणि हिटर होता. अल्बर्ट टूर्सच्या भाषेत म्हणायचं झालं तर Your Complete Home While You Travel.

आता या सगळ्या सोयी मिळणार म्हणजे पैसेही तेवढेच मोजावे लागणार. अल्बर्ट टूर्सचा एकूण खर्च होता १४५ पाऊंड! म्हणजे आजच्या भारतीय चलनाप्रमाणे १३,५०० रुपये. एका माहितीनुसार या संपूर्ण प्रवासाला ४९ दिवसांचा कालावधी लागायचा. वरती दिलेल्या जाहिरातीप्रमाणे बसचा प्रवास १५ जुलै १९७२ दिवशी सुरु होणार, तर ११ सप्टेंबर १९७२ पर्यंत कलकत्त्यात संपणार होता. अल्बर्ट टूर्सची ही बस भारताच्या पुढे थायलंड, मलाया ते पुढे ऑस्ट्रेलियापर्यंत जायची. असं म्हणतात की अल्बर्ट टूर्सने युके आणि भारतामध्ये १५ फेऱ्या मारल्या, तर लंडन ते सिडनीपर्यंत ४ फेऱ्या मारल्या होत्या.

ओव्हरलँड प्रवासाची सुरुवात आणि त्याचा शेवट!!

त्याकाळी ओव्हरलँड प्रवासाला हिप्पी ट्रेल म्हटलं जायचं. पश्चिमेकडच्या देशांमध्ये भारत आणि आशिया खंडाबद्द्ल प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारख्या विद्यापीठांनी पूर्वेकडच्या मोहिमांबद्दल प्रकाशित केलेल्या पुस्तकांमुळे, डेव्हिड ॲटनबरोसारख्या त्याकाळी तरुण असलेल्या अभ्यासकांनी तयार केलेल्या टीव्हीवरील डॉक्युमेंटरीजमुळे आणि A Short Walk in the Hindu Kush सारख्या साहसी पुस्तकांमुळे पूर्वेभोवती एक गूढ वलय निर्माण झालं होतं. १९६८ साली युकेच्या प्रसिद्ध बीटल्स नावाच्या रॉक बँडने भारताला भेट दिल्यानंतर एका अर्थी भारताची जाहिरातच झाली. वेगवेगळी ठिकाणं पाहण्यासाठी, जगाचा अनुभव घेण्यासाठी, घरापासून दूर जाण्यासाठी, आणि प्रवासाचं, साहसी कृत्याचं, आणि हशीश (अमलीपदार्थ) यांच्या आकर्षणामुळे ओव्हरलँड प्रवासाला मोठी गती मिळाली.

त्याकाळी तर केस वाढवून फिरणाऱ्या प्रत्येकालाच हिप्पी म्हणण्याची पद्धत रूढ झाली होती. यात फक्त युरोपियन नव्हते तर अमेरिका, कॅनडा, न्यूझिलंड असे झाडून सगळेच मिळेल त्या मार्गाने पूर्वेकडे जात होते. १९५७ नंतर याचा फायदा घेऊन अनेक ओव्हरलँड बस सर्व्हिसेस सुरु झाल्या. कमी पैशांचं आकर्षण दाखवून या बस कंपन्या हिप्पींना पूर्वेकडे न्यायच्या. यातल्या बऱ्याचशा कंपन्या खोट्या निघाल्या. बरेचशा बसेस कधीच पूर्वेकडे पोहोचू शकल्या नाहीत. पण काही इंडियामॅनसारख्या कंपन्याही होत्या ज्यांनी हे यशस्वीपणे करून दाखवलं.

मग असं काय घडलं की आज ही बस सेवा बंद पडलेली आहे?

ओव्हरलँड बसचा प्रवास १९७९ च्या जवळपास थांबला. मुख्य कारण होतं राजकीय अस्थिरता. ज्या इराण आणि अफगाणिस्तान मार्गे हा प्रवास चालायचा तिथे खळबळ माजली होती. इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडली होती तर अफगाणिस्तानमध्ये रशियाने तळ ठोकला होता. या दोन्ही देशांचे दरवाजे बंद झाल्यानंतर ओव्हरलँड ट्रॅव्हलचा मार्ग अवघड झाला. याखेरीज त्याच काळापासून विमानाचं तिकीट स्वस्त होऊ लागलं होतं आणि गोवा हे हिप्पींचं मुख्य ठिकाण बनलं. आपल्याकडचा दम मारो दम आठवतोय का?

तर, अशा प्रकारे २० व्या शतकाच्या जवळपास हिप्पी ट्रेल्समधून सुरु झालेला प्रवास बस सर्व्हिसच्या माध्यमातून १९५७ला चालू होऊन १९८० च्या सुरुवातीला संपला. २०१२ साली आलेल्या बातमीनुसार बर्मिंगहॅम ते पाकिस्तानातल्या काश्मीर भागाला जोडणारी बससेवा सुरु होणार आहे. हा जवळजवळ ४,७०० किलोमीटरचा प्रवास असेल आणि हे अंतर पार करायला १२ दिवस लागतील. याबद्दल पुढे काहीच बातमी आली नाही.

एकूण सध्याची परिस्थिती पाहता ओव्हरलँड प्रवास अशक्य वाटत आहे, पण समजा सर्व समस्यांवर मात करून बस सेवा सुरु झालीच तर तुम्ही प्रवास करणार का? आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required