computer

राजा ते रंक!! नोकियाचा हा रोचक प्रवास तुम्हाला माहीत असायलाच हवा!!

नोकिया म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर तुमचा पहिला-वहिला कीपॅडवाला फोन नक्की येत असेल. त्याहून आधीचा हातोड्यासारखा फोनही नक्कीच आठवत असेल. नोकिया कंपनीच्या मोबाईल फोन्सची एकेकाळी बाजारात चांगलीच धूम चालली होती. मोबाईल फोनमधील या भल्यामोठ्या कंपनीचं आज स्मार्टफोनच्या युगात कुठे नावही दिसत नाही. आज नोकियाची आठवण अनेकांना येत असेल, पण स्मार्ट फोनच्या स्पर्धेत नोकिया टिकू शकला नाही हे सत्य पचवणे तसे कठीणच. नोकियाच्या सुरुवातीपासून त्याच्या शेवटाची ही कथा खास तुमच्यासाठी!

१९६७ साली नोकिया कंपनीचे काम सुरु झाले. नोकिया कार्पोरेशनचा जन्म होण्याआधी ही कंपनी तीन भागांत विभागलेली होती. याची सुरुवात खरे तर तेव्हापासून होते जेव्हा नोकिया या शब्दाचा जन्मही झाला नव्हता. आज नोकिया म्हणजे फोन हे समीकरण इतके दृढ झाले आहे की अगदी सुरुवातीला नोकिया हा एक कागद कारखाना होता हे कुणाला सांगूनही पटणार नाही. १८६५ मध्ये फ्रेड्रिक आयडेस्टॅम यांनी फिनलंडमध्ये या कंपनीची स्थापना केली. १८७१ साली फ्रेड्रिक यांनी आपल्या या कागद कारखान्याची दुसरी शाखा नोकियान्विर्टा नदीच्या काठावर स्थापन केली आणि या नदीच्या नावावरून त्यांनी आपल्या उद्योगाला नोकिया हे नाव दिले. नोकिया हे कंपनीचे नामाभिधान झाले आणि सुरुवातीला तरी कंपनी इलेक्ट्रिक क्षेत्रातच काम करेल असे ठरले.

याच दरम्यान १८९८ मध्ये एड्युराड पोलन यांनी फिनिश रबर वर्क्सची स्थापना केली आणि ॲर्विड विकिस्टॉर्म यांनी १९१२ मध्ये फिनिश केबलवर्क्सची स्थापना केली. त्यानंतर १९२२ मध्ये फिनिश केबल वर्क्स आणि फिनिश रबर वर्क्स यादोन्ही कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी हायड्रोपॉवर रिसोर्सेस मिळवण्यासाठी नोकियाही ताब्यात घेतले. तिन्ही कंपन्या एका छताखाली आल्या असल्या तरी १९६७ पर्यंत यांचे काम स्वतंत्ररित्याच सुरु होते. १९६७ साली तिन्ही कंपन्या एकत्र विलीन करून नोकिया कार्पोरेशन ही नवी कंपनी जन्माला आली. सुरुवातीला तरी या कंपनीचे लक्ष्य हे फक्त पेपर, इलेक्ट्रॉनिक्स, रबर आणि केबलवरच केंद्रित होते. त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत कंपनीने चॉयलेट पेपर, सायकल आणि कारचे टायर्स, रबरच्या चप्पल, टीव्ही, संदेशवाहक तारा, रोबोटिक्स, कम्प्युटर, सैन्यदलाला लागणारी साधने अशा काही वस्तूंचे उत्पादन सुरु केले.

१९७९ मध्ये नोकियाने स्कँडिनाव्हियन या टीव्ही उत्पादन करणाऱ्या कंपनीसोबत मिळून मोबिल ओय नावाची रेडीओ टेलिफोन कंपनी सुरु केली. त्यानंतर नोकियाने पहिला सेल्युलर सिस्टीम असणारा नॉर्डिक मोबाईल फोन बाजारात आणला जो फक्त स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे आणि फिनलंड याच देशात उपलब्ध होता. यानंतर नोकियाने मोबिल सिनॅटोर नावाचा पहिला कार फोन लॉंच केला, हा फोन जवळपास दहा किलो इतक्या वजनाचा होता.

त्यानंतर कारमध्ये आणि कारच्या बाहेरही वापरता येईल असा मोबाईल टॉकमन नावाचा नवा फोन नोकियाने आणला. या फोनचे वजन पाच किलोपर्यंत होते.

यानंतर तीन वर्षांनी कंपनीने पहिला कॉम्पॅक्ट फोन मोबिरा सिटीमन 900 आणला. हा जगातील पहिला असा मोबाईल होता जो हातात धरून वापरता येत होता. याचे वजन होते फक्त ८०० ग्रॅम आणि याची किंमत होती ५,४५६डॉलर्स. तरीही लोकांच्या अक्षरश: या फोनवर उड्या पडल्या होत्या. १९८७ साली सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बोचेव्ह यांनी हेलसिंकीतून मास्कोला संपर्क करण्यासाठी या फोनचा वापर केला होता. तेव्हा या फोनला गोर्बा असे टोपण नाव मिळाले होते.

यांनतरचे एक वर्ष मात्र कंपनीसाठी खूपच खडतर होते. ज्या फोनवर लोकांच्या उड्या पडत होत्या ती कंपनी एका वर्षासाठी तोट्यात गेली होती. हा तोटा सहन न झाल्याने नोकियाचे चेअरमन कैरी कैरामो यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर कंपनीला नवे नेतृत्व लाभले आणि कंपनीने आणखी सहा विभागात आपला विस्तार केला. १. टेलिकम्युनिकेशन, २. कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ३. केबल्स आणि मशिनरी, ४. डाटा, ५. मोबाईल फोन आणि ६. पायाभूत उद्योग. यासोबतच कंपनीचे जे बाकीचे तोट्यात जाणारे उद्योग होते ये कायमचे बंद करण्यात आले.
 

१९९० साली नोकियाने डाटा, पॉवर, टीव्ही, टायर, आणि केबल युनिट्स कायमचे बंद करून फक्त आणि फक्त मोबाईल फोनवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. यानंतर लगेचच १९९२ मध्ये कंपनीने नोकिया 1011 हा पहिला GSM फोन लॉंच केला. या फोन मध्ये फक्त ९९ कॉन्टॅक्ट्स सेव्ह करता येत होते. या फोनसोबत ९९ मिनिटांचा टॉकटाइम देखील मिळत होता.
त्यानंतरच्या दोन वर्षात नोकियाने 2100 सिरीज मधील फोन लॉंच केले. हाच तो पहिला फोन होता ज्यामध्ये नोकियाची आयकॉनिक रिंगटोन सेट करण्यात आली होती. नोकियाने ४,००,००० युनिट सेल करण्याचे ध्येय ठरवले होते मात्र हा फोन इतका हिट ठरला की, जगभरात याचे २ कोटी हँडसेट्स विकले गेले.

यानंतर १९९६ साली नोकिया 9000 कम्युनिकेटर आला. हा फोन फक्त ८००$ किमतीचा होता. या एकाच फोनमधून मेल, फॅक्स, वेब ब्राउजिंग, वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रीडशीट इतक्या सुविधा देण्यात आल्या होत्या. ऑल इन वन प्रकारचा हा पहिला फोन होता. याची किंमतही आवाक्यातील होती. तरीही या फोनला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्याच वर्षी नोकियाने नोकया 8110 स्लाइडर फोन आणला. या फोनला बनाना फोन असेही म्हटले गेले. यालाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीच्या नोकिया 6100 या फोनला मात्र इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की १९९८ मध्ये कंपनीने ४.१ कोटी इतके सेल्युलर फोन विकले होते. या फोनमुळे नोकियाने मोटोरोलालाही मागे टाकले आणि जगातील नंबर एकची सेल्युलर फो मेकर बनली. इथे हे नमूद केले पाहिजे की नोकिया 6110 हा पहिला फोन होता ज्यात नोकियाचा स्नेक गेम होता.

पुढच्याच वर्षी नोकिया फोन्सच विक्री ५०%नी वाढली. कंपनीचे भांडवल २१अब्ज डॉलर पासून ७० अब्ज डॉलरवर पोहोचले. १९९८ हे वर्षही नोकियासाठी खूपच लाभदायक ठरले. यावर्षी 8810 आला. हा अँटिना नसलेला पहिला फोन होता. पुढच्या वर्षी कंपनीने 3210 आणला. हे मॉडेल सहा रंगांत उपलब्ध होते विशेष म्हणजे या फोन सोबत ४ ते ५ तासांचा टॉकटाइमही मिळत होता.. शिवाय, या मोबाईलमध्ये एक्स्ट्रा रिंगटोन सेट करण्याचीही सोय होती. या फोनद्वारे वापरकर्ते टेक्स्ट मेसेजद्वारेच गुड मोर्निंग, हॅप्पी बर्थडेचे पिक्चर सेंड करू शकत होते. या मॉडेलचे १.६ अब्ज युनिट विकले गेले होते. या फोनने कंपनीला जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी बनवले.

त्यांनतर २०००चे नवे सहस्त्रक आणि नवे दशक उगवले आणि कंपनीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. वायरलेस आणि इंटरनेट तंत्रज्ञानाने कंपनीसमोर अनेक आव्हाने उभी केली. तरीही या बदलांना सामोरे जात कंपनीने २००१ साली नोकिया 7650 हा फोन लॉंच केला. यात इनबिल्ट कॅमेरा आणि फूल कलर डिस्प्लेची सोय होती. यानंतर नोकियाने नोकिया 6650 हा जगातील पहिला 3-G मोबाईल आणला.

२००२ मध्ये कंपनीने नोकिया 3650 आणला. यात व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा होती. २००३ मध्ये नोकियाने 1100 आणला. या फोननेही कंपनीला भरपूर नफा कमवून दिला. अगदी अब्जावधीच्या घरात या फोन्सची विक्री झाली. त्यानंतर २००३ मध्ये नोकियाने एन-गेज नावाचे नवे मॉडेल आणले. व्हिडिओ गेम सारख्या दिसणाऱ्या या फोनला लोकांची फारशी पसंती मिळाली आणि पुन्हा एकदा कंपनीचा विक्रमी विक्रीचा उच्चांक खाली कोसळला.

त्यानंतर नोकियाने लिपस्टिकच्या आकाराचा नोकिया 7280 लॉंच केला. फोर्च्युन मॅग्झीननेही या फोनची दखल घेतली. ॲपलने २००७ साली पहिला आयफोन लॉंच केला त्यावेळी नोकियाने देखील पहिला 5800 एक्स्प्रेस फोन लॉंच केला. यात कंपनीला थोडे फार यश मिळाले, पण पूर्वीच्या फोन इतका हा लोकप्रिय ठरला नाही.

२००१, २००७ आणि त्यानंतर सलग २००९ पर्यंत कंपनीला एकावर एक तोटे सहन करावे लागले. २००९ला तर कंपनीने जगभरातील आपल्या युनिट्समधून कामगारांची कपातही केली. बदलत्या तंत्रज्ञान युगाशी जुळवून न घेता आल्याने या कंपनीला हळूहळू बाजारातून गाशा गुंडाळावा लागला. तसे बाजरातून कंपनीचे नाव पूर्णतः पुसले गेले नसले तरी नोकियाची पूर्वी जी क्रेझ होती ती आता राहिलेली नाही हे कंपनीनेही मान्य केले आहे. बाजारपेठेतील बदलांना चटकन न स्वीकारल्याने कंपनीची ही अवस्था झाल्याचेही त्यांना मान्य आहे.

ॲपल, ब्लॅकबेरी, सॅमसंग अशा कंपन्यांनी नंतर बाजारपेठेवर जे वर्चस्व निर्माण केले ती जादू नोकीयाला जमली नाही हे मान्य करावे लागेल.

कधीकाळी मोबाईल क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणारी ही कंपनी आज पुन्हा एकदा मोबाईल क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी धडपडत आहे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required