एक छांदिष्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर सांगताहेत जंगलातल्या गमतीजमती…

पहाटेची नीरव शांतता, अंगाला झोंबणारा थंडगारवारा, मनात आज काय काय पाहायला मिळणार याची प्रचंड उत्सुकता आणि सोबत  माझा कॅमेरा घेऊन जंगल जागं  होत असतानाच जंगलात प्रवेश करणं ही माझी सर्वात आवडती  गोष्ट .


थोड्याच वेळात सूर्याची किरणं झाडां-पानातून प्रवेश करतात. पक्ष्यांची किलबिल सुरु होते,  पाणवठ्यावर गवतात हरणं, सांबर, बागडू लागतात आणि माकडं झाडावर बसून  टुकूटुकू पाहत कोवळ्या पानांचा फराळ करत असतात. मित्रांनो हे काही माझ्या कल्पनेत घडत नाहीय, तर  हे सगळं तुम्हीही प्रत्यक्ष पाहू शकता. निसर्गसौंदर्याने आणि  विविधतेने नटलेल्या  आपल्या देशात आणि परदेशांतही.

हे जंगलातलं जग भारी गंमतीदार असतं बरं...

कान्हाचं जंगल इतकं घनदाट आहे की १५ फुटांवरचा वाघ दिसणार नाही.. तर जिम कॉर्बेटचं जंगल जगातल्या काही सुंदर जंगलामध्ये गणलं जातं. रणथंबोरच्या जंगलाचंही  वेगळंपण अगदी उठून  दिसतं. दक्षिणेत नागरहोळे, कबीनी, मदुमलाई ही प्रसिद्ध जंगलं देखणी खरीच आणि ताडोबा म्हणजे तर आपला मानबिंदूच. बांधवगड, दुधवा, काझीरंगा, गीर, अशी कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण नावं सांगता येतील.

प्राण्यांची, पक्ष्यांची  ही दुनिया अगदी वेगळी,  पण खूप इंटरेस्टिंग. खूप शिकवणारी. फोटोग्राफी करताना जर प्राणी-पक्ष्यांच्या  सवयी  माहित असतील तर खूप फायदा होतो.  जंगलात फोटोग्राफी करणं तसं चॅलेंजिंगच.  कारण प्राणी कुठून कसा येणार, लाइट कसा असणार हे आधीच माहित नसतं. अँगल आपल्याला पटकन ठरवायला लागतो. तर पक्ष्यांची वेगळीच तऱ्हा. ते कधी कुठे २ ते ३ सेकंद बसतील आणि कधी उडून जातील सांगता येत नाही.  त्यामुळं तुमच्या कॅमेऱ्याची तयारी आणि  त्यावरची तुमची पकड  खूप महत्वाचीअसते. 

या सगळ्यांत  वाघासारखा प्राणी समोर असला की काय गोंधळ उडतो ते विचारू नका. हा जंगलचा राजा असा काही दमदार पावलं टाकत येतो की तुम्ही भानच विसरता. त्याच्याकडे पाहू, की त्याचे फोटो घेऊ हेच सुचत नाही.  हृदयाचे ठोके इतके वाढलेले असतात की कॅमेरा सतत हालत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही सुंदर फोटो काढलात की  दिवस सार्थकी लागला म्हणून समजायचं.

सागाची, पिंपळाची अशी असंख्य झाडे, त्यावर घरटी करणारे पक्षी, ऐटबाज पंखांचा  पॅराडाईज फ्लायकॅचर,  तसंच विणीच्या हंगामात भेटी देणारी पाखरं, उंच आकाशात उडणारे गरुड आपलं मन मोहून टाकतात. हा खजिना भरभरून  देणाऱ्या निसर्गाला मनापासून सलाम.   

घनदाट झाडं, पिसारा फुलून  नाचणारा मोर, आईसोबत बागडणारी हरणाची गोंडस बछडी, आगाऊ माकडं, सुंदर सुंदर पक्षी, अतिशय देखणा बिबळ्या, महाकाय  हत्ती, रुबाबदार वाघ....मंडळी, निसर्गानं आपल्याला खूप काही दिले आहे, त्याबद्धल आपण कृतज्ञ राहू आणि आपल्या आजूबाजूचा परिसर जास्तीजास्त निसर्गरम्य  करण्याचा प्रयत्न करू.

पण मंडळी, हे सारं अनुभवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. एकतर या साऱ्या लेन्सेस आणि कॅमेऱ्यांचं वजन प्रचंड असतं. ते घेऊन जंगलातली भटकंती करणं खायचं काम नाही. जंगलात फिरताना कधी कधी पाणी संपतं, जगाशी संपर्क तुटणं तर नेहमीचंच.. उन्हानं त्वचा रापणं किंवा तोंड धुवायला ही पाणी उपलब्ध न होणं हे तर सांगायलाच नको.. हे सगळं पाहता या क्षेत्रात मुलींची संख्या नगण्य आहे यात काहीच आश्चर्य नाहीय. 


मी कोण ?

मी ऋता कळमणकर. निसर्गाची व वन्यजीवांचीआवड असल्यामुळं वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडे वळलेआणि या मोहमयी जगात हरवून  गेले.  सोबत मी काढलेली काही छायाचित्रं देत आहे. तसेच  आपण माझ्या फेसबुक पेजवर  माझं काम पाहू शकता.


Facebook - http://www.facebook.com/RutaKalmankar1/

Twitter - http://www.twitter.com/RutaKalmankar1/

Instagram - http://www.instagram.com/RutaKalmankar1/

सबस्क्राईब करा

* indicates required