साधे सोपे अर्थसूत्र भाग १: काय असणार आहे या मालिकेत? का आहे ही महत्वाची?

A fool and his money soon part the company म्हणजे मूर्ख माणूस आणि त्याचा पैसा यांची ताटातूट व्हायला वेळ लागत नाही. जर तुमच्या हातात पैसे असतील तर तुम्ही अर्थसाक्षर असणे किती महत्वाचे आहे हे सांगणारा हा वाक्प्रचार आहे.'बोभाटा'च्या अनेक लेखातून आम्ही अर्थसाक्षरतेचा अप्रत्यक्ष प्रचार करतच असतो. या अर्थसाक्षरतेच्या प्रसारासाठी आम्ही 'साधे सोपे अर्थसूत्र' ही नवी लेखमालीका सादर करत आहोत. आपल्या रोजच्या व्यवहारात येणार्‍या अनेक आर्थिक संकल्पनांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगाणारी ही लेख मालीका आहे.या मालीकेचे लेखक श्री अरुण केळकर हे व्यवसायाने निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट आहेत.येणारा काळ ' फिनटेक रिव्होल्यूशन' चा आहे - आर्थिक व्यवहाराच्या क्रांतीचा- आहे. चला तर , अर्थसाक्षरतेकडे पहिले पाऊल उचलू या !

==========================================

हल्ली शाळकरी मुलालासुद्धा कॉम्प्युटर माउस म्हणजे काय,तो काय करतो हे सांगावे लागत नाही.ज्याला सामान्य ज्ञान असे म्हटले जाते त्यात ते गणले जाते. सामान्यज्ञान प्राप्त होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जावे लागत नाही, ते दैनंदिन आयुष्यक्रमातूनच प्राप्त होते.

व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटट म्हणून विविध क्षेत्रांतील लोकांशी आणि हौशी शिक्षक म्हणून विविध फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांशी मी जेव्हा संभाषण करतो, तेव्हा मला जाणवते की ज्या आर्थिक संकल्पनांचा मी सामान्य ज्ञानात समावेश करतो त्या तशा नाहीत.यात भर पडली आहे विकसित होणाऱ्या नवनवीन संकल्पनांची. काही दशकापूर्वीच अर्थविषयकच काय, पण अन्य प्रकारचे ज्ञान पसरायला बराच कालावधी लागत असे.आताएका देशात विकसित झालेली संकल्पना क्षणभरात विनाविलंब जगभर पसरते.

एक उदाहरण एम्प्लॉयीज स्टॉक ऑप्शन हे देता येईल.अमेरिकेत याचा उगम माहिती तंत्रविज्ञानाच्या परमकोटीच्या ऊर्जितावस्थेत झाला.भारतीय कंपन्यांनी मात्र ही संकल्पना आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत वापरायला सुरुवात केली.याचे अन्य एक उदाहरण म्हणजे ‘फायनान्शिअल प्रॉडक्ट्स’,ज्याची कल्पना करणेसुद्धा एकेकाळी अशक्य होते.आता क्रेडिट/डेबीट कार्डधारक रोज नवनव्या ‘फायनान्शिअल प्रॉडक्ट्स’ना सामोरे जातात.

या विषयांसंबंधीच्या पुस्तकांचा धांडोळा घेतला, तेव्हा माझ्या लक्षात आले,की या संकल्पना समजावणारे सर्वसमावेशक असे पुस्तक उपलब्ध नाही. जी पुस्तके उपलब्ध आहेत त्यांची गणना शब्दकोश किंवा महाविद्यालयीन क्रमिक पुस्तके अशी होते. शब्दकोशात पर्यायी शब्द आणि दोनचार वाक्यांत माहिती यापलीकडे काही मिळत नाही आणि क्रमिक पुस्तके सामान्य वाचक वाचू शकत नाहीत.याशिवाय त्यांच्यातील एक मोठी त्रुटी ही, की या संकल्पनांचा 'रेलेव्हन्स' काय हे त्यातून समजत नाही. उदाहरणार्थः शरीराच्या अवयवांची नावे माहीत असणे पुरेसे नसते, तर त्याची कार्ये कोणती आणि ते अवयव एकसंधपणे कसे कार्य करतात हे माहीत असणेमहत्वाचे असते .


रिझर्व बँक मे आणि नोव्हेंबर महिन्यात आपले अर्थ वार्षिक पतधोरण जाहीर करते हे माहित असण्याचा फारसा उपयोग नाही महत्त्वाचे हे आहे की या महिन्यात शेतीचे अनुक्रमे खरीप आणि रब्बी हंगाम सुरू होतात आणि भारतासारख्या कृषिप्रधान देशात या महिन्यात पुढील सहा महिन्यांचे पतधोरण जाहीर होणे हे योग्यच आहे.त्याचप्रमाणे बॅकवर्ड इंटरनॅशनल आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय यापेक्षा त्यांची त्यांची गरज का असते आणि त्यांचा वापर करून कंपन्या आपला नफा कसा वाढवू शकतात हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे


या मालिकेचे एक वैशिष्ट्य आहे की यातील प्रत्येक लघुनिबंध स्वतंत्र आहे. रोज कानावर पडणार्‍या अर्थविषयक संकल्पना या मालिकेतून आपण समजून घेणार आहोत.


अरुण केळकर.

सबस्क्राईब करा

* indicates required