संभाजी महाराजांचा आणि सांबारचा काय आहे संबंध...जाणून घ्या !!!

कोणत्याही हॉटेल मध्ये जा, मेन्यूमध्ये साऊथ इंडियन पदार्थ असतातच. पूर्वी किंवा आत्ताही आपल्याला आठवत असेल एक लुंगी मधला साऊथ इंडियन ‘अण्णा’ डोक्यावर मोठं इडली सांबारचं पातेलं घेऊन यायचा. या दक्षिणेतल्या पदार्थांच्या चवीवर सगळेच भाळलेले असतात.
आता इडली, डोसा, उतप्पा, रसम, सांबार या पदार्थांची नावं ऐकल्यावर आपल्याला काय आठवतं? दक्षिण भारत किंवा फार फार तर तमिळ लोक. आता तुम्हाला कोणी विचारलं, "की बाबा रे सांबार डिश कोणाची?" तर तुम्ही लगेच म्हणाल, ‘यात काय विचारायचं...साऊथ इंडियन लोकांची’! पण असं नाहीये बरं का.. हे साफ म्हणजे साफ खोटंय....
आपल्या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीला थोडं बाजूला ठेवूया आणि इतिहासात डोकावूया :
तर असं म्हणतात कि सांबारचा थेट संबंध आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी!!! बसला ना जोरका झटका ? तर कान देऊन ऐका मंडळी...
सांबार हा पदार्थ संभाजी महाराजांशी जोडला असला तरी त्याबद्दल अनेक कथा रंगवून सांगण्यात येतात. यातल्या महत्वाच्या दोन कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !!!
कथा १
संभाजी महाराज एकदा दक्षिणेत तंजावरला शाहूजी राजेंना भेटायला गेले. शाहूजी राजे स्वतः पाककलेत प्रवीण होते. त्यांनी ठरवलं कि स्वहस्ते या पराक्रमी योद्ध्याला एखादा पदार्थ बनवून खाऊ घालूया. त्यांनी आमटी करावयास घेतली. आमटी बनवत असताना शाहुजींना समजले की कोकम संपलं आहे. यावर उपाय म्हणून पहिल्यांदाच शाहुजींनी कोकमऐवजी चिंच वापरली आणि अजून एक महत्वाचा बदल म्हणजे मुगाऐवजी तुरीच्या डाळीचा वापर केला. या बदलांमुळे एक नवीन पदार्थ तयार झाला. ही डिश संभाजी महाराजांना तर आवड्लीच पण दक्षिणेतही प्रचंड प्रसिद्ध झाली.
कथा २
स्रोत
दुसऱ्या एका कथेनुसार संभाजी महाराज एकदा स्वतः स्वयंपाक करायला मुद्पाकखान्यात (किचनमध्ये) गेले होते. आमटी तयार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आमटीसाठी लागणारं कोकम संपलं आहे. (आता इथे पुन्हा मागील कथेशी संबंध येतो) यावर उपाय म्हणून एका आचाऱ्याने घाबरत घाबरत त्यांना कोकमऐवजी आमटीत चिंच घालण्याचा सल्ला दिला. या नव्या प्रयोगामुळे तयार झालेली आमटी चवीला वेगळी होती आणि असं म्हणतात इथूनच सांबारची खरी सुरुवात झाली.
महाराजांशी जोडल्या गेलेल्या या पदार्थाला नावही संभाजी महाराजांची आठवण म्हणून ‘सांबार’ देण्यात आलं. या कथांना कागदोपत्री काही पुरावा नसला तरी सांबारचा संभाजी महाराजांशी संबंध आहे यात काही शंका नाही.