computer

हरवलेलं मुक्काम पोस्ट...

आपलं घर असणं - आईबाबा आपल्या सोबत असणं- शाळा आणि मित्र सोबतीला असणं हे सगळं आपण गृहीत धरूनच चालत असतो. पण घर नसणं - आईची माया न लाभणं -बाबा नशेत धुंद असणं- नको तो मित्रांची संगत लागणं असंही काही मुलांच्या नशिबात लिहिलेलं असतं. मग काही काळाने ही मुलं आयुष्याच्या तणावापासून दूर होण्याच्या नादात पळून जातात. पळून जाणं कळतं पण कुठे -का - कसं काहीच माहिती नसतं.प्रत्येकाचं नशिब 'किताब' सिनेमातल्या पळून जाणार्‍या बाबलासारखं नसतं.मग रेल्वे प्लॅटफॉर्म - एस टी स्टँड- इतर सार्वजनिक ठिकाणी नव्या आसर्‍याचा शोध सुरु होतो. या ठिकाणी आधार कसलाच नसतो - एक दिशाहीन अस्वस्थ अस्तित्व फक्त असतं. बाळपण कधीच हरवलेलं असतं ,उरलेली असते फक्त निराशा !

ठाण्यातील विजय जाधव यांच्या समतोल फाउंडेशनचे स्वयंसेवक मात्र या मुलांच्या शोधात असतात.त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा घरापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.बर्‍याचवेळा हा प्रयत्न यशस्वी होतो- काहीवेळा असफलता पण पदरात पडते. तरीही अव्याहतपणे समतोल आपले कार्य सुरुच ठेवते.समतोलच्या विजय जाधवांची सविस्तर मुलाखत आपण नंतर घेणार आहोतच पण त्या आधी त्यांच्या अनुभव कथनाचे 'हरवलेलं मुक्काम पोस्ट'या पुस्तकाचा ब्लर्ब आपण वाचू या. 

 

मुंबई ... स्वप्नांची नगरी.रोज लाखोंनी माणसे या शहरात येतातआणि नकळपणे या शहराचा भाग बनून जातात.
या लाखोंच्या गर्दीत अजाण मुलेही असतात,हजारोंच्या संख्येने. 
तीही येतात उराशी स्वप्ने घेऊन, या मुंबईत काहीतरी बनण्यासाठी. 
काही तर नुसतेच येतात एखाद्या हिरोला किंवा हिरॉइनला पाहण्यासाठी.
कोणी गायक बनायला,कोणी हिरो बनायला तर कोणी कुटुंबाचं पोट भरण्याच्या अपेक्षेनं. 
आणि मग हरवून जातात या गर्दीत. 
अशाच गर्दीत ज्यांचं निरागसपण हरवलंय,त्या लेकरांना समतोलचे कार्यकर्ते हेरून त्यांना त्यांच्या घरी, पालकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात.
त्यांचं समुपदेशन करतात.
रेल्वे स्टेशन बस स्टॉप, सिग्नलला सापडलेलं प्रत्येक मूल म्हणजे समतोलच्या कार्यकर्त्यांसाठी एक नवीन अनुभव.
अशाच आपल्या घरापासून निघून या मुंबापुरीत हरवलेल्यांच्या गोष्टी म्हणजे 'हरवलेलं मुक्काम पोस्ट'

हरवलेलं  मुक्काम पोस्ट
लेखक विजय रामचंद्र जाधव
प्रकाशक - व्यास क्रिएशन्स
सर्व हक्क -  नीलेश गायकवाड

सबस्क्राईब करा

* indicates required