हा मराठी तरुण बनलाय अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन....वाचा त्याची यशोगाथा !!

मंडळी, महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. अमेरिकेच्या क्रिकेट टीमचं कप्तानपद सौरभ नेत्रावळकर या मराठी तरुणाकडे आलंय भाऊ !! सौरभने २०१० सालची अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा आपल्या दमदार कामगिरीने गाजवली होती. पण पुढे असं काही घडलं की त्याने क्रिकेट खेळणं चक्क बंद केलं. मग तो आज अमेरिकेन क्रिकेट टीमचा कॅप्टन कसा बनला ? चला जाणून घेऊया सौरभचा हा अनोखा प्रवास !
मंडळी, सौरभ नेत्रावळकरने २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकात इंग्लंडच्या ‘जो रूट’ आणि पाकिस्तानच्या एहमद शेहजाद या दोन महत्वाच्या खेळाडूंना धूळ चारली होती. (हे दोघेही आज त्यांच्या टीमचे कॅप्टन आहेत.) त्याच्या या कामगिरीने त्याच्याकडे सगळ्याचंच लक्ष वेधलं गेलं होतं. तो २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकातला सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरला होता.
यानंतर तीन वर्षांनी सौरभने आयुष्यातला एकमेव रणजी सामना खेळला. कर्नाटक विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३ विकेट घेतले. त्याचं करियर अगदी दमदार चाललं होतं, पण त्याने अचानक खेळणं बंद केलं
सौरभने २ वर्ष क्रिकेटला वाहून घेतलं होतं, पण तो स्वतःच्या कामापासून खुश नव्हता. मग त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आणि सरळ इंजिनियरिंगच्या पदवीसाठी अमेरिकेतलं कॉर्नेल विद्यापीठ गाठलं.
कॉर्नेल विद्यापीठाच्या दिवसात तो पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळला. यानंतर मात्र क्रिकेट त्याच्यापासून कधीच लांब गेलं नाही. त्याला नोकरी मिळाल्यानंतरही त्याचं क्रिकेट खेळणं बंद झालं नाही.
शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत तो आपल्या टीम सोबत सॅन फ्रान्सिस्को वरून ६ तासाचा प्रवास करून लॉस-एंजेलिसला जायचा. शनिवारी लॉस-एंजेलिस येथे ५० ओव्हरचा सामना खेळल्यानंतर रविवारी पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला येऊन ५० ओव्हरचा सामना खेळणे हे त्याने अंगवळणी पाडून घेतलं होतं. या सर्वात त्याने कामाकडे दुर्लक्ष केलं नाही.
मंडळी, या मेहनतीचं आणि चिकाटीचं अखेर त्याला फळ मिळालेलं आहे. सौरभचं टीम मध्ये फक्त सिलेक्शन झालेलं नाही तर त्याला कॅप्टनपद मिळालं आहे. त्याच्या कॅप्टन्सी मध्ये अमेरिकेची टीम पुढच्याच आठवड्यात ओमान मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.
मंडळी, बोभाटा तर्फे सौरभचं खूप खूप अभिनंदन. सौरभचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच वाटेल !!