एका चिमणीसाठी भारतातलं एक गाव तब्बल ३६ दिवस अंधारात राहिलं!!

विश्वास बसत नाही ना? माणसाच्या हव्यासामुळे जंगलांचा, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि त्याचा फटका प्राण्यांना- पक्ष्यांना बसत आहे हे आपण नेहमीच ऐकतो. परंतु कधीकधी माणसाच्याच एखाद्या कृतीमुळे त्याच्यात अजूनही भूतदया शिल्लक आहे, अजूनही तो प्राणीमात्रांबद्दल कृतज्ञ आहे याची खात्री पटून जाते. तामिळनाडूतल्या शिवगंगाई जिल्ह्यात पोथाकुडी नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथल्या गावकऱ्यांनी आमच्यात अजूनही भूतदया शिल्लक आहे हे उदाहरणासह दाखवून दिलंय.
झालं असं की या गावातल्या मेन स्विचबोर्डावर नेमकं एका चिमणीने घरटं केलं आणि त्यात अंडी दिली! त्यामुळे ती चिमणी आणि तिची अंडी वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी मेन स्विचला हात न लावता अंधारात राहण्याचा निर्णय घेतला. आणि ही अंधारात राहण्याची कल्पना सुचली होती करुप्पुराजा नावाच्या एका 20 वर्षीय मुलाला..!
करुप्पुराजा म्हणतो, "एकदा असेच आम्ही स्विचबोर्ड जवळून जात होतो आणि तिथे आम्हाला एका घरट्यात चिमणीची तीन अंडी दिसली. आम्ही लगेच त्याचे फोटो काढले आणि गावाच्या व्हॉटसअप ग्रुपवर पोस्ट केले. केवळ एवढेच करून आम्ही थांबलो नाही, तर गावकऱ्यांना त्या चिमणीला मदत करण्याचेदेखील आवाहन केले. त्यासाठी त्या स्विचबोर्डला जोडलेले दिवे बंद ठेवण्यासाठी सांगितले जेणेकरून त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ शकतील."
तो स्विचबोर्ड गावातल्या रस्त्यावरच्या ३५ पथदिव्यांना जोडलेला होता आणि जवळपास शंभर कुटुंबांना त्यांचा उपयोग होत होता. गावकऱ्यांनी तो स्विचबोर्ड तसाच बंद ठेवला आणि पथदिवे देखील जवळपास ३६ दिवसांसाठी बंद राहिले. ज्या स्त्रियांना अंधारात जाण्याची भीती वाटत होती त्यांनीसुद्धा आपली भीती बाजूला ठेवून त्या चिमणीला मदत केली!
या गावातल्या लोकांना "भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे" छान उमगलेलं दिसतंय.
लेखक : सौरभ पारगुंडे