computer

इंडोनेशियात आढळलंय हे राक्षसी फूल.. त्याला मिळालेलं नावही तेवढंच विचित्र आहे!!

फूल म्हटलं की डोळ्यासमोर नाजूक कोमल अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. जाईजुईचं, प्राजक्ताचं, असं काहीतरी ! पण या प्रतिमेला धक्का देणारी काही फुलं पण असतात. उदाहरणार्थ, केळफूल ! पण राक्षसी म्हणावं असं फूल तुम्ही आजपर्यंत बघितलं नसेल. आज आम्ही अशा एका फुलाची ओळख करून देणार आहोत.

राफ्लेशिया हे फूल जगातलं सर्वात मोठं फूल म्हणून ओळखलं जातं. या फुलाचा आकार १ मीटर रुंद तर वजन १० किलोग्रामपर्यंत असू शकतो. नुकतंच इंडोनेशियामध्ये यापूर्वी कधीही बघितला नसेल एवढ्या मोठ्या आकाराच्या राफ्लेशिया फुलाचा शोध लागला आहे. या फुलाचा व्यास हा ४ फुट एवढा प्रचंड आहे.

यापूर्वीचा रेकॉर्ड हा २०१७ सालच्या राफ्लेशिया फुलाचा होता. हे फूल सुद्धा त्याच जागी उगवलं होतं जिथे यंदाचं रेकॉर्ड ब्रेक करणारं फूल उगवलं आहे. दोघांमध्ये केवळ ४ इंचाचा फरक आहे.

राफ्लेशिया फुलाचं वैशिष्ट्य काय आहे?

राफ्लेशिया फूल परजीवी असतं. त्याला पाने नसतात. इतर झाडांच्या अन्न आणि पोषक घटकावर ते जागतं. या फुलाचं वयोमान अवघ्या ६ ते ७ दिवसांपुरतंच असतं. त्यानंतर फुल कुजून नष्ट होतं.

राफ्लेशियाची परागीकरण म्हणजे एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलावर नेण्याचं काम एका विशिष्ट पद्धतीने घडतं. फुलाच्या आतून सडलेल्या मांसासारखा वास येतो. या दुर्गंधीमुळे लहानसहान कीटक फुलाच्या पोकळीकडे आकर्षित होतात. या कीटकांच्या मार्फत परागीकरण घडून येतं. या गुणधर्मामुळे राफ्लेशियाला ‘मृतदेहाचं फूल’ नाव मिळालं आहे. फुलाला स्पर्श केल्यास त्वचेला स्पर्श करत असल्याचा भास होतो.

इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये राफ्लेशिया आढळतं. १७९१ आणि १९७९४ च्या काळात राफ्लेशियाचा शोध लागला. पण पाश्चात्य जगाला त्याबद्दल माहिती मिळायला आणखी काही वर्ष गेली. १८१८ साली पुन्हा एकदा शोधमोहीम घेऊन फुलाचा शोध घेण्यात आला. इंडोनेशियाच्या एका मार्गदर्शकाने हे फूल शोधून काढलं. या मोहिमेचे मुख्य असलेले ‘थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स’ यांच्या नावावरून फुलाला राफ्लेशिया नाव मिळालं.

तर, कशी वाटली ही माहिती ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required