computer

किनारा नसलेला जगातला एकमेव समुद्र !!

लेखाचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल, की असं कुठे असतंय का ? पण मंडळी, असा समुद्र खरोखर अस्तित्वात आहे. या समुद्राला म्हणतात ‘सारागॅसो समुद्र’. त्याला किनारा का नाही हे आता समजून घेऊया.

सारागॅसो समुद्राच्या चारीबाजुला जमीन नसून पाणी आहे. मग तुम्ही म्हणाल की याला समुद्र तरी का म्हणावं. त्याचं असं आहे की हा एक विशिष्ट भाग आहे. सारागॅसो समुद्र हा अनेक समुद्री प्रवाहांच्या मधोमध वसलाय. उत्तर अटलांटिक प्रवाह, अखाती प्रवाह, उत्तर अटलांटिक विषुववृत्तीय प्रवाह, कॅनरी प्रवाह अशा ४ प्रवाहांच्या मधल्या प्रदेशाला सारागॅसो समुद्र म्हणतात.

सारागॅसो समुद्र चारही प्रवाहांच्या बदलत्या धारेसोबत अर्धवर्तुळाकार बदलत असतो. हेच सारागॅसो समुद्राचं वैशिष्ट्य आहे.

सारागॅसो समुद्राला सारागॅसो हे नाव तिथल्या सारगॅसम (sarcasm नव्हे) नावाच्या समुद्री शेवळावरून मिळालं. सारगॅसम शेवाळ सारागॅसो समुद्रावर तरंगताना दिसतं. चारही बाजूच्या प्रवाहांमुळे व वाऱ्यामुळे सतत अस्थिर राहत असल्याने हे शेवाळ वेगवेगळ्या प्राण्याचं घर बनलं आहे. 

कोळंबी, खेकडा, वेगवेगळे मासे, इतकंच नाही तर कासव आणि इल मासे आपली अंडी उबवण्यासाठी सारगॅसम शेवाळाच्या आश्रयाला येतात. दरवर्षी शार्क, व्हेल्स आणि अनेक पक्षी सारागॅसो समुद्रातून प्रवास करतात. त्याचं कारण पण सारगॅसम शेवाळ आहे. हा मार्ग त्या प्राण्यांना सोप्पा वाटतो.

या ठिकाणची एक जुनी गोष्ट सांगतो. फार पूर्वी सारागॅसो समुद्रात घोड्यांना जलसमाधी मिळायची. याचं कारण म्हणजे, तिथल्या शांत प्रवाहामुळे आणि शेवाळामुळे नाविकांमध्ये असा समाज व्हायचा की जास्त वजनामुळे नौका बुडेल. म्हणून मग ते ओझं कमी करण्यासाठी आधी आपल्या घोड्यांना समुद्रात ढकलायचे.

मंडळी, तुम्ही सारागॅसोबद्दल ह्या चांगल्या गोष्टी वाचल्या, आता वेळ आहे याची दुसरी बाजू बघण्याची.

चार वेगवेगळे प्रवाह आजूबाजूला असण्याचे जसे फायदे आहेत तसेच दुष्परिणाम पण आहेत. सध्या अटलांटिक आणि प्रशांत महासागरात कचऱ्याचे मोठाले ढिगारे तरंगत आहेत. यांना खास नावं पण देण्यात आली आहेत. प्रशांत महासागरातील कचऱ्याला ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ म्हणतात तर अटलांटिकच्या कचऱ्याला ‘नॉर्थ अटलांटिक गार्बेज पॅच’ म्हणतात.

सारागॅसो समुद्राच्या शेजारी असलेल्या अटलांटिक महासागराच्या प्रवाहामुळे सगळाच्या सगळा ‘नॉर्थ अटलांटिक गार्बेज पॅच’ हा सारागॅसो समुद्रात ढकलला गेला आहे. या कचऱ्यात बहुतांश प्लास्टिक आहे. हे प्लास्टिक पण आपल्याकडच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या या स्वरूपातला नाही, तर या कचऱ्यात प्लास्टिकचे लहान लहान तुकडे आहेत. वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या मार्गाने आलेला हा कचरा सारागॅसो समुद्राच्या मधोमध तरंगतोय.

तर मंडळी, कसा वाटला हा जगातला एकमेव किनारा नसलेला समुद्र ? प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required