computer

बुटांच्या लेसवरून CIA एजंट गुप्त संदेश कसे द्यायचे? ह्या क्लुप्त्या एकदा समजून घ्या !!

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA (Central Intelligence Agency) ने फार मोठी जबाबदारी पार पाडली होती. शत्रूच्या सैन्यातील गुप्त माहिती काढून आणणे म्हणजे तितकी सोपी गोष्ट नाही. परंतु CIAच्या एजंट्सनी हे काम किती हुशारीने आणि सतर्कतेने केले आणि यासाठी त्यांनी कोणत्या पद्धती वापरल्या हे हळूहळू उघड होत गेले. 

CIA एजंट्सना एकमेकांना काही सूचना द्यायचा असतील माहिती सांगायची असेल तर त्यासाठी त्यांनी काही गुप्त कोड बनवले होते. वरवर पाहता ज्या बाबी खूप सामान्य वाटतील अशा गोष्टींत त्यांचे संदेश दडलेले असत. त्यामुळे हे CIA चे एजंट असावेत असा साधा संशयही कुणी घेऊ शकत नव्हते. 

अर्थात CIA च्या या गुप्तभाषेबद्दल कुणाही सामान्य माणसाला काहीही माहिती असण्याचे कारण नाही, पण CIA मधून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यानेच CIA च्या या सांकेतिक भाषेचा खुलासा करणारी माहिती दिली आहे. 

CIA मधील एक अधिकारी रॉबर्ट वॅलेस आणि इतिहासकार एच. केथ मेल्टन यांनी आपल्या एक पुस्तकातून ही माहिती उघड केली आहे. या पुस्तकाचे नाव आहे, द ऑफिशियल CIA मॅन्युअल ऑफ ट्रिकरी अँड डिसेप्शन. या पुस्तकात त्यांनी शितयुद्धाच्या दरम्यान CIA चे एजंट एकमेकांना काही निरोप कसे द्यायचे, त्यासाठी कोणती गुप्त भाषा वापरत असत, याची सगळी माहिती दिली आहे. एकही शब्द न उच्चारता, कुठलेही विशिष्ट हातवारे किंवा खाणाखुणा न करता एकमेकांना निरोप पोहोचवण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली होती. यासाठी त्यांनी जी खास पद्धत विकसित केली त्याचे नाव होते शूलेस कम्युनिकेशन. आता शूलेस कम्युनिकेशन म्हणजे काय? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. 

एखाद्या CIA एजंटने त्याच्या बुटांची लेस कशा पद्धतीने बांधलेली आहे यावरून दुसरा CIA एजंट त्याला काही माहिती किंवा संदेश द्यायचा आहे हे ओळखत असे. बुटाची लेस ज्या पद्धतीने बांधलेली असेल त्यानुसार ‘माझ्यासोबत ये’ किंवा ‘माझ्याकडे खास माहिती आहे’ किंवा ‘माझ्यासोबत एक दुसरा व्यक्ती आहे,’ असे संदेश दिले जात असत. बुटांची लेस कशी बांधली आहे, यावरूनच त्याला काय म्हणायचे आहे हे समोरच्याला समजून जात असे. 

CIA एजंट्सनी अशा अनेक क्लुप्त्या लढवल्या होत्या. ज्याद्वारे ते एकमेकांना माहिती पोहोचवत आणि तरीही त्यांच्यावर कुणाला संशयही येत नसे. शीतयुद्ध संपल्यानंतर रोबर्ट वालेस आणि एच. केथ यांनी मिळून आपल्या पुस्तकातून CIA बाबतच्या अशा अनेक गुप्त गोष्टी जाहीर केल्या आहेत.

CIA ने याच वेळी जादुगार जॉन मलहोलंड यालाही आपल्या या गुप्तचर संस्थेत नेमले होते. मेलहोलंडने CIA एजंट्सना अशा अनेक क्लुप्त्या शिकवल्या ज्यामुळे या एजंट्सवर कुणीही संशय घेऊ शकणार नाही. वरवर अगदी शांत आहोत असे भासवत हातवारे आणि खाणाखुणा कशा करायच्या, याचे अनेक ट्रिक्स मलहोलंडने या सदस्यांना शिकवल्या आणि त्यांच्याकडून रट्टा मारून घेतल्या. जेणेकरून कुठल्याही अवघड परिस्थिती त्यांना सहजपणे या ट्रिकचा वापर करता येईल. 

जेम्स बॉंडचे चित्रपट पाहून तुम्हाला वाटत असेल की गुप्तहेर हे दिसायला अगदी आकर्षक आणि खूपच स्मार्ट असतात, तर तसे अजिबात नाही. उलट गुप्तहेर तर अगदी साध्यासामान्य माणसांसारखेच असतात. कधी कधी तर त्यांच्याकडे पाहून किती हा बावळट मनुष्य असे विचार मनात उमटावेत इतके ते साधे असतात. 

तसे तर पूर्वीच्या काळी प्रेयसीलाही काही संदेश द्यायचा म्हटले तरी अशीच एखादी सांकेतिक भाषा वापरावी लागत असे. आजच्या काळात फोन आणि त्यावरील सोशल अॅप्समुळे अशी सांकेतिक भाषा वापरण्याची गरज पडत नाही. तरीही एखाद्या प्रसंगी तुम्हालाही अशाच सांकेतिक भाषेचा वापर करावा लागला असेल  तर तो अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required