क्रूर सिरियल किलर्स : खुनानंतर मगरींना प्रेते खाऊ घालणारा डॉक्टर किती खून केले होते हेच विसरला होता!!

डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप. डॉक्टरांनी आजवर किती लोकांना मरणाच्या दाढेतून परत आणले याचा हिशेब नाही. या पवित्र व्यवसायात मात्र एक असाही डॉक्टर होऊन गेला, ज्याने केलेल्या खुनांचा हिशोब तो स्वतः विसरला होता. आजच्या सिरीयल किलरच्या लेखात आपण देवेंद्र शर्मा नावाच्या डॉक्टर कसा माथेफिरू खुनी झाला हे वाचणार आहोत.

व्यवसाय करताना फसवणूक होते आणि एखाद्या व्यक्तीचा माणुसकीवरचा विश्वास उडतो. उत्तर प्रदेशातील अलिगढचा राहणारा देवेंद्र शर्माचे पण असेच काहीसे झाले. पण फरक एवढाच की त्याचा उडालेला माणुसकीवरचा विश्वास त्याला पशू बनवून गेला. 

१९८४ साली देवेंद्र शर्माने आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये पदवी घेतली. राजस्थानला एक छोटे क्लिनिकही सुरू केले. क्लिनिक चांगले चालल्यावर त्याच्या हातात दोन पैसे खेळू लागले. जवळपास १० वर्षांनंतर क्लिनिकमधून आलेला पैसा कुठल्यातरी वेगळ्या व्यवसायात गुंतवला पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. त्याला काही लोकांनी आपण गॅस एजन्सी सुरू करू म्हणून आमिष दाखवले. हा भाऊ त्या आमिषला बळी पडला.

थोडीथोडकी नव्हे, तर त्याकाळी प्रचंड मोठी असलेली ११ लाखांची गुंतवणूक तो करून बसला. देवेंद्र शर्माकडून पैसे घेतले आणि पैसे घेणारे लोक गायब झाले. त्यांचे ऑफिसही गायब झाले. इतके पैसे बुडल्याने हा गडी टेन्शनमध्ये येणे साहजिक होते. मग पैसे वसूल करण्यासाठी याने थेट खोटी गॅस एजन्सी सुरू केली. 

पैसे बुडल्याने तो काहीही करायला धजू लागला. चांगला सुशिक्षित आणि व्यवसायात स्थैर्य असलेला हा डॉक्टर आता चक्क एक गॅंग चालवू लागला होता. गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाड्या लुटणे हा कार्यक्रम त्याने गॅंगसोबत सुरू केला. गाडी लुटायची, ड्रायव्हरचा खून करायचा आणि ती गाडीची कुठेतरी विल्हेवाट लावायची असा त्याचा एकंदर कार्यक्रम सुरू होता. असे करता करता त्याने एक दोन नव्हे, तर तब्बल २५ खून केले. 

देवेंद्रच्या दाताला आता रक्त लागले होते. डॉक्टर असल्याने तो किडनीचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय झाला. एका किडनी ट्रान्सप्लांटचे तो ७ लाख घेत असे. अशा पद्धतीने तब्बल १२५ ट्रान्सप्लांट त्याने केले. सोबतच त्याचा पुढचा गुन्हेगारी व्यवसाय म्हणजे टॅक्सी चालकांचा खून करायचा आणि त्यांची टॅक्सी चोरून ती तो सेकंडहँड म्हणून विकायचा. खून करणे आणि चोऱ्या करणे हे जणू एका तोडीचे काम आहे अशा पध्दतीने त्याचे काम सुरू होते. 

गुन्हेगार हा कितीही हुशार असला तरी त्याचा अंत हा तुरुंगातच होत असतो. ज्या वेगाने देवेंद्र शर्माची ही खुनी मालिका सूरू होती, तिचा अंत होणारच होता. पोलिसांना त्याच्या या काळ्या कारनाम्यांची कुणकुण लागली आणि त्याचा गेम झाला. एकेदिवशी त्याला बरोबर गाठत त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याने जे सांगितले ते धक्कादायक होते. त्याला पहिल्या ५० खुनांनंतर आपल्याला मोजणी आठवत नसल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर तो खून केलेली प्रेते मगरींना खाऊ घालत असल्याचेही लक्षात आले.

यावरून त्याची क्रूरता काय हद्दीची होती याचा अंदाज येऊ शकतो. २००४ साली त्याला पकडण्यात आले. आधी जन्मठेप आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जवळपास १६ वर्ष तो जेलमध्ये राहिल्यावर २०२० साली तो पॅरोलवर बाहेर पडला. आता माथेफिरू तो माथेफिरुच इथेही तो शांत राहिला नाही.

पॅरोलवर असतानाच तो गायब झाला. या काळात तो एका व्यापाराला फसवण्याची प्लॅनिंग करत असताना त्याला परत पोलिसांनी अटक केली. अशा पद्धतीने एकदा त्याच्या डोक्यात घुसलेले गुन्हेगारीचे भूत शेवटपर्यंत निघाले नाहीत. 

सबस्क्राईब करा

* indicates required