आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील टॉप -१० विक्रम; पाहा संपूर्ण यादी...
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठ मोठे विक्रम प्रस्थापित केले जातील. तसेच अनेक विक्रम मोडले देखील जाणार यात काहीच शंका नाही. मात्र तुम्हाला या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज कोण? माहीत आहे का ? नाही ना? आज आम्ही तुम्हाला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील टॉप -१० विक्रमांबद्दल माहिती देणार आहोत.
सर्वाधिक धावा - महेला जयवर्धने
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या नावे आहे. त्याने ३१ सामन्यांमध्ये १०१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. तर दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेत ९६५ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक वैयक्तिक खेळी - ब्रँडन मॅक्युलम
न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज ब्रँडन मॅक्युलमने २०१२ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत ५८ चेंडूंमध्ये १२३ धावांची खेळी केली होती. ही खेळी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे.
सर्वोच्च स्ट्राइक रेट (किमान १२५ चेंडू) – डॅरेन सॅमी
वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीच्या नावे टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोच्च स्ट्राइक रेटने धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २५ डावांमध्ये २१५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १६४.१२ इतका होता. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ग्लेन मॅक्सवेलने १६० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा - ख्रिस गेल
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल सर्वोच्च स्थानी आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेत २ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.
सर्वाधिक षटकार - ख्रिस गेल
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील ख्रिस गेलच्या नावे आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेतील ३३ सामन्यांमध्ये ६३ षटकार मारले आहेत.
एकाच डावात सर्वाधिक षटकार - ख्रिस गेल
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील ख्रिस गेलच्या नावे आहे. ख्रिस गेलने २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ४८ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ११ षटकार मारले होते. यापूर्वी २००७ मध्ये झालेल्या सामन्यात त्याने ५७ चेंडूंमध्ये ११७ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १० षटकार मारले होते.
सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे फलंदाज - शाहिद आफ्रिदी आणि तिलकरत्ने दिलशान
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा विक्रम माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि माजी श्रीलंकन फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या नावे आहे. दोन्ही दिग्गज फलंदाज ५-५ वेळेस शून्यावर बाद झाले आहेत.
सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज - शाहिद आफ्रिदी
या यादीत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सर्वोच्च स्थानी आहे. त्याने २००७ पासून ते २०१६ पर्यंत खेळलेल्या ३४ सामन्यांमध्ये ३९ गडी बाद केले आहेत.
सर्वोत्तम गोलंदाजी - अजंता मेंडिस
श्रीलंका संघातील फिरकीपटू अजंता मेंडिसने २०१२ मध्ये झिम्बाब्वे विरुध्द झालेल्या सामन्यात ८ धावा खर्च करत ६ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याने २ षटके मेडन टाकली होती.
सर्वोत्कृष्ट सरासरी (किमान - २५० चेंडू) - सुनील नरेन
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सरासरीने गोलंदाजी करण्याचा विक्रम वेस्ट इंडिज संघातील दिग्गज गोलंदाज सुनील नरेनच्या नावे आहे. त्याने ४४.४ षटकात ५.१७ च्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम कुठल्या फलंदाजाच्या नावे आहे माहीत आहे का? कमेंट करून नक्की कळवा.




