Cricketers In Movies: जडेजा, गावस्कर ते युवी; 'या' क्रिकेटपटूंनी चित्रपटात केलंय काम

क्रिकेट आणि बॉलिवूडचं खूप जुनं नातं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या चर्चा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. तर काही क्रिकेटपटू असे देखील आहेत ज्यांनी थेट बॉलिवूडच्या चित्रपटात काम केलं आहे. दरम्यान बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे.

हरभजन सिंग (Harbhajan Singh) :

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले आहे. मात्र खूप कमी लोकांना ही बाब माहीत असेल की, हरभजन सिंगने चित्रपटात देखील काम केले आहे. त्याने 'भज्जी इन प्रॉब्लेम' या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४३५, वनडे कारकिर्दीत २६९ आणि टी -२० क्रिकेटमध्ये २५ गडी बाद केले आहेत.

युवराज सिंग (Yuvraj Singh):

सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने क्रिकेटच्या मैदानावर अनेक दिग्गज फलंदाजांची धुलाई केली आहे. त्याचे वडील योगराज सिंग यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. योगराज सिंग यांच्या एका चित्रपटात युवराज सिंग देखील झळकला होता. त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने कसोटी क्रिकेटमध्ये १९००, वनडेमध्ये ८७०१ आणि टी -२० क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत.

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) :

भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी १० हजार धावा पूर्ण करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी देखील चित्रपटात काम केले आहे. त्यांनी एका मराठी चित्रपटात काम केलं होतं. सावली प्रेमाची असं या चित्रपटाचं नाव होतं. तसेच 'मालामाल' या चित्रपटात देखील त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती.

अजय जडेजा (ajay jadeja

भारतीय संघाचा माझी खेळाडू अजय जडेजा देखील चित्रपटात झळकला आहे. त्याने ' पल - पल दिल के साथ' आणि खेल सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यासह तो रिॲलिटी शो झलक दिख ला जा मध्ये देखील दिसून आला आहे.

विनोद कांबळी (Vinod kambli

भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. एकेकाळी तो सचिनलाही मागे सोडेल असे वाटत होते. मात्र त्याची कारकीर्द खूप लवकर संपली. क्रिकेटसह विनोद कांबळीने देखील चित्रपटात काम केलं आहे. तो संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांचा चित्रपट अनर्थ या चित्रपटात अभिनय करताना दिसून आला होता. 

काय वाटतं, असा कोणता क्रिकेटपटू आहे ज्याने चित्रपटात काम सुरू ठेवलं असतं तर तो आणखी पुढे जाऊ शकला असता? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required