computer

हजारो कोटींचे उत्पन्न आणि शून्य रुपये इन्कम टॅक्स ! काय भानगड आहे ही ?

नुकतीच आयपीएल शृंखला संपली आहे.आपण रोज न विसरता कोण कसा खेळला ? कसा खेळायला हवा होता? हा न खेळता तर तो खेळला असता तर..? अशा चर्चात गुंतलेलो आहोत.आपण अशा रसाळ चर्चा करत असताना बीसीसीआय एकही रुपया इन्कम टॅक्स न भरता ₹ ४८३९० कोटी रुपये पोटात ढकलून मस्त ढेकर देत बसली आहे. पुन्हा एकदा वाचा -₹४८३९० कोटी ! भारतातल्या बर्‍याच छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करून बीसीसीआय एकही रुपया टॅक्स भरत नाही !
काय भानगड आहे ही ? भानगड वगैरे काही नाही पण आधी हे पैसे आले कसे आणि कुठून ते बघू या.

₹४८३९० कोटी रुपयांचे उत्पन्न बीसीसीआयला मिळाले.

आधी आपण बीसीसीआयला मिळालेले उत्पन्न मोजू या !
२०२२ साली बीसीआयने पुढच्या ५ वर्षात खेळल्या जाणार्‍या आयपीएलच्या प्रसारणाच्या हक्कांचा लिलाव केला.तेव्हा त्यांनी प्रत्येक एकाधिकाराची वेगवेगळी पॅकेज बनवली होती.त्यानुसार डिस्ने-स्टारने सामने भारतात टिव्हीवर प्रसारण करण्याचे हक्क ₹२३५७५ कोटीत (₹५७.५ कोटी एका सामन्यामागे ) विकत घेतले होते.व्हायाकॉम-18 चॅनेलने डिजिटल प्रसारणाचे हक्क २०५०० कोटीत विकत घेतले होते.याखेरीज त्यांनी आणखी एका पॅकेजसाठी २९९१ कोटी रुपये दिले. बा़की इतर बारीक सारीक हक्कांचे पैसे जोडून ₹४८३९० कोटी रुपयांचे उत्पन्न बीसीसीआयला मिळाले.

बीसीसीआयला एकही रुपया इन्कमटॅक्स भरावा लागत नाही.

इतकी मोठी रक्कम मिळूनही बीसीसीआयला एकही रुपया इन्कमटॅक्स भरावा लागत नाही. काय आहे याचे कारण ?
हे कारण दडले आहे आयकर प्रणालीच्या नियमांत !आयकराच्या  कलम12A च्या अनुसार बीसीसीआयला एकही रुपया इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.बीसीसीआय ही कंपनी नाही.ती एक सामाजीक सेवा संस्था म्हणजे ट्रस्ट आहे.,क्रिकेटचे सामने भरवण्यात बीसीसीआयचा उद्देश खेळाचा प्रसार आणि प्रचार आहे.आणि बीसीसीआय पैशांचा विनियोग खेळाच्या विकासासाठी करते.या तीन कारणांच्या परिघात बीसीसीआय फिट्ट बसत असल्याने ₹ ४८३९० कोटीची कमाई असूनही बीसीसीआयला एकही रुपया इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.

कोर्टाच्या या निर्णयाने इन्कम टॅक्सचा विषयच संपुष्टात आला.

अर्थातच आयपीएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वाढत जाणारे उत्पन्न आयकर खात्याच्या नजरेत खुपायला लागल्यावर आल्यावर त्यांनी बीसीसीआयकडे कर भरण्याच्या नोटीसा पाठवल्या. रिकव्हरी नोटीस जारी केल्या. त्यांच्या मते आयपीएलसारख्या 'फॅशनबाज' सामन्यात जे उत्पन्न होते त्याचाआणि खेळाच्या विकासाचा संबंध नाही.या नोटीसा जारी झाल्यावर बीसीसीआयने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने बीसीसीआय बाजूने निकाल देताना म्हटले
"सकृतदर्शनी, बीसीसीआयने क्रीडा स्पर्धेची रचना अशा प्रकारे केली आहे की ज्यामुळे खेळ अधिक लोकप्रिय होईल, परिणामी त्यास अधिक पैसे देणारे प्रायोजक मिळतील. त्यामुळे क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या उद्देशाचे मूळ वैशिष्ट्य गमावले जात नाही."
आणि कोर्टाच्या या निर्णयाने इन्कम टॅक्सचा विषयच संपुष्टात आला.

 

प्रायोजक इतकी मोठी रक्कम देण्याचे धाडस करतात तरी कसे ?

असे असूनही एक प्रश्न मनात उभा राहतो तो असा की प्रायोजक इतकी मोठी रक्कम देण्याचे धाडस करतात तरी कसे ? याचं कारण फारच सोपं आहे. प्रत्यक्षरित्या प्रायोजक पैसे खर्च करत असले तरी अप्रत्यक्षरित्या आपणच हे पैसे देत असतो. ते कसे तेही आज समजून घ्या.
आपल्यासाठी आयपीएल हा आपल्यासाठी एक रंगारंग कार्यक्रम असतो.घरबसल्या टिव्हीवर- प्रवासात असताना मोबाईलवर- ऑफीसात असलो तर काँप्युटरवर आयपीएलचे सामने आपण बघतच असतो. व्हायाकॉम-18आणि जीओसिनेमाच्या हिशोबाने आयपीएलच्या पहील्या पाच आठवड्यात १३०० कोटी व्हिडीओ व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ व्ह्यूज म्हणजे -सामना चालू असताना आणि नंतर -किती वेळा व्हिडिओ बघीतला जातो ती संख्या.त्यांच्याच दुसर्‍या मापकाने सामना बघणारा सरासरी एक दर्शक एक तास मॅच बघण्यात घालवतो.स्टार चॅनेलच्या हिशोबाने ४८ सामन्यानंतर दर्शकांची संख्या ४५.१ कोटीच्यावर पोहचली आहे. ४८ सामने होईस्तो सर्व दर्शकांनी मिळून २६६०० कोटी मिनिटे सामने बघण्यात घालवली आहे. इतक्या मोठ्या संख्येने दर्शक उपलब्ध असणे म्हणजे जाहिरातदारांना मिळणारी सुवर्णसंधीच असते. ते एका हाताने प्रायोजकांना पैसे देतात आणि दुसर्‍या हाताने जाहिरातीच्या माध्यमातून त्यांचा माल विकतात. थोडक्यात, वरवर बघता फुकट दिसणार्‍या मनोरंजनाची किंमत आपणच भरत असतो.

सबस्क्राईब करा

* indicates required