computer

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी होणार आहे...तिचा गुन्हा वाचून थरकाप उडेल !!

भारतात कोणत्याही स्त्रीची प्रतिमा प्रेमळ, मायाळू, मृदू स्वभाव, कनवाळू वेळप्रसंगी निर्भय, कणखर, शूर, धैर्यवान अशी पाहिले जाते. त्यामुळे कोणत्याही गुन्ह्यामध्ये स्त्रियांची नावं कमी असतात. पण याच प्रतिमेला काळिमा फासणारा अतिशय क्रूर गुन्हा एका महिलेने केला आणि त्याची कठोर शिक्षाही तिला मिळाली आहे.  स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. तिचं नाव आहे शबनम. ती उत्तर प्रदेशची राहणारी आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात.

गुन्हा नेमका काय आहे?

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज स्वीकारलेला नाही. त्यामुळे फाशी द्यायला वेळ लागणार नाही.

गुन्ह्याच्या रात्री काय घडलं?

अमरोहामधील हसनपूरजवळच्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. त्यांचा एवढाच गुन्हा होता की त्यांनी शबनम आणि सलीमच्या प्रेमाला केलेला विरोध.

सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा भयानक निर्णय घेतला. त्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपलेले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया ही देखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाही ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या १० महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने अतिशय निर्दयपणे कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले. हा गुन्हा करताना शबनमचा हात जराही थरथरला नाही.

अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्ष तीन महिने चालली. त्यानंतर १५ जुलै २०१० शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल १०० दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. इतक्या क्रूर कृत्याला लगेचच फाशीची शिक्षा सुनावली गेली.

फाशी कुठे दिली जाणार आहे?

मथुरेतील १५० वर्ष जुन्या वधस्तंभावर ही फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत तिथे  कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधीक्षक असणाऱ्या शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार फाशी कधी देण्यात येणार हे अद्याप ठरलेलं नाही. पण डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर शबनमला लगेच फासावर लटकावले जाईल.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणाऱ्या मेरठच्या पवन जल्लादने या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली. तिथे काही दुरुस्तीची गरज असल्याचे त्याने तुरुंग प्रशासनाला कळवले आहे. फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी बिहारमधील बक्सरमधून मागवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे एक सिद्ध झाले की गुन्हेगार कोणीही असो स्त्री वा पुरुष शिक्षा ही होणारच. कायदा हा सर्वांना सारखाच आहे. तुमचं काय मत आहे?

 

लेखिका:  शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required