computer

दुर्बळ बादशाह शाह आलम आणि गुलाम कादीरच्या सुडाची कहाणी !!

शाळेत असताना कंटाळवाणा वाटणारा इतिहास नंतर त्यातला सुरस आणि चमत्कारिकपणा कळल्यावर एकदम इंटरेस्टिंग वाटायला लागतो. आजही आपण इतिहासातली काही पानं पुन्हा उलगडणार आहोत.

तर, १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. काही इतिहासकारांच्या मते भारताचा मध्ययुगीन इतिहास इथे संपतो. यानंतर मोगल साम्राज्य उतरणीला लागले आणि कंपनी सरकारच्या म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय वर्चस्वाचा उदय झाला. औरंगजेबानंतर गादीवर आलेले मोगल बादशाह दुबळे, अय्याश, चाळेखोर या शब्दांनी वर्णन करण्यासारखेच होते. कधी दुराण्यांच्या मदतीने, कधी ब्रिटिशांच्या सोबत हातमिळवणी करून, तर कधी मराठ्यांच्या संरक्षणाखाली या बादशहांनी आपली गादी टिकवून ठेवली. दरबारी राजकारणात वजीरांचे वर्चस्व वाढीस लागले. ब्रिटिशांच्या कावेबाज कारवायांना ऊत आला!

थोडक्यात, पातशाही संपली. नंतरचा इतिहास म्हणजे फंदफितुरी, विश्वासघात, दिवाळखोरी यांच्या कथांनी भरला आहे. महंमद शाह रंगीले ते वाजीद अली शाह असा हा इतिहासाचा पट आहे. यांपैकी सगळ्यात दुर्दैवी ठरलेल्या शाह आलम (दुसरा) या मोगल बादशहाचा इतिहास हा आज आपल्या लेखाचा विषय आहे. तख्तावर बसलेला बादशहा मनाने दुर्बळ - हतबुध्द असल्यावर इतिहास कसा बदलतो याची ही कथा आहे. 

(शाह आलम)

दुसर्‍या शाह आलमचं दुर्दैव जन्मापासून त्याच्यामागे हात धुवून लागलं होतं. वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत तो त्याच्या चुलत्याच्या म्हणजे महंमद शाह रंगीलेच्या कैदेत होता. शाह आलम हे नाव त्याला फार उशिरा मिळाले. त्याचे मूळ नाव होते अली गौहर!

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लाल किल्ल्याच्या परिसराचे रुपांतर घाणेरड्या झोपडपट्टीसारख्या वस्तीत झाले होते. आधीचे बादशाह, त्यांच्या अनेक राण्या, त्यांची खंडीभर मुलं-पुतणे-भाचे या सर्वांनी मिळेल तसा हा परिसर वाटून घेतला होता. अली गौहरलाच तेरा भाऊ आणि अनेक बहिणी होत्या. केवळ योगायोगाने अली गौहर मोगल बादशहा बनला. अली गौहरचा शाह आलम झाला. पण ही सत्ता फारच मर्यादित होती. सत्तेचे सर्व दोर वजीराच्या हातात होते. यावरून त्याची थट्टा करणारा "सुलतान-ए -शाह आलम, अझ दिल्ली-ता-पालम" म्हणजेच "शाह आलमची सत्ता किती, तर दिल्ली ते पालम इतकीच" असा एक वाक्प्रचार त्याकाळी प्रसिध्द होता.

सांगायचं तात्पर्य हेच की वजीराच्या भीतीने शाह आलम दिल्लीपासून दूरच राहिला. या दरम्यान त्याने अवधचा नवाब शुजा उद्दौला, बंगालचा नवाब मीर कासीम यांच्या सोबत सूत जुळवून घेतले. या पाठिंब्याच्या जोरावर त्याने ब्रिटिशांविरुध्द युध्द पुकारले. या युद्धाची बक्सरची लढाई अशी इतिहासात नोंद आहे. या युध्दात शाह आलम आणि त्याच्या सोबतच्या नवाबांचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे ब्रिटिशांच्या सार्वभौम सत्तेची सुरुवात मानली जाते. या आधी प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांनी केवळ त्यांचे वर्चस्व स्थापित केले होते. पण बक्सरच्या लढाईनंतर संपूर्ण बंगाल आणि ओरिसाचा राजस्व कर म्हणजे महसूली हक्क ब्रिटिशांनी शाह आलमकडून घेतले.

तह झाला. पण शाह आलम पुढची सात वर्षं रॉबर्ट क्लाइव्हच्या कैदेतच राहिला. शेवटी १७७१ साली मराठा सरदार महादजी शिंद्यांनी शाह आलमची सुटका करून त्याला पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर बसवले. पुढची पंधरा वर्षं शीख आणि रोहिल्यांच्या दिल्लीवर स्वार्‍या होत राहिल्या.  या लढायांनी शाह आलम किती दुर्बल होता हेच शाबीत केले. महादजी शिंदे आणि बेगम सामरू या दोघांच्या जोरावर शाह आलम कसेबसे आपले राज्य सांभाळू शकला. 

वाचकहो, मराठा सरदार महादजी शिंद्यांच्याबद्द्ल तुम्ही आम्ही वाचले असेलच.  पण शाह आलमच्या मदतीला येणार्‍या बेगम सामरुबद्द्ल थोडी अधिक माहिती या लेखाच्या निमित्ताने आपण वाचू या! 

बेगम सामरु दिल्लीच्या जवळ असलेल्या एका छोट्या संस्थानाची मालक होती. परधाना हे संस्थान मोगल अधिपत्याखाली असले तरी बेगम सामरुने तिची स्वतंत्र फौज उभी केली होती. या फौजेचा दरारा इतर कोणत्याही फौजेपेक्षा जबरदस्त होता. आधीच्या एका रोहिल्यांच्या आक्रमणात याच फौजेने रोहिल्यांचा पराभव केला होता. एका कोठेवाल्या बाईची ही मुलगी बेगम सामरु कशी झाली ही पण एक विलक्षण कथा आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी दरबारात नाच करणारी ही मुलगी सोंबर नावाच्या फ्रेंच सैनिकाच्या प्रेमात पडली. त्यावरून तिचे नाव बेगम सामरु पडले. सोंबर हा भाडोत्री सैनिक होता. पाटण्याच्या एका लढाईत त्याने १५० ब्रिटिश सैनिकांची कत्तल केली होती. म्हणून त्याला पाटण्याचा खाटीक असं नाव मिळालं होत. अशा सैनिक पतीच्या हाताखाली बेगम सामरु एक उत्कृष्ट सेनापती झाली. रोहिल्यांच्या पहिल्या आक्रमणात तिने रोहिल्यांचा पराभव केला.

१७७७ साली शाह आलमच्या फौजेने रोहिल्यांचा पुन्हा एकदा पराभव केला आणि लगेच दोन वर्षांत १७७९ साली रोहिल्यांच्या अंमलाखाली असलेला प्रदेश जिंकण्यासाठी त्याने रोहिलखंडावर स्वारी केली. रोहिल्यांचा नायक झबीता खान आणि त्याच्या कुटुंबाला कैदेत टाकण्यात त्याला यश आले. शाह आलमच्या विनाशाची ही सुरुवात होती असे म्हणावे असे कृत्य त्याच्या हातून या वेळी घडून आले. झबीता खानच्या गुलाम कादीर नावाच्या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले. त्या गोंडस दिसणार्‍या मुलाला त्यानी ताब्यात घेऊन त्याचे लैंगिक खच्चीकरण केले.

त्याकाळी जनानखान्यात अशा खच्ची केलेल्या नोकरांना सेवेत ठेवण्याची ही अत्यंत घृणास्पद प्रथा होती. पण शाह आलमचे वर्तन इतकेच मर्यादित नव्हते. एरवी कवीमनाचा बादशाह म्हणून प्रसिध्द असलेल्या बादशाहने या मुलाचा लैंगिक संबंधांसाठी वापर केल्याचा  इतिहासात उल्लेख आहे. अशा अनैसर्गिक लैंगिक संबंधातून गुलाम कादीरला कायम 'उबनाह' म्हणजे पार्श्वभागाला कंड येण्याचा आजार जडला होता. विचार करा, दहा-बारा वर्षांच्या कोवळ्या मुलाला तेव्हा किती यातना झाल्या असतील!! यानंतर गुलाम कादीरच्या आयुष्याचे एकच ध्येय होते- शाह आलमला संपवणे!!

पुढच्या काही वर्षांतच गुलाम कादीरने सैन्य जमवून शाह आलमवर हल्ला करायला सुरुवात केली. पहिल्या हल्ल्यात बेगम सामरुच्या सैन्याने त्याचा पराभव केला. पण त्यानंतरच्या हल्ल्यात मात्र त्याने पूर्ण ताकद एकवटून हल्ला केला. यावेळी शाह आलमच्या मदतीला पुन्हा एकदा बेगम सामरु धावून आली. पण तिचा अंदाज चुकला. यमुनेच्या बाजूने आलेल्या सामरुच्या फौजेला हल्ला परतवण्यासाठी योग्य दिशाच मिळाली नाही. याच दरम्यान शाह आलमचा किल्लेदार फितूर झाला. किल्ल्यात गुलाम कादीरचे सैन्य घुसले आणि शाह आलमला कैद करून गुलाम कादीर गादीवर बसला.

पुढच्या दहा आठवड्यात त्याने त्याच्यावर लहानपणी झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. त्याच्या अंदाजाप्रमाणे कमीतकमी २५ कोटी रुपये बादशहाच्या तिजोरीत असायला हवे होते. पण ते मिळाले नाहीत म्हटल्यावर त्याने किल्ल्याची भिंत अन् भिंत खणून काढली. हे केल्यावरही त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही. तेव्हा त्याने शाह आलमच्या जनानखान्यातल्या बेगमांचे दागिने हिसकावून घेतले. त्यांना भर दरबारात नग्न करून नाचायला लावले. ज्या बेगमांना या अपमानाला सामोरे जावे लागले त्यांनी यमुनेत उड्या मारून आत्महत्या केल्या. गुलाम कादीर इथेच थांबला नाही. त्याने नोकराचाकरांच्या हत्या केल्या. त्यांच्या प्रेतांना दफन न करता प्रेतं दरबारात सडू दिली. शेवटी शाह आलमच्या डोळ्यात सुया खुपसून त्याला आंधळं करण्यात आलं. हे करूनही त्याचं समाधान झालं नाही. त्याने शाह आलमचे डोळे खोबणीतून बाहेर काढले. दरबारात एका चित्रकाराल बोलावून हा प्रसंगही चित्रित करून घेतला. आंधळ्या शाह आलमला कैदेत टाकले.

(अंध शाह आलम)

महादजी शिंदे या दरम्यान चंबळच्या परिसरात दुसर्‍या कारवाईत गुंतले होते. दहा आठवड्यानंतर शिंद्यांची फौज दिल्लीकडे येते आहे हे कळल्यावर गुलाम कादीरने खजिन्यासकट मथुरेला पळ काढला. थोड्याच दिवसात महादजी शिंद्यांनी गुलाम कादीरला ताब्यात घेतले. इथे सूडाचा शेवटचा अंक सुरु झाला. गुलाम कादीरचे ओठ कापून बादशहाला भेट करण्यात आले. महादजी शिंदेंना लूटलेला खजिना वसूल करायचा होता.  पण शाह आलमला हा वेळेचा अपव्यय वाटत होता. शेवटी गुलाम कादीरचे डोळे जेव्हा बादशाहच्या समोर भेट करण्यात आले तेव्हा हे सूडनाट्य संपले!!!

या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे  औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे बादशहा गादीवर आले, ते केवळ दुर्बळ, अय्याश, चाळेखोर होते. शाह आलम पुन्हा गादीवर बसला याला काहीच महत्व  नव्हते. मात्र मोगल जेव्हा हा इतिहास घडवत होते तेव्हा ब्रिटिश हळूहळू सार्वभौमत्वाच्या मार्गावर पुढे जात राहिले आणि पुढची कित्येक वर्षे त्यांचं भारतावरचं वर्चस्व तसंच राहिलं.

सबस्क्राईब करा

* indicates required