शशिकांत धोत्रे: महाराष्ट्रातल्या अस्सल ग्रामीण जीवनाला जिवंत करणारा कलाकार !!

शशिकांत धोत्रे हा सोलापूरच्या शिरापूर गावच्या एका पाथरवटाचा मुलगा. आज चित्रकलेच्या जगात मोठं नांव कमावून आहे. पाथरवट म्हणजे काय हे ही कदाचित शहरी मुलांना माहित नसेल. पाटा-वरवंटा, खलबत्ता हे सगळे दगडांतून हातोडा-छिन्नी वापरून बनवणारे कलाकार असतात, त्यांना पाथरवट म्हणतात. एक नग घडायलाही बराच वेळ लागतो. वजनामुळे त्यातले मोजकेच जिन्नस डोक्यावर घेऊन हे लोक गावांत विकायला घेऊन येत असत. आता यांत्रिकीकरणामुळे ही कला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. नागराज मंजुळेंचा ’पिस्तुल्या’ हा लघुपट अशाच लोकांच्या जीवनावर आधारित आहे.
एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शशिकांत धोत्रे म्हणतात, " संकट, संघर्ष आणि दारिद्र्य माझी प्रेरणा. सध्या आहे त्याहूनही अधिक दारिद्र्य कदाचित येऊ शकतं, पण तरीही त्यातून वाट काढण्याची सकारात्मकता आपल्याकडे असायला हवी". ज्या काळात चित्रकला किंवा एकंदरीतच कला हे एक आपलं जगण्याचं साधन होईल हे माहित नसतानाही पेन्सिलीसारख्या साधनासोबत शशिकांत आपली चित्रकला जोपासत राहिले.
गोधडी शिवणार्या ग्रामीण स्त्रिया
शशिकांत धोत्रेंच्या चित्रांत ग्रामीण महाराष्ट्र प्रामुख्याने दिसतो. त्यातही काळ्याशा पार्श्वभूमीवर असणार्या दैनंदिन कामांत गढलेल्या स्त्रिया ही त्यांची खासियत.
मेंदी काढणार्या स्त्रिया
मेंदी काढणार्या आणि काढून घेणार्या स्त्रियांच्या वेगवेगळ्या पोझेस आणि भाव अगदी पाहण्यासारखे आहेत.
फुलं ओवणार्या मुली

फक्त महाराष्ट्रीय पेहरावच नाही, एकूणातच बारकावे चित्रांत सुस्पष्टपणे दाखवणं हे धोत्रेंच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे.
राजस्थानी स्त्री
शशिकांत धोत्रेंनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांना महाराष्ट्र जसा चित्रांतून दाखवला आहे, तसा पूर्ण भारत त्यांना चित्रित करायचा आहे. त्यांना अशा चित्रांचं प्रदर्शन युरोपात भरवायचं आहे. आता फक्त महाराष्ट्रातल्या किंवा भारतीय रसिकांना उपलब्ध असलेला खजिना देशोदेशीच्या लोकांना खुला होईल.
गाण्याची कहाणी
पुन्हा एकदा नजर त्यांच्या मराठी मातीतल्या चित्रांवर जातेच. सोलापूर भागात नेसल्या जाणार्या इरकली साड्या, त्यांचे काठ किंवा खोचलेला पदर सोडल्यावर त्यावर दिसणार्या सुरकुत्या हे सगळं पेन्सिलीच्या माध्यमातून धोत्रे कसे रंगवत असतील याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. या चित्राला त्यांनी ’गाण्याची कहाणी’ असं नांव दिलंय.
भाजी निवडणारी स्त्री
कलेला साधनं, माध्यम, उपलब्धता असं कशाचं बंधन नसतं हेच खरं. त्यांना लहानपणापासून पेन्सिल हेच एक साधन उपलब्ध असायचं. साधारण ८-९ वर्षांचे असतानापासून ते पेन्सिलच्या माध्यमातून चित्रे काढत राहिले. आणि आज ते पेन्सिल या माध्यमाचे बादशाह आहेत.
इल्कल साडीतलं सौंदर्य
त्यांच्या तालुक्याच्या गावी मोहोळ इथे त्यांनी आर्ट गॅलरी काढली आहे आणि तिथे ते चित्रकलेत रूची असलेल्या मुलांना मार्गदर्शन करतात. हळूहळू त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधून अशा आर्ट गॅलरीज चालू करायच्या आहेत.