मरण्याच्या १८ तास आधी तिने केलं लग्न...वाचा ही प्रेमाची अनोखी गोष्ट !!

डेविड मोशर आणि हेदर लिंडसे या दोघांनी अमेरिकेच्या न्यूजर्सी इथं लग्न केलं. आता लग्न तर रोजच होत असतात, पण यांच्या लग्नाबद्दल एवढी चर्चा का? कारण मंडळी, हे लग्न खास होतं.
तर, २२ डिसेंबर रोजी डेविड मोशेर आणि हेडर लिंडसे यांचं लग्न झालं. लग्नाचा मंडप होता सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल. वराती होते हॉस्पिटल मधले डॉक्टर्स, नर्स आणि काही निवडक नातेवाईक. लग्न पार पडलं आणि १८ तासांनी हेदरने प्राण सोडला.
डेविड मोशर आणि हेदर लिंडसे यांची ओळख २०१५ साली एका डान्स क्लासच्या निमित्ताने झाली होती. डेविडने २३ डिसेंबर २०१६ रोजी तिला प्रपोज करायचं ठरवलं, पण प्रपोज करण्याआधीच तिला झालेला ब्रेस्ट कॅन्सर किती घातक आहे हे त्याला समजलं. पण तिच्या कॅन्सरबद्दल समजूनसुद्धा त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिने होकार दिला. पुढे तिच्यावर उपचार सुरु झाले. दोघांनी ३० डिसेंबर २०१७ ही लग्नाची तारीख ठरवली. पण २०१७ च्या अखेरपर्यंत हेदरचा कॅन्सर इतका पसरला, की त्यांना २२ डिसेंबरला लग्न करावं लागलं.
ऑक्सिजन मास्क आणि लग्नाच्या गेटअपमध्ये हेदरने शेवटच्या घटका मोजत लग्न केलं. यावेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे तिला लग्नाचे वचनदेखील देता आले नाहीत. तरीही शेवटच्या प्रयत्नाने तिने जे वचन म्हटले, ते तिच्या आयुष्यातले अखेरचे शब्द ठरले. या लग्नाचे फोटो बघितल्यावर आपल्याला जाणवतं की ती लग्नाच्या वेळी किती खुश होती.
हेदर त्यानंतर १८ तासांनी मरण पावली. तिने म्हटल्याप्रमाणे ‘तुमचं प्रेम जिवंत असेपर्यंत तुम्ही कधीही मरू शकत नाही!!’