computer

अमेरिकेच्या अणुस्फोट प्रयोगांनी बिकिनी आयलंडवरील रहिवाश्यांना कायमचं देशोधडीला कसं लावलं?

बिकिनी म्हटल्यावर कुणालाही पटकन स्विमवेअर आठवतं. सिनेमात हॉट आणि बोल्ड असं दृश्य म्हणजे बिकिनीतल्या नट्या हे तर समीकरणच होतं पूर्वी! पण बिकिनी या शब्दाला अजून एक संदर्भ आहे. बिकिनी हे नाव एका बेटांच्या समूहाचे आहे. या बेटावर पहिला प्रायोगिक अणुस्फोट करण्यात आला होता. त्यानंतर ही जागा नियमित अणुस्फोटाच्या प्रयोगांसाठी वापरली गेली. पण या बेटांवरचे मूलनिवासी कुठे गेले? त्यांना अमेरिकन सरकारने कुठे नेऊन ठेवले? त्या विस्थापितांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले याबद्दल फारच कमी लिहिले गेले. बोभाटाच्या आजच्या लेखात या विस्थापितांच्या वेदनांचा आलेख मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

विस्थापितांच्या वेदनेची जातकुळीच वेगळी असते. आपण जिथे रुजलो आहोत तिथून समूळ उखडल्यावर पुन्हा दुसरीकडे त्याच नैसर्गिकतेने रुजणं आणि जोमाने फोफावणं (विशेषतः हे सर्व दुसऱ्याच्या इच्छेने त्याच्या सोयीसाठी होत असताना) सुसह्य नसतं. आपल्याकडे नर्मदा बचाओ आंदोलन, कोयना धरण विस्थापितांचा लढा, मुळशीचा सत्याग्रह, जैतापूर प्रकल्पाला झालेला विरोध ही सर्व विस्थापितांच्या संघर्षाचीच उदाहरणं आहेत. पण विस्थापितांच्या पदरी हवं ते पडतंच असं नाही. बिकिनी बेटाची कथा याच वर्गात मोडते.

पॅसिफिक महासागरात बिकिनी ही प्रवाळ बेटं आहेत. ही बेटं मार्शल आयलंड्स नावाच्या बेटांच्या समूहाचा एक भाग आहेत. बिकिनी बेटं या बेटांच्या मुख्य भागापासून दूर, आणि त्यामुळे काहीशी तुटल्यासारखी होती. कदाचित म्हणूनच इथले रहिवासी एकमेकांशी जास्तच घनिष्ठ संबंधाने जोडलेले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मार्शल आयलंड्सवर जपानने ताबा मिळवला. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जपानने येथे आपला लष्करी तळ उभारला. अमेरिकेपासून या बेटांचं संरक्षण करण्यासाठी आणि ती अमेरिकेच्या ताब्यात जाऊ नयेत म्हणून जपानने बिकिनी बेटांवर टेहळणीसाठी वॉच टॉवर उभारायचं ठरवलं. मात्र १९४४ च्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने क्वाजेलेईन हे मार्शल आयलंड्सवरील महत्त्वाचं बेट ताब्यात घेत जपानच्या सत्तेला धक्का दिला

पुढे महायुद्ध संपल्यावर १९४५ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमनने अमेरिकन लष्कर आणि नौदल यांना अण्वस्त्र चाचण्या करण्याची सूचना दिली. त्यासाठी बिकिनी बेटाची निवड करण्यात आली. इथल्या मूळ रहिवाशांना अण्वस्त्र चाचण्या मानवतेच्या कल्याणासाठी करण्यात येत आहेत असं सांगून त्या पूर्ण होईपर्यंत तात्पुरतं दुसरीकडे विस्थापित होण्याची विनंती केली गेली. मनाची चलबिचल, अनिश्चितता आणि गोंधळ अशा अवस्थेत इथल्या १६७ रहिवाशांनी बेटाला रामराम ठोकला. त्यांची रवानगी १२५ मैल दूरवर रॉंजेनिक या बेटावर केली गेली.

(बिकीनीच्या १६७ रहिवाशांनी बिकिनी बेट सोडलं तो दिवस)

राहायला पुरेशी जमीन नाही, पाण्याचं दुर्भिक्ष्य, अन्नाची कमतरता अशा आव्हानांचा सामना करत हे रहिवासी जगू लागले. हे बेट दुष्ट आत्म्यांनी झपाटलेलं आहे अशीही अफवा होती. अपुऱ्या अन्नामुळे इथे बिकिनीवरच्या रहिवाशांची (बिकिनीयन्सची) उपासमार होऊ लागली. त्यांनी अमेरिकेकडे बिकिनीला परत जाण्यासाठी विनवण्या सुरू केल्या. सुरुवातीला अमेरिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. पण परिस्थिती फारच बिघडली आणि अमेरिकन नौदलाची चांगलीच छी: थू झाली तेव्हा अमेरिकेने त्यांना तिथून हलवायचं ठरवलं. इथून पुढे सतत हे लोक इकडून तिकडे स्थलांतर करत राहिले. अमेरिकेच्या सोयीनुसार, मर्जीनुसार हलत राहिले. त्यांचं आरोग्य, राहणीमान, संस्कृती सगळंच धोक्यात आलं. 

(रॉंजेनिक बेटावर नवी सुरुवात)

पण बिकिनी बेटाच्या हालअपेष्टा एवढ्यात संपणार नव्हत्या. १ मार्च १९५४ या दिवशी बिकिनी बेटांवर चाचणीदरम्यान हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. हा बॉम्ब हिरोशिमा - नागासाकीवर पडलेल्या बॉम्बच्या वीसपट शक्तिशाली होता. त्याच्यातून जे रेडिएशन बाहेर पडलं त्याचे परिणाम बिकिनीबरोबर आसपासच्या बेटांवरच्या रहिवाशांनाही भोगावे लागले. उलट्या, डायरिया, त्वचाविकार, केस गळणे यांशिवाय अनेक तीव्र स्वरूपाच्या आजारांनी ते हैराण झाले. 

(१ मार्च १९५४ - हायड्रोजन बॉम्बचा स्फोट)

अनेक वर्षं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टोलवल्यानंतर अखेर १९६८ मध्ये अमेरिकेने बिकिनीयन्सना त्यांच्या मायभूमीकडे परत नेण्याचं आश्वासन दिलं. हे बेट 'राहण्यायोग्य' बनवण्यासाठी तिथे किरणोत्सर्गी कचरा हटवण्यासाठी स्वच्छता मोहीम, झाडांची लागवड, घरं बांधणं हा कार्यक्रम हाती घेतला गेला. दरम्यान इथे ३ कुटुंबं राहायलाही आली. पण या जागेचे दुर्दैवाचे फेरे संपले नव्हते. इथली जमीन, माती, पाणी, झाडंझुडपं इतकंच काय तर खेकड्यांच्या शरीरावरचं कवच आणि मानवी मूत्र यांतही किरणोत्सर्गी पदार्थांचे अवशेष आढळत होते. यापुढे इथे राहणं धोक्याचं होतं. अमेरिकेने नीट काळजी न घेता केलेल्या प्रायोगिक अणुस्फोटांचे परिणाम इथल्या रहिवाशांना भोगावे लागत होते. आपल्या मायभूमीकडे परतण्याचं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार हे नक्की झालं होतं. 

आज हे बिकिनीयन्स मार्शल आयलंड्सवर विखुरलेले आहेत. कधीतरी आपण नाहीतर आपली भावी पिढी आपल्या स्वच्छ, सुंदर मातृभूमीकडे परतू, पूर्वीसारखंच नैसर्गिक, साधंसरळ आयुष्य जगू अशी त्यांना अजूनही आशा आहे.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required