श्रवण राठोड यांचं निधन....नदीम-श्रवण जोडीने दिलेली १० सुपरहिट गाणी ऐकलीत का?
९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये आपल्या सुमधुर संगीताने वेड लावणारी संगीतकार जोडी म्हणजे नदीम-श्रवण. या जोडीतल्या श्रवण राठोड यांचे ६६ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ते काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते.
बॉलीवूडच्या ९० च्या काळाबद्दल विचार केला तर या जोडीने ज्या चित्रपटांना संगीत दिलं ते चित्रपट हिट असो वा नसो पण गाणी १०० टक्के हिट असायची. श्रावण यांच्या जाण्याने आज या जोडीच्या गाण्यांची आणि त्यांनी केलेल्या जादूची पुन्हा एकदा आठवण होते. यानिमित्ताने आजच्या लेखातून या सुप्रसिद्ध जोडीच्या सुपरहिट चित्रपटांची आणि गाण्यांच्या आठवणी जागवूया.
आशिकी चित्रपटातील गाणी नदीम-श्रवण जोडगोळीने संगीतबद्ध केली होती. या चित्रपटातल्या गाण्यांनी अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांना खरी ओळख 'आशिकी'चित्रपटाने मिळवून दिली. कुमार सानू, उदित नारायण, अलका यादनिक या तिघांचा आवाज आणि नदीम-श्रवण यांचे संगीत हा सुपरहिट फॉर्म्युला झाला होता. ९०च्या दशकात कॅसेटचा जमाना होता. सगळीकडे कॅसेटवर गाणी ऐकली जायची. रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये स्पीकरवर गाणी वाजवली जायची. घरोघरी टेप रेकॉड्सही आले होते. मोठ्याने गाणी ऐकणे ही तेव्हा फॅशन होती. 'तू मेरी जिंदगी है', 'धीरे धीरे से मेरी', 'एक ऐसी लडकी थी' ही गाणी तरुणाईला तोंडपाठ झाली होती.
'जीना सीख लिया'मधून त्यांनी बॉलिबूडमध्ये पदार्पण केले होते. टी सिरीजच्या गुलशनकुमार यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. आशिकीनंतर ‘साजन’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फुल और कांटे’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘राज’, ‘दिलवाले’, 'परदेस', ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटाला या जोडीने संगीत दिले होते. या सर्व चित्रपटातली गाणी त्या दशकात सूपरहिट होती. चित्रपट हिट करण्यात संगीताचाही मोठा वाटा असतो. सलमान, अजय देवगण, आमीर खान, शाहरुख खान यांचा तो काळ होता. त्यांची गाणी हिट करण्यात या संगीतकारांनी मोठा हातभार लावला. अनुराधा पौडवाल, सोनू निगम यांचेही नाव या चित्रपटातून झाले.
आता पाहूया या जोडीने दिलेली १० सुपरहिट गाणी
१. तू मेरी जिंदगी है (आशिकी)
२. दिल है के मानता नहीं (दिल है के मानता नहीं),
कितना हसीन चेहरा (दिलवाले)
हमको सिर्फ तुमसे प्यार है (बरसात)
मैने प्यार तुम्हींसे किया है (फुल और कांटे)
बहुत प्यार करते है (साजन)
तुम दिल की धडकन (धडकन)
सोचेंगे तुम्ह प्यार (दिवाना)
मेरा दिल भी (साजन)
ऐसी दिवानगी (दिवाना)
अशी आणखी कितीतरी हिट गाणी सांगता येतील. तुमचे यातील आवडते गाणे कोणते? कमेंट करून नक्की सांगा.
श्रवण राठोड यांना बोभाटाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखिका: शीतल दरंदळे




