computer

एक दिवसाची मासेमारीची सहल आठ दिवसांच्या तहान-उपासमारीमध्ये बदलते तेव्हा काय होते?

करायला गेलो गणपती आणि झाला मारुती ही म्हण तुम्ही कुठे तरी ऐकली असेल. याचा अर्थ काय तर आपण मनात एक हेतु ठेवून काहीतरी करायला जातो आणि निष्पन्न होतं ते काही तरी दुसरंच. अर्थात एखादं चित्र बिघडतं किंवा एखादी रेसिपी बिघडते इथपर्यंत ठीक आहे, पण समजा तुम्ही दोन दिवसांच्या प्रवासासाठी म्हणून निघलात आणि ठरलेल्या दिवसात तुम्ही ठरलेली ठिकाणे पाहण्याऐवजी रस्ता चुकून भलतीकडेच भरकटलात, एखाद्या अनोळख्या आणि निर्मनुष्य प्रदेशात शिरलात तर काय होईल? कल्पना करूनच डोळे पांढरे होतील. हो ना? पण मंडळी हे जग असं आहे ना, की इथे आपल्याला कल्पनाही करवणार नाहीत आशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच एक कल्पनेपलिकडची गोष्ट घडली आहे, एक पाच वर्षाची मुलगी आणि तिच्या वडीलांसोबत. त्यांची गोष्ट वाचल्यानंतर खरोखरच तुम्हाला धक्का बसेल. एक पाच वर्षांची मुलगी आपल्या वडिलांकडे फिरायला जाण्याचा हट्ट करते, (लहान मुळे घरात असली की, असे हट्ट हे फार सामान्य बाब आहे) तिचा हट्ट पुरवण्यासाठी म्हणून तिचे बाबा तिला फिरायला घेऊन जातात. आपले बाबा मासेमारीत निष्णात आहेत हे त्या पाच वर्षाच्या मुलीला माहीत असते म्हणून ती बाबांना आपल्यालाही मासेमारी शिकवण्याचा हट्ट करते. आता लेकीचे हट्ट पुरवणार नाही तो बाप कसला? मग फिरायला म्हणून बाहेर पडलेले हे बाप-लेक मासेमारी करण्यासाठी म्हणून जंगलात शिरतात. इथवर तर सगळं ठीक आहे, पण मासेमारी करायला गेलेले हे बाप-लेक स्वतःच नियतीच्या क्रूर खेळाचा शिकार होतात. मासेमारी करून परतायला फार तर संध्याकाळ व्हायला हवी होती. पण या बाप-लेकीवर अशी काही वेळ येते की, त्यांना परतायला चक्क आठ दिवस लागतात.

मग या आठ दिवसांत यांच्यासोबत काय घडलं होतं? मॅथ्यू मॅकफ आणि त्याची पाच वर्षाची मुलगी शॅनन यांची ही सत्य घटना खास बोभाटाच्या वाचकांसाठी देत आहोत.

साल होतं १९९८. मॅथ्यू आणि शॅनन ऑस्ट्रेलियातील एका वाळवंटात फिरायला गेले होते. शॅननला मॅथ्यूकडून मासेमारी शिकायची होती. वाळवंटात काही अंतर जाताच मॅथ्यूची गाडी पंक्चर झाली. ती ही अशा निर्मनुष्य ठिकाणी की त्याला मदतीसाठीही कुणाचा धावा करता येत नव्हता. कदाचित एखादी येणारी-जाणारी गाडी आपल्याला दिसेल आणि आपल्याला मदत मिळेल या आशेने तो तिथेच बसून राहीला. एक दिवस, दोन दिवस झाले त्या वाटेवर कुणीही आले नाही. वाळवंटात ज्या ठिकाणी त्याची गाडी पंक्चर झाली होती तिथे त्याच्या फोनला रेंजही नव्हती. तसेही संध्याकाळी परत मासे घेऊन परत घरी जायचे या विचाराने बाहेर पडलेल्या त्या दोघा बाप-लेकीजवळ खाण्यासाठीही पुरेसे काही पदार्थ नव्हते. दोन दिवस, तेही १०० डिग्री फॅरेनहाइट तापमानात अर्धपोटी राहिल्यानंतर दोघांची अवस्था अतिशय बिकट झाली. भुकेने व्याकुळ झालेल्या शॅननचा चेहरा मॅथ्यूला अजिबात पाहवत नव्हता. शॅननला आपण कोणत्या बिकट प्रसंगात सापडलोय याची कल्पनाही नव्हती. तिच्यासाठी कुठे पाणी तरी मिळते का हे शोधण्यासाठी आता मॅथ्यू वणवण भटकू लागला. पण दुर्दैव! त्यांना पाणी तर मिळत नव्हतेच, पण त्या ऊन्हातून आणि वाळवंटातून भटकून त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ लागले. एका क्षणी मॅथ्यूला असेही वाटले की ते दोघे आता जिवंत राहणार नाहीत. तहानेनेच त्यांचा जीव जाईल. पण दोघांपैकी आधी कोण मरेल हा प्रश्न मनात आला की त्याच्याही अंगावर काटा येई. शॅनन आधी गेली तर आपल्याला बघवणार नाही आणि आपण आधी गेलो तर आशा निर्जन ठिकणणी शॅनन एकटी करील तरी काय? जीव अगदी तोळामासा होत होता. शॅनन तहानेने अर्धमेली झाली होती.
तो शॅननला म्हणाला देखील आपण मेलबर्नला परत जाऊन तुझ्या मम्मीला भेटण्याची शक्यता फार कमी आहे, पण छोट्या शॅननला बाबा काय म्हणतोय हेच कळत नव्हतं आपला बाबा आपल्या सोबत आहे एवढंच दिलासा तिला पुरेसा होता. कदाचित आपण घरी जाणारच नाही, पण निदान जेव्हा आपले मृतदेह आपल्या बायकोला मिळतील तेव्हा तिच्यासाठी काही संदेश लिहून ठेवावा म्हणून तिथेच पडलेल्या काठीने त्याने वाळूत कोरून ठेवले, "आम्ही एकत्र खेळलो, हसलो, राहिलो, रडलो, आणि आता आम्ही दोघेही एकत्र मारणार आहोत. गुड बाय. आमचे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे."

दिवसमागून दिवस जात होते, हळूहळू दोघेही मरणाच्या दारात पोहोचत होते. पोटात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही नसलेली शॅनन निपचित पडली होती. तेव्हा किमान तिला थंडावा तरी मिळवा म्हणून मॅथ्यूने तिला गळ्यापर्यंत वाळूत पुरून ठेवले. चालत चालत तो थोडा पुढे गेला तेव्हा त्याला एक रस्ता दिसला. आता त्याला थोडी आशा वाटू लागली. कदाचित या रस्त्यावरून एखादी गाडी येईल आणि आम्ही आपल्या माणसात पुन्हा परतू असा एक आशादायी विचार त्याच्या मनात येऊन गेला.

आठ दिवस निर्जन वाळवंटात आपल्या मुलीला जगवण्यासाठी एका बापाची चाललेली धडपड पाहून नियतीचेही काळीज विदीर्ण झाले असेल. या आठ दिवसात शॅननला शुद्ध राहावी म्हणून मॅथ्यूने तिच्या तोंडात शू सुद्धा केली होती. कारण त्याच्याजवळ पाण्याचा स्त्रोतच नव्हता. एक अभागी, हतबल बापाची ही धडपड पाहून शेवटी नियतीलाच दया आली आणि मॅथ्यू ज्या रस्त्यावर डोळे लावून बसला होता त्या रस्त्याने एक गाडी येताना त्याला दिसली. त्याने पटकन आपला शर्ट हवेत फिरवत आपण या रस्त्यावर अडकलो असल्याची कल्पना त्या गाडीवानाला दिली. त्याही बिचाऱ्या भल्या गृहस्थाने मॅथ्युला पाहून गाडी थांबवली. एक गाडी आपल्या दिशेने येत आहे हे पाहताच मॅथ्यूने शॅननला घट्ट मिठी मारली, आता आपण लवकरच मम्माला भेटू असं तो म्हणाला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनसा झाला होता. त्या गाडीवाल्याकडे मॅथ्यूने पाणी मागितले, पाणी मिळताच फक्त पाच मिनिटांत त्याने संपूर्ण आठवड्याची तहान भागवली. शॅनन तर पाच मिनिटांत पाच लीटर पाणी प्यायली होती असं तो सांगतो. आठवडाभराच्या त्या भयाण अनुभवानंतर मॅथ्यू आणि शॅनन घरी पोहोचले.

या आठवडाभरात त्याच्यावर कोणते प्रसंग ओढवले, आपणाला कुणीतरी पाहावे म्हणून त्याने काय काय प्रयत्न केले हे सगळे मॅथ्यूने एक डायरीत नोंदवले आहे. शॅनन तर लहान होती. पण या आठवड्याचा तिच्या शरीरावर आणि मनावरही खोल परिणाम झाला होता. अर्थात काळासोबत सर्व घाव भरून निघतात असे म्हणतात, कदाचित शेनॉनच्या बाबतीतही असेच काही घडले असेल. पण अजूनही तिच्या बाबाने त्या आठ दिवसांत लिहिलेली डायरी ती आवर्जून वाचते. आपण कोणत्या प्रसंगातून तरुन निघालो याचे तिला आज आश्चर्य वाटते.

या प्रसंगानंतर मॅथ्यू आणि शॅनन यांची मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी लोकांची रांग लागलेली असायची. त्यांची ही कथा डॉक्युमेंटरीच्या रूपातही जगासमोर आली आहे.
अशाही प्रसंगात मॅथ्यूने दाखवलेली हिंमत आणि शॅननचा निष्पापपणा, तिची निरागसता मनाला चटका लावून जाते हे नक्की. अशीवेळ पुन्हा कधीच कुणावरही न येवो, हीच प्रार्थना!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required