computer

माणूस का घोरतो? ते कमी कसं करता येतं? घोरण्याचा आणि वयाचा काही संबंध असतो?

झोपलेलं असताना कधीतरी अचानक आजूबाजूला कुणाच्यातरी घोरण्याच्या त्रासदायक आवाजाने जाग येते. असं कधी घडलं आहे का कोणासोबत? कधीकधी तर एकदा झोपमोड झाली की नंतर या चित्रविचित्र आवाजांमुळे झोपच लागत नाही! पण मुळात घोरणं म्हणजे काय?

झोपलेलं असताना कधीतरी अचानक आजूबाजूने घोरण्याचा डोक्यात जाणारा आवाज येतो आणि जाग येते. बरं, या आवाजाचीही एक लय असते, घुरर्र-खुर्रर्र, घुरर्र-खुर्रर्र अशी. एरवीच्या रात्रीच्या शांत वातावरणात हा आवाज फारच विचित्र वाटतो. लग्नमंडपात झोपलेल्यांमध्ये हमखास एक तरी घोरणारा असतोच! इतरांची झोपमोड करून त्यांच्या शिव्या खात हे महाशय मस्त आपल्याच धुंदीत चित्रविचित्र आवाज करत निद्राधीन झालेले असतात. बाकीच्यांची रात्र मात्र 'करवटें बदलत' सरते. पण घोरणाऱ्या माणसांच्या नावाने शंख करण्याआधी मुळात घोरणं म्हणजे काय, आणि त्यामागची कारणं हे समजून घ्यायला हवं.

घोरताना घोड्याच्या आवाजासारखा आवाज येतो. हा आवाज अतिशय कर्कश्श असतो. हवा घशातील सुस्तावलेल्या टिश्यूज(ऊतीं)मधून वाहून नेली जाते तेव्हा त्यांच्यामध्ये व्यक्तीच्या श्वासोच्छवासामुळे कंपनं तयार होतात आणि या आवाजाची निर्मिती होते. असं म्हटलं जातं की जवळपास प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधीतरी घोरतोच! परंतु काही लोकांच्या बाबतीत मात्र ही एक मोठी समस्या बनून राहते. जीवनशैलीतील बदल उदा. वजन कमी करणं, झोपण्यापूर्वी अल्कोहोल सेवन टाळणं या छोट्या छोट्या गोष्टींमुळे घोरणं थांबायला मदत होते. याव्यतिरिक्त काही वैद्यकीय उपकरणं, शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकतात.

बहुतांश वेळा घोरणं हे झोपेच्या समस्येशी निगडीत असतं. या समस्येला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अप्निया (ओएसए) म्हणतात. या आजारात घशातील स्नायू आकुंचन पावल्यामुळे श्वसन काही काळासाठी बंद होतं. परिणामी झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. पण सगळ्यांनाच ओएसएची समस्या असते असं नाही. जर घोरणं ओएसएशी संबंधित असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो.

घोरण्याची लक्षणं कोणती?

- दिवसा अतिप्रमाणात झोप येणं.
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं.
- सकाळी डोकेदुखीचा त्रास होणं.
- सकाळी उठल्यावर घसा बसणं.
- अस्वस्थ झोप.
- रात्री धाप लागणं, रात्रीच्या वेळेला छातीत दुखणं, .
- उच्च रक्तदाब.

याखेरीज लहान मुलांना,

- लक्ष देण्याचा कालावधी कमी असणं.
- वर्तनातील बदल.
- शाळेत खराब कामगिरी.
यासारख्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं.

झोपेत श्वास अनेकदा आणि मध्येच थांबणं हा पॅटर्न रात्रीच्या वेळी वारंवार घडतो. ओएसएने ग्रस्त असलेले लोक अनेकदा त्यांचा श्वासोच्छवास मंदगतीने चालल्याचा किंवा पाच मिनिटांसाठी बंद झाल्याचा अनुभव दर तासाला घेत असतात.

घोरण्याला तोंडाची आणि सायनसची अंतर्रचना, मद्यसेवन, एलर्जी, वाढलेलं वजन अथवा लठ्ठपणा, अतिशीत तापमान असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. झोपेदरम्यान टाळू, जिभ, घसा यांचे स्नायू शिथिल होतात. तेव्हा श्र्वसनमार्गात अंशतः अडथळा निर्माण होतो आणि परिणामी कंपनं निर्माण होतात. श्र्वसनमार्ग जेवढा अरुंद तेवढा हवेचा झोत जास्त जोरात आतमध्ये येतो. यामुळे ही कंपनं वाढतात आणि घोरण्याचा आवाजदेखील मोठा येतो. याव्यतिरिक्त आपल्या नाकातील जुनाट रक्तसंचय, नाकपुड्यांना विभागणाऱ्या बाकाची विशिष्ट रचना, अपुरी झोप, पाठीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षणाचा घशावर परिणाम होऊन श्वसनमार्ग अरुंद होणं हीही घोरण्याची कारणं आहेत.

रिस्क फॅक्टर्स

-पुरुष महिलांपेक्षा जास्त घोरतात.
-वजन जास्त असल्यास घोरण्याचा धोका अधिक असतो.
-काही लोकांची टाळू ही लांब व सॉफ्ट असते किंवा त्यांचे टॉन्सिल्स मोठे असतात यामुळे श्र्वसनमार्ग अरुंद असू शकतो.
-घोरण्यामध्ये अनुवंशिकताही मोठी भूमिका बजावते. आधीच्या पिढीत एसओएने ग्रस्त असलेल्या व्यक्ती असतील तर पुढच्या पिढ्यांनाही घोरण्याची समस्या असू शकते.

घोरण्याचा वयाशी काय संबंध?

घोरण्याचा वयाशी संबंध आहे की नाही हे तसं स्पष्ट करता येत नाही. काही अभ्यासांनुसार वयाचा घोरण्याच्या समस्येशी काहीही संबंध नाही, तर काही तज्ञांच्या मते वयानुसार माणसाची झोप बदलत जाते. तरुणांचं घोरण्याचं प्रमाण वयस्क माणसांच्या तुलनेत कमी आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? तर वयोमानानुसार सैल झालेल्या त्वचेप्रमाणेच शरीरातील श्वसनमार्गाचे स्नायू सैल आणि कमकुवत होतात. पुढे हेच स्नायू घोरण्यामागचं प्रमुख कारण ठरतात.

घोरणं कमी करण्यासाठी काय करायला हवं?

कमकुवत बनलेल्या स्नायूंना पुन्हा घट्ट करण्यासाठी तोंडाचा, घशाचा व्यायाम करणं गरजेचं आहे. घोरणं थांबवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे काही प्रकारच्या साधनांचा वापर करणं. उदा. जबडा, जीभ आणि टाळू यांची पोझिशन पुढे आणणारं डेन्टल माऊथपीससारखं उपकरण वापरल्याने श्वसनमार्ग मोकळा राहतो.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required