computer

खऱ्या आयुष्यातल्या रँचो'ने भारतीय जवानांसाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे....

"कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिये पढो!" ३ इडियट चित्रपटाचा डायलॉग आठवतो का? २००९ मध्ये आलेला हा चित्रपट सगळ्यांनी परत परत पहिला असेल. या सिनेमातली आमीर खान याने साकारलेली 'रँचो'ची व्यक्तीरेखा खऱ्या जीवनात सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे, हे तुम्हाला माहित आहे का? मोठ्या समस्यांवर अगदी सोप्या पद्धतीने उपाय शोधून काढणे हे रँचोचे आवडते काम. अगदी याच पद्धतीने खऱ्या आयुष्यातले रँचो म्हणजे सोनम वांगचुक हे देखील सोप्या पद्धतीने नव-नवीन उपाय शोधत असतात. अलिकडेच त्यांनी केलेल्या एका प्रयोगाची चर्चा सगळीकडे होत आहे.

सोनम वांगचुक यांनी अत्यंत कडाक्याच्या थंडीत पहारा देत असलेल्या जवानांसाठी एका सौर तंबूचा शोध लावला आहे. बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी जवानांना या नव्या सौरतंबुमुळे अजिबात थंडी वाजणार नाही. १२ हजार फुटाच्या उंचीवर लडाखच्या भूमीवर आपले जवान रात्रंदिवस देशाची सेवा करत असतात. या  रक्त गोठणाऱ्या थंडीतही जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. थंडीचे कपडे या वातावरणात त्यांचे पुर्णपणे रक्षण करू शकत नाही.

सोनम वांगचुक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हे तंबू लडाखच्या गलवान खोऱ्यात अति थंड हवामानात हे सौर तंबू उभे केले असल्याचे म्हटले आहे. सोनम वांगचुक यांनी या सौर तंबूचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. त्यात गलवान व्हॅलीमधील बाहेरचे आणि तंबूच्या आतील तापमान त्यांनी दाखवले  आहे. त्यांनी बनवलेला हा तंबू सौरऊर्जेवर चालणारा आहे. त्यात -१४ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाला देखील जवानांना थंडी वाजणार नाही. या सौर तंबूत एकाचवेळी १० जवान विश्रांती घेऊ शकतात. हे तंबू पोर्टेबल असल्याने प्रत्येक भाग वेगळा करता येतो. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. लडाखमध्ये गस्तीवर असलेल्या जवानांना तिथल्या प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेणे सर्वात मोठे आव्हान असते. तापमान घसरल्यावर त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडते. त्यामुळे हे सौर तंबू त्यांना खूपच उपयोगी पडणार आहेत.

आता असलेल्या तंबूत केरोसीन हीटर लावण्यात येतो त्यातून खूप धूर बाहेर निघतो. त्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होते. पण हे सौर तंबू वापरायला सोपे आणि वायूप्रदूषणापासून मुक्त आहेत. हे तंबू भारतातच बनत असल्याने पूर्णपणे स्वदेशी आहेत. या तंबूचे वजन केवळ ३० किलो असून त्यात तापमान नियंत्रित करण्याची सोय आहे.

या अनोख्या शोधाबद्दल सोनम वांगचुक यांचे खूप कौतुक होत आहे.  प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी सोनम वांगचुक यांचे कौतुक केले आहे. "सोनम तुम्हाला सलाम" असे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.

सोनम वांगचुक यांच्या या अनोख्या शोधाला बोभाटाकडून सलाम. लेख आवडल्यास जरूर शेअर करा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required