सिनेमातला खलनायक प्रत्यक्ष आयुष्यात बनलाय नायक!! सोनू सूद घर भेजो मोहिमेद्वारे नक्की काय करतोय जाणून घ्या.

सिनेमांमध्ये बऱ्याचवेळा व्हिलनचा रोल केलेला सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र हिरो ठरला आहे. मुंबईत अडकलेल्या स्थलांतरितांना परत त्यांच्या घरी पाठवण्यासाठी या भाऊने कंबर कसली आहे. सोनू सूद स्वखर्चाने स्थलांतरितांना त्यांच्या गावी पाठवत आहे.
सोनू सूद आणि त्याची व्यावसायिक मैत्रीण निती गोयल यांनी घर भेजो मिशन सुरू केले आहे. या मोहिमेद्वारे कामाच्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गेल्या १० दिवसांत त्यांनी कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये २१ बसेस पाठवल्या आहेत. या बसेसमधून जवळपास ८०० स्थलांतरित आपल्या गावी जाण्यात यशस्वी झाले. गुरुवारी एकाच दिवशी १० बसेस बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्यात आल्या, पुढील १० दिवसांत बंगाल, झारखंड आणि आसाम या राज्यांमधील स्थलांतरितांना घरी जाता यावे यासाठी सोनू १० बसेस पाठवणार आहे.
सोनू सूदचं हे घर भेजो मिशन काय आहे हे पाहाच, तुम्हांला कळेल की किती शिस्तबद्धपणे सोनू आपली सामाजिक बांधिलकी निभावत आहे.
1) एका बसामध्ये ६० सीटस् असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन म्हणून एका बसमध्ये ३५ पेक्षा जास्त पॅसेंजर नसतात.
2) गावी पोचल्यावर या स्थलांतरितांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी या सर्व प्रवाशांची आधी टेस्ट केली जाते. आतापर्यंत जवळपास १००० मजुरांची टेस्ट करण्यात आली आहे.
3) अनेक स्थलांतरितांनी ट्रकमध्ये कोंबून घेऊन जाणाऱ्यांना सुद्धा ५ ते १० हजार रुपये दिले आहेत. पण या सर्व स्थलांतरितांना चांगल्या ट्रॅव्हल्समधून पाठवूनसुद्धा सोनू त्यांच्याकडून एक रुपयाही घेत नाहीये. हे सर्व पैसे सोनू आणि निती गोयल आपल्या खिशातून देत आहेत. आता त्यांनी क्राऊड फ़ंडिंग द्वारे पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे, आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. ८०० किलोमीटरच्या एका फेरीसाठी त्यांना जवळपास ६५ हजार रुपये खर्च येतो तर १५०० ते २००० किमी जायचे असेल जवळपास एकाच बससाठी त्यांना २ लाख रुपये खर्च येतो.
4) या स्थलांतरितांना फक्त त्यांच्या शहरापर्यंत नाही, तर थेट घरापर्यंत पोहोचविण्याचे काम सोनू आणि त्याची टीम करत आहे. निती गोयल सीए असल्याने ती रात्रंदिवस या स्थलांतरितांची यादी तयार करण्यात आणि त्यांना कुठे सोडायचे याची तजवीज करण्यात लागली आहे.
5) या स्थलांतरितांना कुठे जायचे आहे याची सर्व आकडेमोड करून जर एखादी रेल्वे मिळाली तर काही मजुरांना रेल्वेद्वारे त्यांच्या घरी पाठविण्यात येत आहे. झारखंडला जाणाऱ्या एका रेल्वेत १५० स्थलांतरित पाठविण्यात आले.
6) अनेक स्थलांतरितांचे अन्नपाण्यावाचून होणारे हाल दररोज समोर येत आहेत, पण सोनूद्वारे पाठविण्यात येत असलेल्या मजुरांची अन्न पाण्याची सर्व सोय करण्यात येते.
8) सुरक्षिततेसाठी एका बसमध्ये २ ड्रायव्हर पाठविण्यात येत आहेत.
मंडळी, सोनू सूद आणि निती गोयल यांच्यासारख्या लोकांनी माणूसकी अजून जपलीय. घर भेजो मिशनद्वारे ते करत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी बोभाटाद्वारे हा छोटासा प्रयत्न!!
लेखक : वैभव पाटील