आता कुलर, एसी विसरा....सोनी कंपनीने चक्क 'एसी'वाली बनियन आणलीये भाऊ !!

जग झपाट्याने बदलतंय मंडळी... आधी राजा महाराजांना हवा घालण्यासाठी नोकरचाकर असायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि पंखे कुलरचा जमाना आला. आता तर बघेल तिकडे एअरकंडिशनर दिसतो राव!! घर, ऑफिसमध्ये भर उन्हाळ्यातसुद्धा गार हवेचा अनुभव लोकांना करता यायला लागला. एसी वापरणारे आणि न वापरणारे यावरून लोक भेदभावसुद्धा करतात. एखादा एसीत बसणारा गरीबांबद्दल बोलायला लागला की 'तुला काय जातं एसीत बसून बोलायला' हा डायलॉग सर्रास ऐकायला मिळतो. पण या सगळ्या गोष्टी काही दिवसातच इतिहासजमा होतील असं दिसतंय.
तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही तुमच्या ऑफिस आणि कारच्या बाहेर पडलात म्हणजे तुम्हाला ऊन हे सहन करावे लागणारच अशी एकंदरीत सध्या परिस्थिती आहे. पण आता सगळी समीकरणे एकेक करून बदलत आहेत राव!! याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोनी कंपनीने बाजारात आणलेला नवीन एसी!! हा एसी सगळ्यांना वापरता येईल एवढा स्वस्त आहे राव!! त्यापेक्षा मोठी त्याची खासियत म्हणजे हा एसी तुमच्या बनियनमध्ये लावलेला असेल, याचाच अर्थ असा की भर उन्हात फिरतानासुद्धा तुम्हाला ठंडा ठंडा कूल कूलचा अनुभव घेता येईल. मंडळी, या भन्नाट एसीची किंमत आहे फक्त ९ हजार रुपये!!
मोबाईलच्या आकाराचा हा एसी तुम्ही तुमच्या बनियनमध्ये लावून फिरू शकता. या हातात घेऊन फिरता येण्याजोग्या एसीला रेओन पॉकेट असे नाव देण्यात आले आहे. हा एसी वजनाने आणि आकाराने मोबाईलपेक्षा लहान आहे आणि हा रेओन पॉकेट एसी चक्क तुम्हांला बनियनमध्ये लावून फ़िरता येणार आहे. हा एसी बॅटरीवर चालेल आणि मोबाईलला ब्लूटूथने कनेक्ट करुन ऑपरेट करता येईल. एकदा दोन तास चार्ज केल्यावर तुम्ही दिवसभर हवेशीर अनुभव घेण्यासाठी मोकळे असणार राव!!
सोनी कंपनीचं म्हणणं आहे की कारमध्ये एसी लावण्यासाठी वापरण्यात येणारे एलिमेंट इथे पण वापरण्यात आले आहेत. हा रेओन पॉकेट प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीला तब्बल ६ लाख कोटी रुपये खर्च आलेला आहे. एक बनियन आणि एक रेओन पॉकेट एसी यांची किंमत त्यानी सुरुवातीला १४ हजार येन म्हणजेच भारतातले ९ हजार रुपये एवढी ठेवली आहे, तर पाच बनियन आणि एक रेओन पॉकेट एसी यांची किंमत आपले १२,०००रुपये असणार आहे.
पण यात एक अडचण अशी आहे राव!! हे एसी शर्ट फक्त पुरुषांसाठी आहेत. हे बनियन S, M आणि L या साईज मध्ये उपलब्ध आहेत. या बनियनच्या मानेजवळ असलेल्या पॉकेटमध्ये हा एसी बसवलेला असेल आणि तिथून पूर्ण शरीराला हवा पोहोचविण्याचे काम केले जाईल.
मंडळी, या डिव्हाइससाठी सोनीने लिथियम आयन बॅटरीचा उपयोग करण्यात आला आहे. हा एसी वाटरप्रूफ नसला तरी घाम, पाण्याचे थेंब याने त्याला काहीही होणार नाही. हा एसी सध्यातरी फक्त जपानमध्ये उपलब्ध असला तरी येणाऱ्या काळात तो भारतात सुद्धा विकला जाईल अशी अपेक्षा आहे.. मग, तुम्ही घ्याल का असे हे एसी कपडे??