युद्ध आणि शांती : जगाचे दोन वेगवेगळे रूप दाखवणारे हे फोटोग्राफ्स एकदा पाहाच !!

सिरीयन युद्ध हे कदाचित दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त काळ चाललेलं एकमेव युद्ध ठरणार आहे. तब्बल ७ वर्षापेक्षा जास्त काळापासून हे युद्ध सुरु आहे. आताही कुठेतरी चकमक सुरूच असणार. आपल्यातील बऱ्याच जणांना सिरियन युद्ध फक्त ऐकून माहित असतं. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...
२०११ साली या युद्धाला तोंड फुटलं. सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल-असद’ आणि त्यांच्या बाथ पार्टीने सत्ता सोडावी अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केली होती. विरोधकांमध्ये सामान्य नागरिक (विशेषतः तरुण) आणि सैनिकांचा समावेश होता. हे प्रकरण पुढे सरकारच्या दडपशाहीने चिघळलं. सरकार विरोधी गटामध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांची भर पडल्याने या युद्धाची दिशाच बदलली. आज या युद्धाच स्वरूप ‘बशर अल-असद’ यांना मदत करणाऱ्या देशांची फळी आणि विद्रोहींना मदत करणाऱ्या देशांची फळी असं झालं आहे. हे युद्ध फक्त यादवी किंवा सिरीयाचा गृहकलह न राहता अरब देशांचं युद्ध बनलं आहे.
प्रत्येक युद्धात सामान्य माणसाची ससेहोलपट होते. सिरीयन युद्धात ७ वर्षांमध्ये ५ लाख माणसांचा बळी गेला आहे. प्रत्यक्ष आकडा या पेक्षा जास्त असू शकतो. निर्वासित झालेल्यांचा आकडा यापेक्षा कैकपटीने जास्त आहे. निर्वासितांना तुर्कस्तान आणि मग पुढे युरोपची वाट धरावी लागली. काही समुद्रमार्गे युरोपलाच जाऊन भिडले. युद्धाचा लवलेश नसलेला युरोप या सिरीयन नागरिकांसाठी स्वर्ग होता.
तुर्कस्तानच्या उगूर गॅलेन्कुस या फोटोग्राफरने सिरीयन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाची दोन भागात विभागणी केली आहे. पहिल्या भागात शांतता नांदत असलेला भाग आहे तर दुसरा भागात युद्धाने आयुष्य बेचिराख झालेला भाग आहे. त्याने तयार केलेले फोटो हे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितीतल्या मानवी जीवनाचं चित्रण करतात. जगभरात जिथे जिथे युद्ध आणि हिंसा माजली तिथे तिथे सामान्य माणूस भरडला गेला. उगूरने तयार केलेले फोटो हे २ वेगवेगळ्या जगातील तफावत दाखवतात.
चला तर उगूर गॅलेन्कुस या कलाकाराने पाडलेल्या जगाच्या दोन भागांचं चित्रण पाहूया....