computer

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील सैनिकाच्या कवटीचे रहस्य !!

(प्रातिनिधिक फोटो)

हे पेंटिंग आहे  Vasily Vereshchagin या चित्रकाराचे. त्याने ते १८८४ साली केले होते. तोफेच्या तोंडी दिलेल्या सैनिकांचे ते चित्र आहे. पण कुणी, कोणास आणि कधी ही शिक्षा केली होती? 

(तोफेच्या तोंडी दिलेल्या सैनिकांचे चित्र)

१८५७ चे आपले स्वातंत्र्य युध्द मोडून काढण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने बरेच दहशतीचे मार्ग अवलंबले होते. त्यापैकी एक होता युध्दकैद्यांना तोफेच्या तोंडी देणे!  तोफ डागली की तिच्या तोंडी दिलेल्या माणसाचे हातपाय आणि धड वेगवेगळ्या दिशेला फेकले जायचे . डोके तीस-चाळीस फूटांवर उडून जायचे. कैद्याच्या शरीराचे इतके तुकडे झाले की तो हिंदू असो वा मुसलमान, त्या कैद्याचे मृत्युपश्चात दफन वा दहन काहीच होणे शक्य नसायचे. वर उडालेले मुंडके वॉर ट्रॉफी म्हणून ब्रिटिश शिपाई घेऊन जायचे. पुढच्या काळात अशा अमानुष वर्तणूकीचा बभ्रा होऊ नये म्हणून हे पेंटिंग ब्रिटिश राजघराण्याने विकत घेऊन नष्ट केले असे  म्हटले जाते.  पण युध्दातील क्रौर्याच्या इतर खुणा लपवणे राजघराण्याच्या हातात नव्हते. 

आज अपण जी कथा वाचणार आहोत ती आहे ,अशाच एका वॉर ट्रॉफीची म्हणजे शिपाई आलमबेघ(आलम बेग)च्या कवटीची!!

इंग्लंडमधल्या एका बारमध्ये एक विचित्र वस्तू वर्षानुवर्षं 'शो पीस' म्हणून ठेवण्यात आली होती. हा शो-पीस म्हणजे चक्क एक मानवी कवटी होती. त्या कवटीला खालच्या जबड्याचा भाग नव्हता आणि काही दातही नव्हते. १९०० व्या शतकात  तोफेच्या तोंडी दिलेल्या भारतीयाची ती कवटी होती इतकीच जुजबी माहिती बारच्या मालकाला होती. जसजसा काळ पुढे गेला तसा तो शो-पीस बारमध्ये ठेवणं मालकाला प्रशस्त वाटेना. ज्याअर्थी ती कवटी इतकी वर्षे ठेवली होती, याचा काही विशेष अर्थ त्यात असावा असेही त्याला वाटत होते. शेवटी विचाराअंती त्याने ती किम वॅग्नर नावाच्या इतिहास संशोधकाच्या स्वाधीन केली. वॅगनेरने जेव्हा कवटीचे निरीक्षण केले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की कवटीच्या डोळ्यांच्या खाचेत एक कागद आहे. तो कागद बाहेर काढून उलगडल्यावर इतिहास उघडकीस आला. 

ती कवटी आलम बेग नावाच्या एका सैनिकाची होती. हवालदार आलम बेगने १८५७ साली भारतीयांनी कंपनी सरकार विरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता.

त्या चिठ्ठीवरचा पूर्ण मजकूर असा होता.

"ही अलम भेग नावाच्या, ४६ वी रेजिमेंट, बंगाल नेटीव्ह इन्फंट्रीतल्या हवालदारची कवटी आहे.  याला तोफेने उडवून देण्यात आले होते. तो १८५७च्या विद्रोहात भाग घेतलेल्यांपैकी एक होता आणि अत्यंत वाईट स्वभावाचा तो प्रमुख नेता होता.  सर्व युरोपियन सुरक्षिततेसाठी  जाण्याची घाई करीत होते अशा एका छोट्या बाजूच्या शिखरावर/किल्ल्याकडे जाणारा रस्ता त्याने ताब्यात घेतला.  त्याच्या टोळीने अचानक हल्ला करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. आणि डॉ. ग्रॅहमला आणि त्याच्या लहान मुलांना बग्गीमध्ये शूट करुन ठार केले. त्याचा पुढील बळी रेव्ह. मिस्टर हंटर, एक मिशनरी होता. मिस्टर हंटर त्याच  दिशेने पत्नी व मुलींबरोबर मार्गक्रमण करीत होता. आलम बेगने श्री. हंटरची हत्या केली आणि त्यांची पत्नी व मुलींना पाशवी वागणूक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला मारून टाकले. आलम भेग वय 32, 5 फूट 7 ½ इंच उंच होता आणि तो आजारी दिसत नव्हता" 

आलमबेगची कवटी ए. आर. कोस्टेलो नावाच्या सैन्याच्या सातव्या तुकडीतील कॅप्टनने वॉर ट्रॉफी म्हणून इंग्लंडला आणली. त्यानंतर ती लॉर्ड क्लाइड नावाच्या पबमध्ये शो पीस म्हणून ठेवण्यात आली.

किम वॅग्नरने ती कवटी त्याच्या हातात आल्यावर अनेक सरकारी दस्त ऐवज तपासले. ही घटना सियालकोटला घडली म्हणून तो तिकडे पण काही वर्षे जाऊन आला. अँड्र्यू गार्डन नावाचा अमेरिकन ख्रिस्ती पाद्री त्या काळात सियालकोटला होता. त्याचे पत्रव्यवहार आणि ज्यांची हत्या आलमबेगने केली त्यांच्या कुटुंबांचा पत्रव्यवहार त्याने तपासला. त्यानंतर आलम बेगच्या आयुष्याबद्द्ल त्याने माहिती मिळवली. आलम बेग सियालकोटमध्ये लष्करात कामाला होता. त्याचा जन्म कानपूरला झाला होता. त्याचे लष्करातील काम त्यावेळच्या इतर सैनिकांसारखेच कष्टप्रद आणि दमछाक करणारे होते. 

हे सर्व कागदपत्र तपासताना त्याला १९११ सालच्या स्फीअर नावाच्या एका वर्तमानपत्रात आलमबेगच्या कवटीबद्दल आणखी माहिती मिळाली. त्यात या कवटीचा उल्लेख आहे तो असा-

(किम वॅग्नर)

"आम्हाला माहिती आहे (असे कळले आहे ) की व्हाईटहॉल येथील रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिटय़ूटच्या संग्रहालयात नुकतीच ठेवण्यात आलेली भारतीय विद्रोहातील भयंकर स्मृतिचिन्ह(म्हणजे)  बंगाल इन्फंट्रीच्या रेजिमेंटच्या शिपायाचीची ती खोपडी आहे, जी १८५८ मध्ये अठरा जणांसह तोफेच्या तोंडी दिले गेले होते. त्या कवटीचे रुपांतर (आता) सिगार बॉक्समध्ये झाले आहे."

याच वर्तमानपत्राने पुढे असे म्हटले आहे की युध्दात दोन्ही बाजूने क्रौर्य घडते. पण त्या क्रौर्याचे प्रतिक अशा प्रकारे जपणे कितपत योग्य आहे? अनेक वर्षे यावर संशोधन केल्यानंतर किम वॅग्नरने या संपूर्ण प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे. आलमबेगच्या कवटीबद्द्ल किमने असे म्हटले आहे की " त्याचे अवशेष योग्यरित्या दफन होणे हाच योग्य विचार आहे. एखाद्या म्युझियमच्या काचेच्या कपाटात ती कवटी ठेवणे अयोग्य आहे "

किम वॅग्नरच्या या संशोधनामुळे ऐतिहासिक माहिती प्रकाशात आली आहे यात काही संशय नाही. पण एरवी सभ्यतेचा टेंभा मिरवणारे ब्रिटिश पण त्याकाळी भारतीय जनतेशी कसे वागत होते हे पण उघडकीस आले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required