computer

ग्रीन बूट्स- माऊंट एव्हरेस्टवरच्या सर्वात प्रसिद्ध प्रेताची शोकांतिका!! ते तब्बल २० वर्षे तिथेच पडून होते!!

माउंट एव्हरेस्टवर या जगातील सर्वात उंच पर्वत शिखरावर आपणही झेंडा रोवावा अशी अनेकांची इच्छा असते. यात काहीजण यशस्वी होतात, तर काहीजण अयशस्वी होतात. काहीजण अगदी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचूनही अपयशी ठरतात. यशस्वी झालेल्या गिर्यारोहकांना नंतर संपूर्ण जग ओळखू लागते, पण जे यशस्वी झाले नाहीत त्यांचे काय? जी वाहवा यशस्वी व्यक्तींना मिळते ती शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मिळत नाही, त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा येते. ही उपेक्षा किती विदारक असू शकते ते आजची ही कथा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग आहे उत्तरी मार्ग. या मार्गावर एव्हरेस्ट शिखरापासून जवळच एक मृतदेह गेले वीस वर्षे तिथेच पडून आहे. हा मृतदेह इंडो-तिबेटी पोलीस दलातील एका २८ वर्षीय तरुणाचा असल्याचे म्हंटले जाते. एव्हरेस्ट सर करून परतत असताना अचानक बिघडलेल्या हवामानामुळे १० मे १९९६ रोजी या इंडो-तिबेटीयन पोलीसदलातील जवानाचा मृत्यू झाला. या जवानाचे नाव होते शेवांग पल्जोर. आजच्या घडीला त्याला ‘ग्रीन बूट’ म्हणून ओळखले जाते. याला ग्रीन बूट हे नाव पडले ते मृतदेहाच्या पायातील हिरव्या रंगाच्या बुटामुळे.

आजही जेव्हा उत्तरी मार्गाने गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना या मृतदेहाजवळूनच जावे लागते. अनेकांसाठी हा मृतदेह म्हणजे जणू मैलाचा दगड आहे.. शेवांग पल्जोर या त्याच्या खऱ्या नावाने त्याला कुणीही ओळखत नाही.

तब्बल आठ वेळा एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक नोएल हाना यांच्या मते एव्हरेस्ट सर करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहक या ग्रीन बूटला ओळखतो. उत्तरी मार्गाने चढाई करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या मार्गात हा ग्रीन बूट लागतोच. कित्येक जण या शवाच्या शेजारी बसून थोडी विश्रांती घेतात आणि मग राहिलेला पर्वत सर करतात.

१९९६ साली शेवांग पल्जोर, शेवांग मानला आणि दोर्जे मोरूप असे तिघे जण मिळून एव्हरेस्टवर चढाई करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे एव्हरेस्टची चढाई हा एक वादग्रस्त मुद्दा बनला होता. हे शिखर सर करण्याच्या प्रयत्नाला व्यावसायिक रूप आल्याचे अनेकांचे म्हणणे होते. शिवाय नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईसाठी परवानगी देताना घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणीतील अटी आणखी कडक कराव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली होती.

खरे तर पल्जोर आणि त्यांचे साथीदार ज्या दिवशी एव्हरेस्ट सर करत होते त्याच वेळी गिर्यारोहकांचा आणखी एक समूह देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात होता. पल्जोर एव्हरेस्ट वर पोहोचले होते, ते तिथून परतत असताना ते संकटात सापडले. खरे तर त्यावेळी एव्हरेस्ट सर करणाऱ्या या समूहाने त्यांची मदत केली असती तर कदाचित ते वाचले असते. पण अडचणीत सापडलेल्या पल्जोर यांना मदत करण्यापेक्षा एव्हरेस्ट सर करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणे काहीजणांना जास्त महत्वाचे वाटले आणि त्यांनी मदत करण्याऐवजी पुढे जाणे श्रेयस्कर समजले.

शेवांग पल्जोर यांचे मूळ गाव लडाख जवळील सकती हे आहे. समुद्रसपाटी पासून ३८०० मीटर उंचीवरील या गावात फक्त तीनशे लोकवस्ती आहे. शेवांग यांच्या कुटुंबात शेवांग यांच्यासह एकूण पाच भावंडे होती. गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना हायस्कूलनंतरचे शिक्षण घेता आले नाही आणि त्यांनी मध्येच शाळा सोडून पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. आयटीबीपीमध्ये नोकरी करत असताना शेवांग यांनी अनेक पर्वत शिखरे सर केली होती. त्यातूनच त्यांची एव्हरेस्टवर चढाई करण्याची जिद्द बळावली. शेवटी १९९६ च्या गिर्यारोहण मोहिमेत त्यांची निवड झाली.

आपण एव्हरेस्ट सर करूच असा त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. पण जगातील सर्वात उंच शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. जसेजसे समुद्रसपाटीपासून वर जाईल तसा हवेतील ऑक्सिजन कमी कमी होत जातो. ज्यामुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो, माणसाची शुद्ध हरपते, फुफ्फुसांना ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसे फुटू शकतात. यावरून एव्हरेस्ट सर करणे किती धोक्याचे आहेयाची कल्पना येऊ शकते. त्यातही उत्तरेच्या मार्गाने एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणारी ही पहिलीच भारतीय टीम होती.

१९९६ मध्ये एव्हरेस्टची चढाई करणाऱ्या या टीमचे लीडर होते कमांडंट मोहिंदर सिंह. पल्जोर खूपच उत्साही आणि तंदुरुस्त होते म्हणूनच त्यांची या मोहिमेसाठी निवडण्यात आले होते. त्यांचे साथीदार होते शेवांग मनला आणि दोर्जे मोरूप. पल्जोर सह हे दोघेही त्या चढाईत मरण पावले होते.

कदाचित पल्जोर आणि त्यांच्या साथीदारांना त्यांचा अतिआत्मविश्वासच नडला असे त्यांचे डेप्युटी लीडर हरभजन सिंह यांचे मत आहे. एव्हरेस्टचे शिखर अवघे काही मीटर दूर असतानाच त्यादिवशी अचानक हवामान बदलले. सोसाट्याचा वर सुटला असल्याने पुढची वाटचाल करणे शक्य नसल्याचे हरभजन यांनी ओळखले. त्यांनी पल्जोर, मनला आणि दोर्जे यांना परत फिरण्याचे आदेश दिले, पण या तिघांनी त्यांची सूचना फेटाळून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हरभजन यांनी धोका ओळखून बेस कॅम्पला परतण्याचा निर्णय घेतला आणि ते परतले. आज त्यांना आपल्या या निर्णयाबद्दल कृतज्ञता वाटते. कारण जर मी तो निर्णय घेतला नसता तर आज मीही एव्हरेस्टच्या बर्फात तसाच पडून राहिलो असतो असे ते म्हणतात.

हरभजन बेस कॅम्पला परत आले, इतक्यात त्यांना वॉकीटॉकीवर पल्जोर यांचा संदेश आला की ते एव्हरेस्टच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. याही वेळा हरभजन यांनी त्यांना परत येण्याची विनंती केली. परंतु मनला आणि पल्जोर यांना त्यांचे म्हणणे बहुतेक ऐकू गेले नसावे.

त्यानंतर एकदीड तासांनी त्यांना पुन्हा वॉकीटॉकीवरून सांगितले की, ते शिखरावर पोहोचले आहेत. ही बातमी कळताच बेस कॅम्पवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उत्तरी मार्गाने एव्हरेस्ट सर करण्यात ही टीम यशस्वी झाली होती आणि या मार्गाने एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली भरतीय टीम होती.

या बातमीनंतर आनंदाचे वातावरण पसरले असले तरी हवामान आणखीनच खराब झाले होते. त्यामुळे वर गेलेली ही टीम आता खाली कशी येणार याचीच चिंता लागून राहिली होती. साडे पाच वाजता एव्हरेस्टवर पोहोचलेली ही टीम रात्री पर्यंत बेस कॅम्पला परत येईल असा हरभजन यांचा अंदाज होता. परंतु रात्रीचे आठ वाजले तरी त्या तिघांचा पत्ता नव्हता. त्याचवेळी जपानी गिर्यारोहकांची एक टीम एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने जात होती. हरभजन यांनी या टीमला विनंती केली की तीन भारतीय गिर्यारोहक संध्याकाळी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले ते अजून परतले नाहीत, जर वाटेत ते तिघे कुठे दिसले तर त्यांना परत येण्यास मदत करा. कारण हवामान खराब असल्याने कदाचित ते वाटेत फसले असतील. जपानी गिर्यारोहक हिरोशी हनाडा आणि ईसुके शिगेकावा त्याच रात्री एव्हरेस्ट सर करण्यास निघाले होते.

या जपानी टीमने दुसऱ्या दिवशी नऊ वाजता हरभजन यांना कळवले की दोर्जे मारूप त्यांना सुन्न अवस्थेत आढळून आले. आम्ही त्यांना मदत केली आणि वरती निघून आलो. दोन तासांनी त्यांना शेवांग मनला आणि पल्जोरही तसेच सुन्नावस्थेत दिसले होते, मात्र ते त्यांची मदत करण्यासाठी न थांबता पुढे निघून गेले.

हरभजन यांच्या दाव्यानुसार वरती जाणाऱ्या या जपानी टीमने जर वेळेत त्यांची मदत केली असती तर तिघेही भारतीय गिर्यारोहक आज जिवंत असते. पण त्या जपानी गिर्यारोहकांनी हा आरोप फेटाळून लावला. त्यांनी जपानमध्ये गेल्यावर एक पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी दावा केला होता की, "आम्हाला कुठलीही भारतीय टीम एव्हरेस्टवर दिसली नव्हती. तसेही ८००० फुट उंचावर मुळात त्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाला धोका असताना तिने दुसऱ्याची मदत करावी अशी अपेक्षा करणेच चूक आहे. इतक्या उंचीवर गेल्यानंतर तुमचा जीव ही फक्त तुमची जबाबदारी असू शकते इतर कुणाची नाही."

खरे तर शेवटच्या त्या काही तासांत पल्जोर आणि त्याच्या टीमसोबत नेमके काय झाले होते हे कुणालाही सांगता येणार नाही.

कॅनडा मधील ‘टोरोंटो विद्यापीठातील डॉ. केंट मूर आणि जॉन सेंपल यांनी अभ्यासांती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४% पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.

९९६च्या त्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. आजवर एव्हरेस्ट चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गिर्यारोहाकांपैकी २०० जणांचा या पर्वतावर मृत्यू झाला आहे. या २०० जणांचे मृतदेह आजही एव्हरेस्टच्या कुशीतच पडून आहे. बर्फाळ वातावरणात हे मृतदेह म्हणजे मृत व्यक्ती असे वाटत नाही, तर जणू कुणी तरी थकलेला वाटसरू विश्रांती घेत असावा असे वाटते.

त्यातही ग्रीन बूट अधिकच प्रसिद्ध आहेत. कारण हे अशा ठिकाणी आहेत जिथून एव्हरेस्ट आता अवघ्या काही अंतरावर आल्याची आणि थोडाच प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता असल्याची ग्वाही देतात.

ग्रीन बूटची ही कथा म्हणजे अपयशी माणसाचे विदारक सत्य आहे. ग्रीन बूट एव्हरेस्ट सर करण्यात अपयशी ठरले असले तरी त्या नंतरच्या अनेक गिर्यारोहकांना मार्ग दर्शवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांना अपयशी म्हणणे योग्य ठरणार नाही. काही लोकांना मृत्यू कधीच संपवू शकत नाही तसेच हा ग्रीन बूट देखील कधीच नामशेष होणार नाही. इथून पुढेही ते गिर्यारोहकांना मार्गदर्शन करण्याचे काम करतच राहतील.

मेघश्री श्रेष्ठी.

सबस्क्राईब करा

* indicates required