बोभाटा एक्स्क्लुझिव्ह: 'अमूल बेबी'च्या जाहिरातींमागची कहाणी

आज म्हणजे १६ ऑक्टोबर १९६६ रोजी आपल्या लाडक्या अमूल बेबीचा जन्म झाला. "अमूल बेबी " याच नावाने ती ओळखली जाते. आज बेबीने पन्नाशी ओलांडली असली तरीपण ती बेबीच दिसते आहे. अजूनही तशीच गुटगुटीत, नकट्या नाकाची, चुणचुणीत आणि एका वाक्यात बारीकसा चिमटा काढणारी. तिचे वनलाईनर्स इतके भारी असतात की एकाच वाक्यात ती मनात घुसते.
अमूल बेबीची मूळ संकल्पना सिल्वेस्टर डकुन्हा यांची. त्यांच्या डकुन्हा असोसिएट्समध्ये बेबीचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीची बेबी आता दिसते तशी गुटगुटीत नव्हती. तेव्हा एजन्सीमध्ये भरत दाभोलकर आणि सुबोध पोद्दार अमूलचे खाते सांभाळायचे. त्यांच्या विचार मंथनातून आज आपल्याला दिसते तशी नकट्या नाकाची गुटगुटीत बेबी तयार झाली. सुबोध पोद्दार काही दिवसानी बाहेर पडले आणि कुमार मोरे आर्ट डायरेक्टर म्हणून काम करायला लागले. त्यानंतर तब्बल बारा वर्षे भरत दाभोलकर आणि कुमार मोरे यांनी अमूलच्या बेबीचे "बेबी सिटींग" केलं, त्याची ही कथा.
डकुन्हा ही त्या दरम्यानची मोठी जाहिरात कंपनी होती. सिल्वेस्टर डकुन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अमूलचं खातं हातळलं जायचं. त्याचं कारण ही तसंच जबरदस्त होतं. अमूलचे डॉ. कुरीयन आणि डकुन्हा यांच्या सामंजस्याची पातळी इतक्या उंचीची होती की एजन्सीला होर्डींगवर जाहिरात लावण्यासाठी कधीच पूर्वपरवानगीची आवश्यकता भासायची नाही. डॉ. कुरीयन यांनी एजन्सीला हे काम करायला पूर्ण मोकळीक दिली होती. याचं श्रेय अर्थातच सिल्वेस्टर डकुन्हा यांच्याकडं जातं. त्याकाळी पध्दत अशी होती की कँपेनच्या प्रत्येक कागदावर क्लाएंटचा "गो अहेडचा " शिक्का लागायचाच. आता समस्या अशी होती की अमूलचे जाहिरात विषय म्हणजे टॉपिक्स अत्यंत तरल होते. टॉपिकचा जिवंतपणा तीन ते चारच दिवसांचा. चार दिवसांत टॉपिक पुन्हा बदलायचा. त्यात आणखी एका अडचण म्हणजे जो टॉपिक मुंबईत चालायचा, तो दिल्लीत चालेलच असं नाही. त्यामुळे एकाच वेळी चार वेगवेगळ्या संकल्पना तयार ठेवाव्या लागत. टेक्नोलॉजी हा शब्दसुद्धा तेव्हा नविनच होता. झेरॉक्सदेखील त्यावेळी आताच्या इतकं प्रगत नव्हतं. आता ’कट अँड पेस्ट’ हा एका क्लिकचा मामला आहे तर त्यावेळी या कामासाठी एक वेगळा आर्टीस्ट लागायचा. एकाच आठवड्यात अनेक होर्डींग - वेगळे विषय - त्याला योग्य असं वाक्य! सगळं काही टीमवर्कचा भाग होता. भरत काही वर्षे चार क्लायंट साइड्स सांभाळायचा. नंतर त्याने कॉपी लिहायला सुरुवात केली, नव्या कल्पना आणायला सुरुवात केली आणि त्यानंतर भरत आणि अमूल बेबी हे एकजीव समीकरणच तयार झालं.
तेव्हा अॅड एजन्सीमध्ये एक सळसळतं रसायन खेळत असायचं. ते म्हणजे अस्सल शंभर टक्के "पॅशन". रात्र रात्र काम करणं आणि न थकता दिवसभर पुन्हा बाकीची काम करणं हे फक्त आणि फक्त पॅशनमुळं !!! विषय हातात आला की आम्ही तासाभरात चित्र पूर्ण करायचो. तोपर्यंत आमच्यापैकी एकजण लेटरींग करायचा. ते झालं की त्याच्या अनेक प्रती एकाच वेळी हाताने तयार करायच्या असायच्या. आमचे एक आर्टिस्ट दत्तात्रय पल्हाडे रात्र रात्र जागून ते काम करायचे. कॉपीज रवाना व्हायच्या. तोपर्यंत कलकत्ता किंवा दिल्ली किंवा अहमदाबादमध्ये होर्डींगचे कामगार स्कॅफोल्डींग लावून रात्रभर आमच्या आर्टवर्कची वाट बघत असायचे. आर्टवर्क पोहचलं की काही तासात होर्डींग तयार व्हायचं.
(दत्तात्रय पल्हाडेंसोबत काम करताना कुमार मोरे)
सगळं काम हाताने पेपर आणि ब्रश पेन्सिलच्या माध्यमातूनच व्हायचं. त्यातच एजन्सीत अमूल हा एकच क्लाएंट नव्हता. बँक ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कार्पोरशन असे मातब्बर क्लाएंट देखील सांभाळावे लागायचे. अमूलच्या "टॉपिक्स" मुळं अमूलचं काम नेहेमी हातघाईच्या लढाईसारखं असायचं. एक दिवस उशीर झाला की टॉपिक शिळा होण्याची भिती असायची आणि तसं झालं की सगळंच मुसळ केरात!!! त्यामुळे सतत प्रचंड प्रेशर खाली हे काम व्हायचं. पण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे पॅशनच्या अमलाखाली ते काहीच जाणवायचं नाही.
सुरुवातीच्या काळात अमूलच्या जाहिराती विक्री वाढवण्यासाठी होत्या. कारण टेबल बटर हे प्रॉडक्ट फारच मोजक्या घरात असायचं. त्यावेळच्या घरात लोणी म्हणजे गरम भाकरीवर वितळणारा ताजा लोण्याचा गोळा. फार फार तर इराण्याच्या हॉटेलातला मस्का लोकांच्या परिचयाचा होता. पण राहणीमान बदलत गेलं आणि अमूलचं (टेबल) बटर फ्रिजमध्ये एक हक्काचा कोपरा अडवून बसलं. त्यानंतरच्या दिवसात अमूलच्या जाहिराती या विक्री वाढावी म्हणून नव्हत्याच. बरेचदा तर बाजारात अमूल बटरचा तुटवडा असायचा.
अमूलची विक्री अफाट होती आणि वाढतच चालली होती. लोकांना मग प्रश्न असा होता की या जाहिरातींचं प्रयोजन काय? प्रयोजन दूरदॄष्टीत होतं. अमूल बटर घरीघरी पोहचून फ्रिजमध्ये एक कोपरा राखीव घेऊन बसलेलं होतं. पण अमूलने लोकांच्या मनाचा व्यापलेला कोपरा वाढतच जावा आणि "त्याचा विसर ना व्हावा " यासाठी या जाहिरातींचं प्रयोजन होतं. साहजिकच लोकांच्या आयुष्यात घडणार्या किंवा लोकांचं आयुष्य घडवणार्या घटनांचा उल्लेख अपरिहार्यतेने अमूलच्या होर्डींग वर यायचा. डकुन्हाच्या भरत दाभोळकर आणि कुमार मोरे या जोडगोळीनं या जाहिरातींचा दर्जा इतका उंचावर नेऊन ठेवला आहे, की आजही इतर कोणत्याही एजन्सीने हे शिवधनुष्य उचलायचा विचार पण केला नाही.
शब्दांकन- रामदास
(लेखात वापरलेलं सर्वात वरचं चित्र कुमार मोरेंनी या विशेष प्रसंगानिमित्त बोभाटासाठी खास चितारलं आहे)