computer

१२७ वर्षे वाचनसंस्कृती टिकवणाऱ्या बुकस्टॉलची गोष्ट !!

भारतात रेल्वे मार्ग आला आणि त्यामागून समृद्धीही आली. काही जणांच्या मते ब्रिटिशांना रेल्वेमुळे भारताची लुट करणे सोपे झाले. तसेही असेल. पण, रेल्वेमुळे भारतात कितीतरी बदल झाले. पुढे पुढे हा रेल्वेमार्ग विस्तारत गेला आणि भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास करणे सोपे झाले. भारतातील रेल्वे मार्गाला दीडशे वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे. तसाच या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांच्या स्टॉलला तितकाच जुना इतिहास आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का, की रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांच्या स्टॉलला फक्त ए. एच. व्हीलर बुक्स स्टॉल अँड प्रायव्हेट लिमिटेड हेच नाव का असते? म्हणजे मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरील स्टॉल असो, पुण्याच्या असो की कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी कुठल्याही रेल्वे प्लॅचफॉर्मला हेच नाव दिलेले तुम्हाला आढळेल. या मागचा नेमका इतिहास काय आहे? चला तर आज समजून घेऊ या.

१८५७ चा उठाव झाला त्याकाळची गोष्ट आहे. याच काळात एक फ्रेंच व्यक्ती अलाहाबादच्या प्रयाग (आताचे प्रयागराज) या शहारात आपले नशीब अजमावण्यासाठी आली. बर्ड अँड कंपनी या एका इंग्लिश कंपनीचा प्रतिनिधी म्हणून तो भारतात आला होता. त्याचे नाव होते एमिल एडवर्ड मुरो. मुरोला पुस्तके वाचण्याचा आणि जमवण्याचा अफाट छंद होता. त्याच्या या वाचनवेडामुळे या क्षेत्रातील अनेक लोकांशी त्याची चांगली मैत्री जमली होती. तो जरी जन्माने फ्रेंच असला तरी त्याचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले होते. इंग्लंडच्या पुस्तक व्यवसायातील प्रिंटर्स असो की प्रकाशक सगळ्यांशी याचे जवळचे संबंध होते. प्रयागराज मध्ये काही काळ वास्तव्य केल्यानंतर काही कारणास्तव तो हे शहर कायमचे सोडून जाण्यासाठी निघाला. शहर सोडून जाताना त्याचासमोर एकच प्रश्न होता. त्याने जमवलेल्या भल्या मोठ्या पुस्तक संग्रहाचं काय करायचं? या पुस्तकाबद्दल त्याला प्रचंड ओढ होती आणि ती अशीच सोडून जाणे त्याला जमत नव्हते.

तो रेल्वे स्टेशनवर आला तेव्हा त्याने बघितले की रेल्वेची वाट पाहत ताटकळत असलेले प्रवासी वेगवेगळी मासिके आणि पुस्तके चाळण्यात मग्न आहे. हे दृश्य पाहून त्याच्या मनात कल्पना आली. इथल्या लोकांना जर खरीच वाचनाची इतकी आवड असेल तर आपण यांचा आणि स्वतःचाही फायदा का करू नये. मग त्याच्या डोक्यात जी कल्पना आली तिने तर इतिहास घडवला, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा इतिहास माहित नाही.

त्याने पुन्हा इंग्लडला परतण्याचा बेत रद्द केला आणि प्रयागराजच्या रेल्वे स्टेशनवर एक पुस्तकांचा स्टॉल सुरु करण्याचे ठरवले. आपल्या स्टॉलला जर इंग्लिश नाव दिले तर ते आणखी प्रभावी ठरेल या विचाराने तो आर्थर हेन्री व्हीलर या इंग्लडमधील प्रसिद्ध प्रकाशकाला भेटला आणि आपल्या दुकानाला त्याचे नाव देण्याची परवानगी मागितली. आर्थर आणि मुरो यांचे संबंध खूपच जवळचे होते, त्यामुळे आर्थरने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. इंग्लंडच्या पुस्तक विश्वात आर्थरची असलेली प्रसिद्धी आणि त्याच्या प्रतिमेचा फायदा करून घेत मुरोने प्रयागराजच्या रेल्वे स्टेशनवर पुस्तकांचा स्टॉल सुरु केला. या स्टॉलसाठी लागणारी पुस्तकेही त्याने आर्थर कडूनच मागवली होती. जसजसे रेल्वेचे जाळे विस्तारत गेले तसतसे हाउस  व्हीलरचेही जाळे विस्तारत गेले. मात्र मुख्य कार्यालय प्रयागराज मध्येच राहिले. हाउस ऑफ व्हीलरचा विस्तार वाढत जाईल तसे अनेक प्रकाशक, लेखक स्वतःहून त्यांची पुस्तके या दुकानात ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागले. अनेक प्रकारच्या पुस्तकांचा खजिनाच या दुकानातून मिळत असल्याने वाचनप्रेमी लोकांनाही ही कल्पना खूपच सुखावून गेली. रेल्वे प्रवाशांसाठी हा पुस्तकांचा स्टॉल म्हणजे एक आकर्षणाचे केंद्र बनला.

याच काळात ए. एच. व्हीलरने रूडयार्ड किप्लिंगची पुस्तके प्रकाशित केली. रुडयार्डचे पहिले पुस्तक प्रकाशित करण्याची पहिली संधी याच स्टॉलने दिली. ‘प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स’ हे त्याचे पुस्तक. त्यानंतर त्याचे सहा कथासंग्रह प्रकाशित झाले. इंडियन रेल्वे लायब्ररीयन सिरीज नावाने हे संग्रह प्रकाशित झाले. कुठल्याही भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर पुस्तकांचे स्टॉल सुरु करायचे असेल तर त्यासाठी ए. एच. व्हीलरची परवानगी असणे बंधनकारक करण्यात आले, त्यामुळे देशभर आपसूकच याचे जाळे विस्तारत गेले. प्रत्येक रेल्वेस्टेशनवरील पुस्तकांच्या स्टॉलला ठराविक कालावधीने या कराराचे नुतनीकरण करावे लागे.

यानंतर १८९९ मध्ये तिनकारी कुमार बॅनर्जी यांनी व्हीलरच्या कलकत्ता येथील कार्यालयात प्रवेश केला. आजपर्यंत या स्टॉलवरून इंग्रजी पुस्तकेच विकली जात होती आणि त्या पुस्तकांचे वाचकही बहुतांश इंग्रजी जाणणारे वाचकच होते. स्टॉलची व्यवस्था पहाणारे अधिकारीही इंग्रजच होते. अशा सगळ्या इंग्रजी वातावरणात प्रवेश करणारे पहिले भारतीय नाव होते टी.के. बी. टी.के.बी. यांनी आपल्या प्रामाणिक कामाने मुरोचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या प्रकाशन संस्थांनी व्हीलरशी करार केला होता. टी.के.बी.यांनी आपल्या प्रामाणिकपणाने, हजरजबाबीपणाने मुरोचे हृदयच जिंकले होते.

याचकाळात व्हीलरने अनेक भारतीय भाषांतही प्रवेश केला होता आणि या कंपनीकडून रेल्वेशी निगडीत किंवा इतर घडामोडींची बातमी देण्यासाठीही नियतकालिके सुरु करण्यात आली होती. जिथे जिथे रेल्वे स्टेशन असेल तिथे तिथे ही नियतकालिके पोहोचत होती. त्यामुळे देशभरातील अनेक लोक या नियतकालिकातील लेख, अभिप्राय वाचत होते आणि देत होते. त्याकाळातील राजकीय वातावरणही यामुळेच आणखी तापत होते. स्वातंत्र्य चळवळीतही अशाप्रकारे व्हीलर आणि मुरो यांनी आपले योगदान दिले आहे.

पुढे टी.के.बी. यांच्यावर कंपनीची सगळे अकाऊंट हाताळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी कंपनीतील इतर इंग्लिश अधिकारी आणि अँग्लो-इंडियन अधिकाऱ्यांनी टीकेबी यांना एकटे पडण्याचा प्रयत्न केला पण मुरो आणि त्याचे मित्र आर्थर व्हीलर दोघेही टीकेबीच्या पाठीशी उभे राहिले.

व्हीलर कंपनीचा विस्तार वाढत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा टीकेबी यांचा प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती हेच त्याच्या कंपनीची खरी जमेची बाजू आहे. पुढे पहिल्या जागतिक महायुद्ध सुरु झाल्यावर कंपनीची आर्थिक बाजू ढासळू लागली. यावेळी टीकेबी कंपनीसाठी घट्ट पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा या कंपनीला सावरले. अशा अवघड काळात इतर भागीदार साथ सोडून गेले तरी टीकेबी मात्र कधीच मागे हटले नाहीत याचा त्यांना पुरेपूर मोबदला मिळाला. १९२२ साली मुरोने टीकेबी यांना कंपनीत भागीदारी दिली.

त्यानंतर दहा वर्षांनी टीकेबी यांच्यासाठी फक्त वरिष्ठ भागीदार हे पद सुरु केले. ३१ वारीजाने १९३७ रोजी मुरोने कंपनीची मालकी टीकेबी यांच्याकडे सोपवून तो कायमचा इंग्लंडला निघून गेला. त्यानंतर २००४ पर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर या एकाच कंपनीची मक्तेदारी राहिली. २६ सप्टेंबर १९४४ रोजी टीकेबीनी अखेरचा श्वास घेतला. तोपर्यंत त्यांचा मोठा मुलगा अनुकूल बॅनर्जी आणि धाकटा मुलगा राजेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कंपनीच्या कामकाजात लक्ष द्यायला सुरुवात केली होती. आज टीकेबीची चौथी पिढी हा सारा डोलारा सांभाळत आहे.

पिटमन, पेंग्विन सारख्या भारतीय इंग्लिश प्रकाशकांसाठी व्हीलर सारख्या मोठे जाळे असणाऱ्या कंपनीमुळे पुस्तक व्यवसायात जम बसवण्यासाठी मोठा फायदा झाला. याच स्टॉलमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी सर्वत्र पसरण्यास मदत झाली आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक मोठ्या लेखकांचे साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठीही याच स्टॉलने मदत केली.

रेल्वेच्या प्रवासातील सगळ्यात सुखकर गोष्ट कोणती तर प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांचा स्टॉल. व्हीलरमुळे रेल्वे प्रवास आनंदी झाल्याची कबुली आजवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी दिलेली आहे. सामान्य माणसासाठी सुद्धा ही बाब तितकीच खरी आहे. याच स्टॉलच्या देशभर पसरलेल्या जाळ्यामुळेच देशभरात एकतेची भावना निर्माण झाली.

या स्टॉलने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कित्येक लोकांना रोजगार पुरवला याची मोजदाद करणेही अवघड आहे. अनेक प्रकाशकांच्या पुस्तकांचे सेल लावणे, त्यांच्या पुस्तकांची विक्री वाढवणे अशी कितीतरी कामे या स्टॉलमुळे सोपी झाली होती.

आता रेल्वने आपले धोरण बदलले आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील स्टॉल जास्त विविधतापूर्ण असावा यासाठी एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळतील अशी व्यवस्था रेल्वे करणार आहे. याला ए. के. व्हीलरचा विरोध असला तरी, यामुळे त्यांची मक्तेदारी मात्र बऱ्यापैकी संपल्याचे दिसत आहे.

या कंपनीची सूत्रे आता चौथ्या पिढीकडे आली आहेत आणि ही पिढी आजच्या कळाशी सुसंगत होऊन कंपनी पुढे कशी चालवायची याबाबत कल्पक विचार करत आहे. नवनवे प्रयोग करत आहे. आधुनिक काळाशी आणि गतीशी जुळवून घेत आहे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required