computer

५२ टन खनिजाची मीडियाने ५२०००टन सोने केल्याची रंजक गोष्ट!!

सोनभद्र येथे ३००० टन सोनं सापडल्याची बातमी प्रचंड व्हायरल झाली होती. ही बातमी खोटी आहे हे काही तासातच उघडकीस आलं. ही बातमी आम्हीही दिली होती हे आम्ही मान्य करतो. त्याबद्दल माफीही मागतो.

तर, ही बातमी जवळजवळ सगळ्याच आघाडीच्या पोर्टल्सनी दिली होती. त्यामुळे त्यावर लोकांचा विश्वासही बसला. एकाचवेळी या सर्व पोर्टल्सनी खोटी बातमी कशी दिली? खरी बातमी काय होती? या सर्व गोष्टी आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

सोनभद्रमध्ये सोनं सापडल्याची बातमी सर्वात आधी २० फेब्रुवारी रोजी स्थानिक वृत्तपत्रांनी दिली. पुढच्या दोन दिवसात ही बातमी जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये आणि न्यूज चॅनेल्सवर दाखवली गेली. ही बातमी अशी की, सोनभद्र येथील खाणींमध्ये ३३५० टन सोनं असून या सोन्याची किंमत १२ लाख कोटी एवढी  प्रचंड आहे. हे सोनं भारताच्या तिजोरीतील एकूण सोन्याच्या ५ पट जास्त आहे.

या बातमीमध्ये ठामपणे सांगण्यात आलं होतं की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने ही माहिती दिली आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

नेमकं काय घडलं?

जागरण न्यूजने दिलेल्या बातमीनुसार सोनभद्रमध्ये सोन्याचं खनिज (gold ore) सापडलं आहे. भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर रोहताश यांनी दिलेल्या माहितीनुसार या खनिजातून किती प्रमाणात सोनं मिळेल यावर त्याचा दर्जा ठरवला जाईल. ही बातमी इंग्रजी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना चुकीच्या स्वरुपात पोहोचली.

खोटी बातमी सर्वात आधी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या महेश विक्रम हेगडे यांनी दिली. या माहितीत म्हटलं होतं की ‘सोनभद्रमध्ये ३३५० टन सोनं सापडलं आहे. हे सर्वच्या सर्व सोनं भारतीय तिजोरीत दाखल होईल.’

पुढे हीच बातमी व्हायरल झाली. या चुकीच्या माहितीत आणखी माहितीची भर पडत गेली. गम्मत म्हणजे दूरदर्शनने देखील खोटी बातमी ट्विट केली. हा ट्विट पाहा.

२१ तारखेला जसजशी ही बातमी व्हायरल होत असताना फायनान्शियल एक्स्प्रेसने एक धक्कादायक माहिती दिली. फायनान्शियल एक्स्प्रेसचा दावा होता की हे सोनं ३००० किंवा ३५०० टन नसून तब्बल ५२,८०६ टन आहे.

खरी बातमी काय होती?

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने लवकरच एक पत्रक जारी करून सगळ्या अफवांना शांत केलं. या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार १९९८-९९ आणि १९९९ ते २००० या वर्षांमध्ये सोनभद्र भागाची पाहणी करण्यात आली होती. तिथे एकूण ५२.८०६ टन सोन्याचा धातू(gold ore) मिळाला आहे. या धातुतून केवळ १६० किलो एवढंच सोनं मिळू शकतं. ३३५० नाही.

ही बातमी इथेच संपत नाही. १९९८ ते २००० सालातील तपासणीनंतर पुन्हा कधीही सोनभद्र येथे तपासणी करण्यात आलेली नाही.

गोल्ड ओर म्हणजे सोन्याचा धातू काय असतो??

अशुद्ध स्वरूपातील सोनं ज्या दगडामध्ये साठलेलं असतं त्याला गोल्ड ओर म्हणजे सोन्याचा धातू म्हणतात. हे सोनं ग्रॅम्स पर मेट्रिक टन (g/t) या परिमाणात मोजतात. भारतीय माध्यमांनी सोन्याचा धातू आणि खरं सोनं यात गफलत केली होती.

तर मंडळी, अशा प्रकारे संपूर्ण भारतीय मिडीयाचीच यानिमित्ताने फजिती झाली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required