computer

व्हिझिटिंग कार्डवाल्या गीता काळेमावशी...कार्ड पाहून तुम्ही पण त्यांना फोन केलात ना?

कुठल्याही बिजनेसमध्ये यशस्वी होण्याचा सर्वात महत्वाचा फंडा आहे तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी!! जेवढी हटके तुमची मार्केटिंग तेवढी तुमची यशस्वी होण्याची  शक्यता जास्त. पण आज आम्ही ज्यांची गोष्ट सांगणार आहोत, त्यांचा खूप मोठा बिजनेस नाही त्या एक घर काम करणाऱ्या मावशी आहेत पण त्यांच्या एका कृतीने त्या रातोरात प्रसिद्ध तर झाल्या आहेतच पण त्यांना कामासाठी देशभरातून कॉल्स येत आहेत. तुम्ही म्हणाल कसे? तेच तर सांगणार आहोत मंडळी आम्ही!!!

बावधनमधील गीता काळे या धनश्री शिंदे यांच्याकडे घरकाम करायला जातात. त्या सतत चिंतेत असायच्या की कामे कशी मिळवायची, धनश्री शिंदे यांनी त्यांना सहज म्हणून एक आयडीया सांगितली आणि त्या एका रात्रीत फेमस झाल्या. ती आयडीया होती व्हिजिटिंग कार्ड तयार करण्याची. धनश्री शिंदे यांनी गीता मावशीला सगळी माहिती विचारून घेतली आणि त्यानुसार व्हिजिटिंग कार्ड तयार करून घेतले. आणि आजूबाजूच्या सोसायटीमधील वॉचमनला देऊन आल्या, जेणेकरुन वॉचमन ते कार्ड इतर लोकांना देतील. धनश्री शिंदे आणि गीतामावशीला पण आजूबाजूचे लोक बघतील आणि आपल्याला काम मिळेल एवढीच अपेक्षा होती. पण ते कार्ड वाऱ्यासारखे सोशल मीडियावर पसरले. 

गीतामावशीला दुसऱ्या दिवशी सकाळी कामासाठी एक कॉल आला. त्यानंतर जे कॉल सुरू झाले ते थांबत नव्हते. आणि हे कॉल आजूबाजूच्या सोसायटीमधून नव्हे तर देशभरातून येत होते. मुंबई, पुणे सोबतच दिल्ली आणि देशातल्या इतर राज्यातून त्यांना कामासाठी मागणी होऊ लागली. फोनकॉल्स एवढे वाढले की शेवटी गीतामावशीला फोन बंद करून ठेवून द्यावा लागला. 

हे कार्ड वायरल झाले त्यामागे सुद्धा धनश्री शिंदे यांचा हात आहे. त्यांनी सहज म्हणून आपल्या एका मित्राला ते कार्ड व्हाट्सअपवर पाठवले, त्यांनी ते इतर ग्रुप्सवर पाठवले आणि ते कार्ड बघता बघता जगभर व्हायरल झाले. घर काम करणारी बाई व्हिजिटिंग कार्ड तयार करत आहे, जग किती पुढे चालले बघा, यासारखे जोक पण सोशल मीडियावर फिरू लागले. त्याचबरोबर त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे पण कौतुक होऊ लागले.

सध्या त्यांना हवे तसे काम त्यांच्या राहत्या जागेपासून जवळच मिळाले आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून येणाऱ्या ऑफर्सना त्या नम्रपणे नाकारत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required