computer

हा शास्त्रज्ञ तब्बल ५० वर्ष बोटं का मोडत राहिला ?

लहानपणी आईने ‘बोटं मोडल्याने संधिवात होतो’ असं सांगितल्यावर डॉक्टर डॉनाल्ड उंगर यांनी ते फारच मनावर घेतलं. आईने दिलेली ताकीद विसरून ते आयुष्याची तब्बल ५० वर्षे बोटं मोडत राहिले. का ? खरंच संधिवात होतो का हे पाहण्यासाठी !!

मंडळी, डॉनाल्ड उंगर यांनी ५० वर्षात डाव्या हातांची बोटे रोज २ वेळा मोडली. उजव्या हाताने जोर द्यायचा आणि डाव्या हाताची बोटे मोडायची हा त्यांचा रोजचा क्रम होता. त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांनी डाव्या हाताची बोटे तब्बल ३५,५०० वेळा मोडली. उजव्या हाताची बोटे ते फारच क्वचित मोडत. त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘क्वचित किंवा उत्स्फूर्तपणे’.

तर, हे करण्यामागचं कारण होतं संधिवात खरंच होतो का हे पाहणं. बोटं मोडून झाली की ते स्वतःच्या हातांचं परीक्षण करायचे. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की बोटं मोडल्याने संधिवात होतो ही फक्त एक अफवा आहे. ते यावर आणखी संशोधन करण्याच्या तयारीत आहेत.  हे सगळं करत असताना त्यांना प्रश्न पडला की लहान मुलांना आणखी कोणकोणत्या खोट्या गोष्टी शिकवल्या जातात? कदाचित यावर पण ते संशोधन करतील.

डॉनाल्ड उंगर यांच्या या अफलातून संशोधनासाठी त्यांना २००९  साली नोबेल पुरस्कार मिळाला....पण पण..हा नोबेल पुरस्कार तो नेहमीचा नोबेल पुरस्कार नव्हे. हे आहे Ig Nobel Prize. हे खऱ्या नोबेल पुरस्काराचं उपहासात्मक रूप आहे. काहीशा विनोदी तरीही विचार करायला लावणाऱ्या संशोधनांना हा पुरस्कार दिला जातो.

डॉनाल्ड उंगर यांच्या सोबत ज्या लोकांना पुरस्कार मिळाला त्यांची यादी आणि कर्तुत्व पाहिल्यावर हा पुरस्कार किती भन्नाट आहे हे तुमच्या लक्षात येईल. शांततेचं आयजी नोबेल मिळालेल्या या मंडळींचं उदाहरण घेऊया. शास्त्रज्ञांच्या ५ जणांच्या टीमने हे तपासून पाहिलं की भरलेली बियरची बॉटल डोक्याला जास्त इजा पोहोचवते की रिकामी बॉटल. आता याचं उत्तर लहान मुल पण देईल.

(आयजी नोबेल)

उंगर यांचं सगळं संशोधन वाया गेलं का ?

नाही!! उंगर यांचं संशोधन बाहेर येण्यापूर्वी माणसांच्या बोटांवरचं संशोधन हे फारच जुनाट झालं होतं. उंगर यांच्यामुळे विज्ञानाच्या हाती नवीन संशोधन लागलं. तसेच नवीन संशोधनास चालना मिळाली.

 

तर मंडळी, काय म्हणाल या वेडेपणाबद्दल ??

सबस्क्राईब करा

* indicates required