क्रूर सिरियल किलर्स: जाळून खून करून समुद्रात फेकून देणारा नृशंस ऑटोशंकर!

जगात गुन्ह्यांना अंत नाही. गुन्हे होतात, बरेचदा गुन्हेगारांना शिक्षा होते, काहीवेळा गुन्ह्यांची उकलही होत नाही. पण या गुन्ह्यांत खूनसत्र घडवणारे अधिक लक्षात राहतात. सोप्या भाषेत आपण त्यांना सिरियल किलर्स म्हणतो. हे कधी मानसिक रोगी असतात, काहींना त्याची चटक लागते, तर काही अगदीच थंड डोक्याने हे सर्व खून करत आणि पचवत राहतात. अर्थात कधी ना कधी सुदैवाने त्याचा अंतही होतो. 

भारतात असे अनेक सिरीयल किलर होऊन गेले, त्यातल्या काहींवर सिनेमेही आले. काही सिरीयल किलर मात्र आजही अज्ञात आहेत. या सिरीयल किलर्सवर एक लेखमाला करून आम्ही हे सिरीयल किलर नेमक्या कोणत्या मानसिकतेतून हे खून करतात याचा शोध घेणार आहोत. आजच्या पहिल्या लेखात आपण ऑटो शंकर या सिरीयल किलरची माहिती घेऊ...

एका साधारण गुंड. मात्र त्याने चेन्नईच्या रस्त्यांवर मृत्यूचा तांडव घडवून आणला होता. ही कहाणी कुणाचीही मती गुंग आणण्यासाठी पुरेशी आहे. गौरीशंकर नावाचा हा इसम तमिळनाडू येथील वेल्लोर येथे १९५५ साली जन्माला आला. त्यावेळी चेन्नईचे नाव मद्रास होते आणि तामिळनाडूतले लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मद्रासला जात असत. 

मद्रास सिनेइंडस्ट्रीचे आकर्षण तरुणांना या शहराकडे आकर्षित करत असे. गौरीशंकरलाही सिनेमाचे चांगलेच वेड होते. त्याला चांगले पेंटिंग येत असल्याने तो मद्रासमध्ये पेंटिंगची कामे करू लागला. पुढे त्याने हे पेंटिंगचे काम बंद केले आणि ऑटो चालवू लागला. इथे गौरीशंकरची ऑटो शंकर बनण्याची सुरुवात झाली. तो काळ मद्रासमधल्या दारू तस्करीचा होता. 

रिक्षा ही तेव्हा तस्करीसाठी योग्य साधन होते, कारण कोणी रिक्षाची विशेष तपासणी करत नाही. दारूतस्करीत शंकरला पैसा दिसू लागला. मग भाऊने मोर्चा वळवला दारू तस्करीकडे. गुन्हेगारी जगत हे एक व्यसन असते. इथे तुमची फक्त एन्ट्री होते, एक्झिट तुमच्या हाती नसते. जी एक्झिट होते ती थेट या जगातून होत असते. शंकर गुन्हेगारी जगतात प्रवेश करता झाला, तसे त्याला पैसे कमविण्याचे नवे मार्ग खुणावू लागले. तो आता सेक्स रॅकेट चालवू लागला. रिक्षात बसवून वेश्यांना घेऊन जाणे, घेऊन आणणे असे काम तो करत असे. पैसे आले की मग त्यातुन अजून पैसा मिळवायचा तर दहशत हवी. याच दहशतीसाठी मग शंकरने स्वतःची गॅंग सुरू केली. शंकर नंतर गॅंगचा सर्वेसर्वा त्याने त्याचाच लहान भाऊ मोहन याला केले. 

तिरुवनमयूर हा भाग त्यांचा दहशत आणि गैरव्यवहाराचा अड्डा बनला होता. या भागात प्रत्येक गैरव्यवहार हा शंकरच्या मदतीने होत असे. त्याचे सेक्स रॅकेटही जोरात सुरू होते. एखाद्या सिनेमातील व्हिलन जसा दिवसेंदिवस श्रीमंत होत जातो तशी ही स्टोरी पुढे सरकत होती. सिनेमा पण समाजाचाच आरसा असतात म्हणा...

झोपडपट्टी ते मद्रासमधील उच्चभ्रू एरिया.. सगळीकडे शंकरचे सेक्स रॅकेट जोरात चालू होते. यासाठी त्याने खालपासून वरपर्यंत सगळ्यांना खिशात घातले होते. अधिकारी आणि मोठया लोकांना खुश ठेवण्यासाठी शंकर त्यांनाही मुली सप्लाय करत असे. एका विशिष्ट यशानंतर, मग ते कोणतेही यश असो या यशाची हवा डोक्यात जायला लागते. 

मद्रासला पोट भरण्यासाठी आलेला एक सामान्य तरुण आता मद्रासचा बादशहा होत होता. आपल्याला कोणी अडवू शकत नाही, सर्व आपल्या खिशात आहेत असे त्याला वाटू लागले होते. १९८८ साली मद्रास शहरात चांगल्या घरातल्या ९ मुली एकाचवेळी गायब झाल्याची घटना घडली. हे काम कुणाचे असेल याबद्दल अनेकांना माहिती होती. पण पोलीस उलट या मुली स्वतःहून वेश्या व्यवसाय करण्यासाठी पळून गेल्या असे म्हणू लागले. या मुलींच्या कुटुंबाने जोर लावल्यावर देखील या मुलींचा काहीही पत्ता लागू शकला नाही. अशा वाईट पद्धतीने शंकर आपला व्यवसाय वाढवत होता. 

या काळात शंकरकडील ललिता नामक मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. शंकरने जंगजंग पछाडून दिला शोधून काढले. तिला परत तर आणले, पण तिला परत वेश्या व्यवसायात न आणता मारून टाकले. तिच्या प्रियकराला आधी जाळले आणि मग समुद्रात फेकले. हे सर्व वाचत असताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आम्ही ही गॅंगस्टरची स्टोरी सिरियल किलर म्हणून का खपवत आहोत?

तर हा शंकर जरी गँगस्टर असला तरी तो सिरीयल किलर्सप्रमाणेच क्रूर होता. आधी जाळून टाकणे आणि मग समुद्रात फेकणे ही त्याची खून करण्याची पद्धत होती. त्याच्या क्रूरतेचे अनेक किस्से पुढे वाचता येतील. फरक फक्त इतकाच की बाकी सिरीयल किलर सहसा एकटे सर्व खून करत असतात. ऑटो शंकरसोबत त्याची पूर्ण यंत्रणा होती. 

त्याची दहशत इतकी वाढली की दिवसाढवळ्या मुलींचे अपहरण केले जात असे. एकदा अशाच एका झटापटीत एक मुलगी पळून गेली आणि तिने पोलिसांना हा सर्व अनुभव सांगितला. पोलीसही त्याच्या वाढत्या त्रासाला कंटाळले होते. लोकांना जाळून समुद्रात फेकण्याची त्याची क्रूरता सर्वांना सहन होईनाशी झाली होती. त्याला उचलण्यात आले. पण वरती असलेले संबंध वापरून दुसऱ्या दिवशी शंकर बाहेर पडला. त्याचे तगडे राजकीय संबंध होते. पण योगायोगाने त्याचकाळात तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि तिथला कारभार पीसी अलेक्सांडर हे राज्यपाल म्हणून बघू लागले.

गायब झालेल्या मुलींचे नातेवाईक राज्यपालांकडे आपली गाऱ्हाणी घेऊन मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले. पोलीस त्याचे काहीही करायला कमी पडत होते. अलेक्सांडर यांनी या मोहिमेची जबाबदारी आरी नावाच्या एका स्पेशल ऑफिसरवर सोपवली. हा आरी शंकरला जवळून ओळखत असे. आरीने सुरुवातीपासूनच दणके द्यायला सुरुवात केली आणि शंकरचा एक माणूस आरीला घाबरून फुटला. 

आता परत एकदा शंकरला उचलले गेले. यावेळी त्याच्याकडे जे सापडले त्याने तमिळनाडू हादरून गेले. भिंतीमध्ये गाडण्यात आलेली काही प्रेतं आणि त्याला मदत करणाऱ्या पोलिसांची माहिती सापडली. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्याला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते तिथूनही तो तीन जेल वॉर्डनच्या मदतीने सटकला. 

जेलमध्ये असूनही तिथे त्याला सर्व सुखसोयी मिळत होत्या. पुढे या तिन्ही जेल वॉर्डनना ६ महिन्यांची शिक्षा झाली आणि शंकरही पुन्हा पकडला गेला. जेलमधून पळाल्याने त्याला शिक्षेत कुठलीही सूट मिळणे शक्य नव्हते. त्याला १९९५ साली फासावर लटकवण्यात आले. अशा पद्धतीने एका क्रूर गॅंगस्टरचा अंत झाला.

तुम्हाला ही सर्व गोष्ट एखाद्या क्राईम सिनेमाची स्क्रीप्ट वाचल्याप्रमाणे वाटत असेल. पण ऑटो शंकरवर सर्वात जास्त कुणाचा प्रभाव होता, तर ती गोष्ट सिनेमा होती. त्याला सिनेमात दाखवतात तसा व्हिलन बनायचे होते आणि सिनेमातील गोष्टी तो खऱ्या आयुष्यात करून आनंदी होत असे. याच सिनेमाप्रेमाने त्याला पशू बनवले आणि त्याच्यामुळेच त्याचा अंत झाला....

सबस्क्राईब करा

* indicates required