computer

इंदिरादेवी - बंडखोर राजकन्या, उधळपट्टी करणारी राणी ते राज्यावरची सगळी कर्जे फेडणारी राजमाता!

आपले संस्थानिक अत्यंत ऐष आणि आरामात जगले. ब्रिटिशांच्या काळातल्या या संस्थानिकांच्या कहाण्या वाचल्या तर बरेचजण परदेशात शिकले, जगभर फिरले म्हणण्यापेक्षा ते तेव्हाच एनआ आय असल्यासारखे भारतात कमी आणि युरोपात जास्त राह्यले, भारतात राहूनही इथल्या मातीतले कमी आणि पोलो-बॅडमिंटनसारखे परदेशी खेळ जोपासत राहिले, परदेशी लोकांशी लग्नं केली. युरोपातल्या सर्वात महाग समजल्या जाणाऱ्या मोनॅको देशातही जाऊन काहीजण राह्यले.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका वैभवात जगलेल्या राजकन्येची गोष्ट सांगणार आहोत. का? सव्वाशे वर्षांपूर्वी राजघराण्याची बंधनं झुगारणारी, दुसऱ्यांनी आखून दिलेलं आयुष्य न जगता आपल्याला हवं तसं जगणारी, वैधव्य आलं तरी त्याचा बाऊ न करता उलट फॅशनचे धडे देणारी आणि  हतबल-निराधार-अबला स्त्री अशा शब्दांनाही जवळ येऊ न देणारी मराठी राजकन्या विशेषच मानावी लागेल ना? आणि हो, या राजकन्येचा लहानपणीचा फोटो तुम्ही नक्की पाह्यलाय. कुठे?  

शिकण्याची हौस असलेल्या पुण्याच्या बाहुली नावाच्या मुलीला काच घातलेला लाडू खायला घातल्यामुळे ती वारली ही फॉरवर्ड होऊन आलेली गोष्ट वाचली असेलच ना? त्या लेखासोबत येणारा फोटो त्या बाहुलीचा नाही, तो आहे आपल्या बडोदा संस्थानच्या राजकन्या इंदिरादेवींचा!! आज आपण त्यांचीच गोष्ट वाचणार आहोत. 

(इंदिरादेवी)

इंदिरादेवींच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. बडोदा संस्थानाच्या गायकवाड घराण्यात त्यांचा जन्म झाला होता, गायकवाड म्हणजे भारतातील मोठ्या मराठा  संस्थानिकांपैकी एक! त्यांचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी  ग्वालियरचे संस्थानिक माधवराव सिंदीया यांच्या सोबत करण्याचे निश्चित झाले होते. दोन मोठी मराठा घराणी या लग्नामुळे एकत्र येणार होती. त्यामुळे या लग्नाला फारच महत्व होते. पण इंदिरादेवींना मात्र होणारा पती पसंत नव्हता . कारणं अनेक होती. पण मुख्य कारण होते दोघांच्या वयातील फरक - ग्वालियरचे महाराज चाळीस वर्षांचे होते, त्यांचं आधी लग्न झालेलं होतं. पण त्या पत्नीला मूलबाळ होईना म्हणून ते इंदिरादेवींशी लग्न करणार होते. त्यांची शिस्त फारच कडक आणि नियमबध्द होती, उदाहरणार्थ, लग्नानंतर फक्त दर मंगळवारी ते नव्या राणीसोबत रात्र घालवणार होते. लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या इंदिरादेवींना वैयक्तिक स्वातंत्र्याची सवय होती. ग्वालियरला गेल्यावर आयुष्य पडद्याआड गेले असते. असो, साखरपुडा झाला. पण  मनाविरुध्द!! 

मात्र, या लग्नाला वेगळीच कलाटणी मिळाली. १९११ साली पंचम जॉर्जचे आगमन भारतात झाले. त्यांच्याशी निष्ठा दाखवण्यासाठी सर्व संस्थानिकांना दिल्ली दरबारात येण्याचे आमंत्रण आले. हा सोहळा सात दिवसांचा होता. दरबारानंतर लॉन पार्टी, पोलो, क्रिकेट यांच्या स्पर्धा असा हा कार्यक्रम होता. इथे इंदिरादेवींची भेट कूचबिहारच्या जितेंद्र नारायण भूप बहादूर या धाकट्या राजपुत्राशी झाली. दोघंही विलायती वातावरणात वाढलेले असल्याने मैत्री जुळली आणि दरबारी सोहळे संपतासंपता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पण इंदिरादेवींचा विवाह तर निश्चित झालेला होताच. प्रेमात पडलेले जीव नेहमी धाडसी असतात.

इंदिरादेवींनी दरबारा सोहळ्यासाठी आलेल्या ग्वालियरच्या महाराजांकडे  ठरलेले लग्न करण्यास नकार देणारे एक पत्र पाठवले. इकडे बडोदा संस्थानात लग्नाची धामधूम सुरु झाली आणि ग्वालियर संस्थानातून राजकन्या इंदिरादेवींच्या पत्राचा खुलासा मागवणारे पत्र येऊन धडकले. एकच गोंधळ उडाला. राजकन्येला धाक दाखवण्यात आला, राजघराण्यातून हकालपट्टी करण्याची धमकी देण्यात आली, पण काही उपयोग झाला नाही. इंदिरादेवी आपल्या निर्णायवर ठाम होत्या. शेवटी लग्न मोडलं.

कूच बिहारच्या राजपुत्राशी विवाह इंदिरादेवींच्या आई वडीलांना मान्य नव्हता याची दोन कारणं होती- एकतर हा राजपुत्र धाकटा मुलगा असल्याने गादीवर बसणार नव्ह्ता,  दुसरे कारण असे की कूचबिहारचे घराणे फारच आंग्लाळलेले होते. त्यांचे रहाणीमान ब्रिटिशांना लाजवेल इतके ब्रिटिश होते. कूचबिहारच्या राजकन्यांनी ब्रिटिश युवकांशी लग्न् केले होते. यासोबतच  राजपुत्राला मद्यासक्तीचा शापही होताच. कर्मठ मराठा संस्थानिकांना हे सगळेच अमान्य होते. प्रेमात बुडलेल्या  इंदिरादेवी आणि जितेंद्र नारायण भूप बहादूर या दोघांनाही कशाचीच पर्वा नव्हती. शेवटी १९१३ साली दोघांनी लंडनला लग्न केले. या लग्नाला बडोदा संस्थानातून कोणीही उपस्थित नव्हते.

(इंदिरादेवी आणि जितेंद्र नारायण भूप बहादूर)

या दरम्यान कूचबिहारमध्ये काही भलतेच घडत होते. त्यावेळी राज्याच्या गादीवर असलेले युवराज म्हणजे नारायण भूप बहादूर एडना मे नावाच्या ब्रिटिश नटीच्या प्रेमात पडले. त्यांना एडनाशी लग्न करायचे होते. पण  गादीवर असल्याने हे लग्न शक्य नवहते. या नैराश्यातून त्यांनाही अतिमद्यासक्तीचे व्यसन  लागले. इंदिरादेवी आणि जितेंद्र नारायण यांचा विवाह झाल्यानंतरच काहीच दिवसात त्यांचा मृत्यू झाला.

वडील बंधूंनंतर राज्याची जबाबदारी जितेंद्र नारायण भूप बहादूर यांच्यावर आली. नवविवाहित दांपत्याचे वैवाहिक जीवन आनंदात सुरु झाले. कूचबिहारच्या बाहेर म्हणजे दार्जीलिंग किंवा युरोपमध्येच वर्षाचा बहुतांश काळ जायला लागला. राजपुत्र जेवढे संस्थानाच्या बाहेर राहतील, ते सरकारच्या पथ्यावरच पडायचे. त्या काळात संस्थानिकांना शून्य जबाबदार्‍या आणि मुबलक धन हातात असायचे. मग काय, त्यांच्याकडे रोजच दिवाळी असायची. 

(कूचबिहारचा महाल)

एकूण दहा वर्षांच्या संसारात या दांपत्याला पाच अपत्ये झाली. जितेंद्र नारायण भूप बहादूर अवघ्या ३६व्या वर्षी अतिमद्यपानामुळे वारले. तेव्हा राज्यासकट सर्वच जबाबदारी इंदिरादेवींवर येऊन पडली. त्यांचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य स्वप्नवत स्वर्गात गेले होते. आता मात्र या विधवेवर गादीवर बसलेल्या नव्या राजाची 'रीजंट' म्हणून जबाबदारी आली. सोबत आले दरबारी राजकारण! त्यांच्या दिराचा डोळा गादीवर होता. त्याच्या महत्वाकांक्षेला आवर घालणं खूप महत्त्वाचं होतं.

युरोपात राहून पैसे उधळणारी आणि कर्जात बुडलेली सासू वारंवार पैसे मागत असायची, विलायतेत गोर्‍यासोबत लग्न केलेल्या नणंदेने याचदरम्यान दिवाळखोरी जाहीर केली. दरबारातील मंडळी तिला बाहेरची-उपरी समजायची. काही दरबारी तिचे एका मुस्लिमासोबत संबंध आहेत ही अफवा पसरवण्यात गुंतलेले होते आणि राज्य कर्जात बुडलेले होते!! ब्रिटिश सरकार पुढे काय राजकारण् करणार हीसुद्धा एक मोठीच समस्या होती.

या सर्व समस्या बाजूला ठेवून इंदिरादेवींनी थेट लंडन गाठले. पुन्हा एकदा अय्याशीचे आयुष्य घालवायला सुरुवात केली. कॅसिनोत जाऊन जुगारावर लाखो रुपये बाजीला लावायला सुरुवात केली. त्या जुगार खेळताना 'लक' साठी एक रत्नजडीत कासव समोर ठेवणारी ठेवायच्या.  ४३ क्लबसारख्या संशयास्पद क्लबमध्ये रात्र घालवायच्या. या सगळ्या प्रकाराचा इतका अतिरेक झाला की शेवटी ब्रिटिश सरकारने त्यांना भारतात परत जाण्याची आज्ञा दिली.  नवऱ्याच्या मृत्यूनंतर ७ वर्षांनी १९२९ साली त्या भारतात परत आल्या. पण इथेही तेच वैभवी-उधळे आयुष्य चालू होते. असं सांगितलं जातं की इंग्लंडहून आलेल्या शाही पाहुण्यांच्या स्वागतार्थ चौदा वाघांच्या कातड्यांपासून बनवलेले कार्पेट अंथरण्यात आले होते.

हे सर्व चालू असताना राज्याची तिजोरी रिकामी होत आली होती. इंदिरादेवींना याची चाहूल लागताच त्यांनी  सूत्रे हातात घेतली आणि अडीच वर्षांत राज्यावरची सर्व कर्जं फेडून कारभार सुरळीत केला. संस्थानाच्या कारभारासाठी त्यांना लोकांसमोर येणे भाग होते.  पण कपाळी वैधव्य असल्याने राजघराण्यातल्या भरजरी साड्या नेसण्याची मुभा नव्हती. यावर उपाय म्हणून त्यांनी पाचवारी शिफॉनच्या साड्यांचा वापर सुरू केला.

शिफॉनच्या कपडय़ाला एक प्रकारची ऐट असते. थोडेसे झिरझिरीत असे हे कापड भडक दिसत नाही. त्याचा पोतही शांत म्हणता येईल असा असतो. त्यावर वापरले जाणारे रंग त्यामुळे झगमगत नाहीत आणि भारदस्त अशी छाप पडते. त्यानंतर त्यांच्या सगळ्या साड्या पॅरिसहून विणून यायच्या.आयुष्यातल्या एका खिन्न परिवर्तनाला त्यांनी हे असे वेगळे वळण दिले. मात्र, एकदा राज्याचा गाडा सुरळीत चालू झाल्यावर त्यांनी राज्याची सूत्रे थोरल्या मुलाच्या हातात दिली आणि पुन्हा लंडनला आपले घर हलवले.

मनाला येईल तसे वागणार्‍या या राणीचे मनाला कौतुकही वाटते पण काही वेळा त्यांच्या मनमानीपणाचे किस्से वाचणार्‍याला राग पण आणतात. एक गोष्ट मात्र नक्की की इंदिरादेवी त्याकाळच्या इतर स्त्रियांप्रमाणे हतबल, निराधार, विधवेसारख्या वागल्या नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वातला ताठा नेहमी कायमच राहिला. लंडनच्या इमिग्रेशन खात्याच्या अधिकार्‍याने जेव्हा त्यांना त्यांचे आडनाव विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते,  “Surname???  I have no surname. I am Her Highness Indira of Cooch Behar."

भारी होती ना ही बाई?

सबस्क्राईब करा

* indicates required