रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग दोन !!!

भाग १

मुंबईच्या हाय कोर्टात खटला सुरु झाला. हल्लेखोरांच्या बाजूने वकील होते बॅ. मोहमद अली जीना. एकेक साक्षीदार पुढे येत गेले आणि कहाणी उलगडत गेली. जीनांनी हल्लेखोरांचे उद्दीष्ट खून नसल्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला .पण मुमताजच्या चेहेर्‍यावर केलेला वार त्या मुद्द्याला खोडून काढत होता. बावलानी गोळ्या झाडल्याचा मुद्दा पण पुढे आला. बावलाचे पिस्तूल कोर्टापुढे आले.त्यातून एकही गोळी झाडली नसल्याचे स्पष्ट झाले.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून वकीलांनी असा मुद्दा मांडला की मुमताज इंदूरला यायला तयार होती पण बावला विरोध करत होता. इथे बॅ.तेव्हाचे सुप्रसिध्द वकील नरीमन यांनी साक्ष दिली की या हल्ल्याच्या काही दिवस अगोदर मुमताज त्यांच्या कडे कायदेशीर सल्ला घ्यायला आली होती तेव्हा तिने स्पष्ट केले होते की जीव गेला तरी चालेल पण इंदूरला जाणार नाही.

सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी शेवटपर्यंत कोणाच्या आदेशावरून हा खून करण्यात आला हे सत्य जगासमोर येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न केलांयायाधिशांनी ज्युरीसमोर केलेल्या भाषणाच्या प्रत्येक विधानात इंदूरकडून एव्हढाच उल्लेख आला. तुकोजीरावांचे नाव प्रत्यक्ष घेण्यात सगळेच घाबरत होतेआणि महाराज आपल्या रंगीन रात्री इंदूरात सुखाने घालवत राहीले.सर्वसाधारण सरकारी नोकरांच्या बचावाला बॅ. जीनांसारखा वकील कसा उभा राहीला याची वाच्चता पण कोणीही केली नाही.

सात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली. तिघांना फाशी तर इतरांना जन्मठेप. जन्म ठेप झालेल्यापैकी एका कोर्टातच वेड लागले. फणसे नावाच्या एका हल्लेखोराला शिक्षेत सूट द्यावी असे न्यायाधिशांच्या मनात असूनही त्यांना तसे करता आले नाही. केस अपीलात प्रिव्ही कौन्सीलासमोर लंडनला चालवण्यात आली. दहा हजार पौंडांचा बयाणा घेऊन सर जॉन सायमन या ज्येष्ठ कायदे तज्ञाला उभे करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. महाराज तुकोजीराव इंदूरमध्ये मौजेत होते. त्यांच्या वैयक्तीक सूडाच्या प्रवासात अनेक माणसं जीवाला मुकली.

*******************

एकदा कायदेशीर तरतूदी संपल्यानंतर तुकोजीरावांना ब्रिटीशांनी कयद्याच्या कचाट्यात धरले . त्यांच्या समोर एकतर कायदेशीर चौकशीला सामोरे जा किंवा राज्यत्याग करा असा पर्याय ठेवण्यात आला.
तुकोजीरावांवी दुसरा पर्याय स्विकारला.तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि सतरा वर्षाच्या त्यांच्या अल्पवयीन मुलाला, यशवंतरावांना गादीवर बसवले.

शक्य तो दूर रहा असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुळे ते युरोपात गेले आणि इथेच त्यांचीभेट नॅन्सी अ‍ॅनी मिलरसोबत झाली. पुढे इंदूर पिअर्सची जोडी नॅन्सी मिलरच्या मृत्यूनंतर बाजारात विकायला आली.

हॅरी विन्स्टन नावाच्या सुप्रसिध्द जव्हेर्‍यानी ती जोडी विकत घेतली .या हिर्‍यांना परत एकदा पैलू पाडण्यात आले. त्यानंतर इंदूर पिअर्सची विक्री करण्यात आली. काही दिवसानी हॅरी विन्स्टननी ते परत विकत घेतले आणि पुनश्च विकले.सरतेशेवटी आता ही इंदूर पिअर्सची जोडी रॉबर्ट मोवाड ह्या आणखी एका सुप्रसिध्द जव्हेर्‍याच्या संग्रहात आहे.

*******************

इंदूर पिअर्स आहेत तिथे सुरक्षीत आहेत पण काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

मारणारे फाशी गेले ते त्यांच्या गुन्ह्यातील सहभागामुळे पण पंचवीस तीस वर्षाच्या या तरुणांना इरेस घालणारा कायद्याच्या बाहेर कसा राहीला आणि ते सुध्दा न्यायप्रिय म्हणून मिरवणार्‍या ब्रिटीशांच्या राज्यात ?

अब्दुल कादेर बावलाला न्याय मिळाला पण मुमताझ आणि तिच्या मुलीला न्याय मिळाला का ?

नॅन्सी मिलरची राणी शर्मीष्ठादेवी म्हणून इतिहासात नोंद झाली .पण प्रतिशोधाच्या पाशवी प्रवासात मुमताझ कुठे गेली हे कुणालाच माहीती नाही.

तुकोजीराव सुध्दा ब्रिटीशांच्याच काय पण आकाशातल्या कायद्याच्या हातावर तुरी देऊन कसे उजळमाथ्यानी जगत राहीले.

मुमताझचं बावलावरचं प्रेम आंधळं होतं.

तुकोजीरावांचा प्रतिशोधही आंधळा होता.

ब्रिटीशांचा कायदा पण आंधळा होता.

 

समाप्त

सबस्क्राईब करा

* indicates required