computer

दीड वर्षांत १० खून आणि दरोड्यांनी हादरवून टाकणाऱ्या पुण्याच्या जोशी-अभ्यंकर केसचे भयानक सत्य आणि तपास वाचा या खास लेखात...

मोठमोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत शकडो गुन्हे घडत असतात. छोट्यामोठ्या चोऱ्यांपासून खून बलात्काराच्या प्रकारापर्यंत अनेक घटनांची नोंद वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर होत असते. अशा घटनांना जोडणारा धागा क्वचितच अस्तित्वात असतो. एकाच पद्धतीने, एकाच लकबीने झालेल्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा तर्काद्वारे जोडली जाते तेव्हा त्याला सिरीयल क्राईम असे म्हटले जाते.

आज आपण ज्या जोशी-अभ्यंकर खून सत्रांची स्टोरी वाचणार आहोत त्यातले अनेक दुवे जेव्हा या शृंखलेतला शेवटचा गुन्हा नोंदला गेला तेव्हा जोडले गेले.... आणि एक भयानक सत्य जनतेसमोर उभे राहिले. या स्टोरीला हात घालण्यापूर्वी १९७५ सालचे पुणे शहर कसे होते हे आपण आधी जाणून घेऊया.

७० च्या दशकातलं पुणे

आज पुणे म्हटले की आपल्यासमोर ज्याला प्रति बंगलोर म्हणता येईल असे एक महानगर डोळ्यांसमोर येते. ७५-७६ साली मात्र पुणे म्हणजे उच्चभ्रू रिटायर्ड लोकांचे शहर समजले जायचे. आज आपण ज्याला शहराचा मध्यवर्ती भाग समजतो ते कोथरूड अजून तयार व्हायचेच होते. इतकं कशाला, वनाज इंजिनियरिंगच्या जवळ तेव्हा ३ ते ४ हजारात एक गुंठा जमीन मिळायची.  

खूनसत्र

अशा छोट्याश्या पुणे शहरात जेव्हा विश्व नावाच्या एका हॉटेलच्या मालकाचा मुलगा प्रकाश हेगडे अचानक दिसेनासा झाला तेव्हा शहरात खळबळ माजली. ही घटना सहा-सात महिने जुनी होते आहे न होते आहे, तोपर्यंत विजयनगर कॉलनीतल्या अच्युत जोशी, त्यांची पत्नी उषा जोशी आणि मुलगा आनंद जोशी यांची हत्या झाली. तिघांचेही खून नायलॉनच्या दोरीचा गळ्याभोवती फास आवळून करण्यात आले होते. त्यांच्या बंगल्यामध्ये सर्वत्र एक सुगंधी अत्तर शिंपडण्यात आले होते. पोलिसी कुत्र्यांनी (डॉग स्क्वाड) माग काढून नये हा एकच उद्देश या सुगंधी अत्तारापाठी असावा हे स्पष्ट होते.

या घटनेनंतर ३-४ महिने जातात न जातात तोच भांडारकर रोडवरच्या स्मृती बंगल्यात राहणाऱ्या अभ्यंकर कुटुंबातील ५ जणांचा खून करण्यात आला. यामध्ये वयोवृद्ध काशिनाथशास्त्री अभ्यंकर, त्यांची इंदिराबाई, नात जाई, नातू धनंजय आणि घरकाम करणाऱ्या सखुबाई वाघ यांचा समावेश होता. जोशी कुटुंबियांप्रमाणेच हे खून सुद्धा रात्री १० च्या आधीच झाले होते. पुन्हा एकदा सुगंधी द्रव्याचा वापर या घटनास्थळी पण केला गेला होता.

(हा आहे अभ्यंकर कुटुंबाचा स्मृती बंगला. आज स्मृती बंगल्यात मूक बधीर मुलांसाठी शिक्षण केंद्र आहे)

थोड्या दिवसाच्या अंतराने घडलेल्या या ८ खुनानंतर पूर्ण पुणे शहर भयग्रस्त झाले होते. संध्याकाळी ७-७.३० ला तुळशीबागेसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा ओस पडायला लागल्या. भयगंडाने पछाडलेले पुण्याचे नागरिक दिवसा-उजेडीच घरी परतायला लागले होते. पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरायला लागली होती. नेहमीचे सराईत गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारी टोळ्या यांच्या मागावर पोलिसांच्या पथकाला पाठवण्यात आले होते. या तपासादरम्यानच एका अयशस्वी दरोड्याची माहिती पोलिसांना मिळाली. जोशी आणि अभ्यंकर या दरोड्यांच्या मधल्या काळात पुण्यातील बाफना कुटुंबावर असाच परंतु अयशस्वी दरोडा पडला होता. लक्षात घ्या, हा गुन्हा पण रात्रीच्या पहिल्या ३-४ तासातच घडला होता. बाफनांचे कुटुंबीय आणि घरातील नोकर यांनी मिळून दरोडेखोरांना परतावून लावले होते. या माहितीतून पोलिसांच्या लक्षात असे आले की रात्रीच्या पहिल्या प्रहरात दारावरची बेल वाजली तर दार उघडणारा बेसावध असतो या गोष्टीचा हे दरोडेखोर वापर करत होते. तरीही तपास कामात गुन्हेगार कोण याचा मागमूस लागत नव्हता.

तपास

तत्कालीन सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर आणि पोलिस इन्स्पेक्टर माणिकराव दमामे यांचे शोधकार्य अविरत चालू असतानाच मार्च १९७७ रोजी बंडगार्डन येथे नदीच्या पत्रात एक प्रेत तरंगताना आढळले. एका अज्ञात तरुणाला लोखंडी शिडीवर बांधून पाण्यात फेकले गेले होते. या तपासाची माहिती घेताना दमामे यांच्या लक्षात आले की ज्या दोरीने या तरुणाचे प्रेत शिडीवर बांधण्यात आले होते त्या दोरीच्या गाठी आणि जोशी-अभ्यंकर यांच्या खुनात बांधलेल्या गाठी एकसारख्या आहेत. तपासाची पहिली निरगाठ इथे सुटली. एक तर्क निश्चित झाला की जोशी-अभ्यंकर आणि बंडगार्डनवर सापडलेलं प्रेत या मागे एकच गुन्हेगार आहे. पण हा गुन्हेगार कोण याचं उत्तर अजूनही हुल्याळकरांना मिळाले नव्हते. थोड्याच दिवसात हे प्रेत अनिल गोखले नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आहे अशी ओळख पटली. ओळख पटूनही मूळ प्रश्न कायमच होता. की खुनी कोण ?

सतत घडणाऱ्या या खूनसत्रामुळे पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. मधुसूदन हुल्याळकरांनी तपासकामाची दिशा बदलून पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे आणि वर्तमानपत्राची कात्रणे वाचायचा सपाटा लावला. अशाच एका कात्रणात खुनी कोण या प्रश्नाचे पहिले उत्तर त्यांना दिसायला लागले. हे कात्रण एका छोट्या स्थानिक वर्तमानपत्राचे होते. जेव्हा एकाही मोठ्या वर्तमानपत्रात घटनास्थळावरचे मृत व्यक्तीचे फोटो उपलब्ध नव्हते, तेव्हा या छोट्या वृत्तपत्रात मात्र लगेच दुसऱ्या दिवशी प्रेताचे फोटो छापले गेले होते. हे कसे शक्य आहे? याचा विचार करताना त्यांनी फोटो खालची क्रेडीट लाईन वाचली. या फोटोचे क्रेडीट राजेंद्र जक्कल नावाच्या व्यक्तीचे होते. त्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर त्याने चोळखण आळीतील एका फोटो स्टुडीओच्या मुलाने हे फोटो दिले असे सांगितले.

गुन्हेगार सापडले

गुन्ह्याच्या तपासकामात एक उपयुक्त तर्क सापडला की तो तर्क दुसऱ्या उपयुक्त तर्काकडे आपोआप घेऊन जातो. या तत्वाची प्रचिती मधुसूदन हुल्याळकर यांना लगेच आली. अनिल गोखलेच्या केसचे पुढे काय झाले याची चौकशी ४-५ तरुण वारंवार करत आहेत. अशी माहिती त्यांना संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळाली. या तरुणांपैकी एकाचे नाव होते राजेंद्र जक्कल !!

पोलिसांची तपासाची पद्धत थोडी वेगळीच असते. राजेंद्र जक्कल हे नाव सलग दुसऱ्यांदा आल्यावर संशयित राजेंद्र जक्कलला चौकशीला बोलावणे फार सोप्पे होते. पण यामुळे संशयित तपास कामाच्या प्रारंभिक भागातच सावध झाला असता. यासाठी त्या ४ तरुणांपैकी जो मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटत होता अशा सतीश गोरेला पहिल्यांदा माणिकराव दमामे यांनी ताब्यात घेतले. अपेक्षेप्रमाणे तपासाच्या पहिल्या काही तासाच्या भडिमारातच गोरे पोपटासारखा बोलायला लागला. यानंतर जे सत्य पोलिसांच्या पुढे आले त्याने पुण्याचे पोलिसखाते हादरून गेले. गोरेच्या जबानीनुसार हा खून राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. पोलिसांना अपेक्षित असा ब्रेकथ्रू मिळाला.

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातल्या ५ तरुणांना म्हणजे राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह, सुहास चांडक यांना अटक करण्यात आली. नायलॉनच्या दोरीच्या गाठींनी हे सर्व तरुण अनिल गोखलेच्या खुनाशी जोडले गेले होतेच. पुढचे आव्हान त्याहून कठीण होते की या टोळीचा जोशी अभ्यंकर यांच्या खुनाशी संबंध आहे हे सिद्ध करणे. पोलिसांकडे जे पुरावे होते ते परिस्थितीजन्य होते. या पुराव्यांच्या जोरावर या टोळीवर गुन्हा सिद्ध करणे केवळ अशक्य होते. याचा अर्थ असा नव्हे की परिस्थितीजन्य पुरावा दुबळा होता. पण साक्षीदारांची कमतरता या केसला कमजोर करत होती.

काही दिवस पोलिसी तपासाच्या तव्यावर भाजून निघाल्यानंतर पाचपैकी एक सुहास चांडक लाही सारखा फुटायला लागला. माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांनी सुहास चांडकला अभय देण्याचे कबूल केल्यावर जोशी-अभ्यंकर-गोखले या सर्व खुनासहित “विश्व”च्या मालकाच्या मुलाचा खूनही यांनीच केल्याचं चांडकने कबूल केले. फरक इतकाच होता की बाकी सर्वांचे मृतदेह सापडले होते. हेगडेचा मृतदेह मात्र तोपर्यंत सापडला नव्हता. चांडकने दिलेल्या माहितीवरून सारसबागेतल्या एका तळ्यात ड्रममध्ये बंद असलेले हेगडेचे प्रेत पण बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनाक्रम निश्चित करून इतर साक्षीदार गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. एकूण १२६ साक्षीदार उभे केल्यानंतर पोलिसांना आणखी एका अयशस्वी दरोड्याची माहिती मिळाली. कोल्हापूरमधील एक श्रीमंत व्यापारी श्री काशीद यांच्या पेढीवर हे सर्वजण भेट देऊन आले होते. काशीद यांनी सर्व गुन्हेगारांना ओळखले. हा चेहरेपट्टी सिद्ध करणारा मोठा पुरावादेखील पोलिसांच्या हातात होता.

काहीवेळा गुन्हेगाराची हुशारी त्याच्या अंगलट कशी येते याचे उदाहरण म्हणजे या गुन्ह्यात वापरण्यात आलेली नायलॉनची दोरी, त्याची विशिष्ट गाठ, सुगंधी द्रव्याचा वापर, मृतांच्या तोंडात कोंबलेले जुन्या शर्टाचे बोळे. हे सर्व पुरावे गुन्हेगाराच्याच विरुद्ध उभे राहिले.

पुणे शहर वास्तव्यासाठी सुरक्षित आहे या समजाला तडा देणारे हे हत्याकांड इतके भयानक पद्धतीने घडले होते की यानंतर शहराच्या सुरक्षेला जो तडा गेला तो आजतागायतही भरून आला नाही.

हे सर्व गुन्हेगार अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या महाविद्यालयात प्रवेश मिळवून यशस्वी होण्याइतकी कलाही देवदयेने त्यांच्या अंगात होती. अचानक या सैतानी मार्गाला हे तरुण कसे गेले हे समजून घ्यायचे असेल तर या टोळीचा मुख्य राजेंद्र जक्कल याच्या ओळखीपासून आपण सुरुवात करूया.

राजेंद्र जक्कल हा दिसायला उंच, तगडा गडी होता. अभिनव कला महाविद्यालयात जेव्हा तो शिकायला आला तेव्हा त्याच्याकडे ११ वीच्या ४ मार्कलिस्ट होत्या. यावरून त्याची शैक्षणिक प्रगती आपण समजू शकतो. तो साधारणपणे चांगल्या कुटुंबातून आलेला होता. त्याचे वडील फोटोग्राफर होते. पुण्यातल्या सिटी पोस्टाच्या शेजारी एका तीन माजली इमारतीमध्ये त्याच्या वडिलांचा स्वस्तिक नावाचा फोटो स्टुडीओ होता. अभिनव कला महाविद्यालयाची सगळी फोटोग्राफी जक्कलचे वडीलच करायचे. तोही कधीकधी वडिलांना कामात मदत करायचा. त्याचं चित्रकला चांगली होती.

(राजेंद्र जक्कलच्या वडिलांचा स्वस्तिक फोटो स्टुडीओ)

दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह हे तिघेही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले होते. सुहास चांडक हा त्यातल्या त्यात साधन सुस्थितीत असलेल्या कुटुंबातून आला होता. जक्कलच्या बिनधास्त, बेछूट, वागण्याचा त्यांच्यावरती इतका प्रभाव होता की खुनासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या हातून घडले. जक्कल मात्र त्याच्या कॉलेजमध्ये गुंड म्हणून प्रसिद्ध होता. अरेरावी करणे, विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षकांना चाकूचा धाक दाखवणे, अशा अनेक रीतीने कॉलेजमध्ये दरारा निर्माण करणे हा त्याचा उद्देश होता. एका विशिष्ट वयात बंडखोरी करणे हा व्यक्तिमत्वाचा स्वाभाविक भाग असतो. बंडखोरीच्या व्यतिरिक्त दारू आणि इतर व्यसनांना सतत कमी पडणारा पैसा यासाठी दरोड्याचा मार्ग या सर्वांनी स्वीकारला.

आपल्या आयुष्यात आपल्याला कायम डावलले गेले आहे ही भावना जक्कलने त्यांच्या मनात पेरले. कदाचित यापैकी एकजण जरी वेळीच सावध झाला असता तर पुढचे अक्षम्य गुन्हे घडलेच नसते. राजेंद्र जक्कलच्या या व्यक्तिमत्वाचा उलगडा त्याचा जवळचा मित्र शाम भूतकर यांनी “चिन्ह” मासिकाच्या एका अंकात सविस्तर केला आहे. संदर्भासाठी हा पूर्ण लेख आम्ही सोबत देत आहोत. या संदर्भासाठी चिन्हचे संपादक सतीश नाईक यांचे विशेष आभार.

जक्कलचं व्यक्तिचित्रण या लेखाच्या अंतिम टप्प्यात आपण करणारच आहोत, पण त्याआधी हा खटला कसा चालला ते आपण बघूया. परिस्थितीजन्य पुरावा आणि काही साक्षीदार यांच्या जोरावर हा खटला चालवणे शक्य नसल्याने सुहास चांडकला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले. कोर्टात सुहास चांडकची साक्ष ऐकण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. याआधी बोभाटाच्या सीमा गावित प्रकरणात माफीचा साक्षीदार उभा करणे किती अपरिहार्य आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. त्यामुळे सुहास चांडक १० पैकी ७ खुनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असून उजळ माथ्याने बाहेर पडला. सुरुवातीला सेशन्स कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट या दोन्हीमध्ये खटला चालल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्याकडे केलेली अपिले देखील फेटाळण्यात आली. त्यानंतर २७ नोव्हेंबर १९८३ साली सर्व आरोपींना फासावर लटकाविण्यात आले.

८० च्या दशकात पुण्याचा सामाजिक चेहरामोहरा बदलणारे हे प्रकरण म्हणजे पुणेकरांच्या मनातील भळभळती जखम. यानंतर जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला “माफीचा साक्षीदार” हा मराठी चित्रपट आणि २००३ साली अनुराग कश्यपचा “पांच” हा चित्रपट आला. या चित्रपटांमध्ये राजेंद्र जक्कलचे जे व्यक्तिचित्र उलगडू शकले नाही ते शाम भूतकरांच्या लेखात तुम्हाला नक्कीच वाचायला मिळेल. या लेखाच्या आधारे काही महत्वाच्या घटना आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.

असं म्हणतात की गुन्हेगारीचे मूळ माणसाच्या पूर्वायुष्यातील घटनांमध्ये दडलेले असते. राजेंद्र जक्कलच्या घरची परिस्थिती त्याच्या बंडखोर स्वभावाला कारणीभूत होती.

त्याच्या जन्मानंतर त्याच्या आईला काही दुर्धर रोग जडला होता. ज्यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला. हा मुलगाच माझ्या दुर्भाग्याचे कारण आहे. असे समजून तिने जक्कलला मुलासारखी वागणूक कधीच दिली नाही. जक्कलच्या वडिलांच्या विचित्र वागणुकीने त्याच्या मनावर परिणाम झाला होता. या मानसिक अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून त्याने कॉलेजमध्ये नेहमीच बंडखोरी केली. या सर्वांनी केलेले गुन्हे अक्षम्य आहेत. म्हणून न्यायाधीशांनीही ही केस rarest of the rarest म्हटले होते. पण त्याचवेळी चांडकला माफीचा साक्षीदार करण्यात जो संदेश समाजात पसरला तोही एका अर्थाने चुकीचाच म्हणावा लागेल. या खटल्यातून सुटका झाल्यावर चांडकचे स्वागत त्याच्या परिवाराने एखाद्या उत्सवासारखे केले. ही घटना निश्चितच इथे नमूद करायला हवी.

आज ही घटना घडून जवळजवळ ३५ वर्ष होत आली. पण त्या तरुण मुलांनी नक्की कोणत्या उद्देशाने हे गुन्हे केले याचे मानसशास्त्रीय उत्तर आजतागायत कोणालाही सापडलेले नाही.