computer

अवघ्या २ महिन्यात ८२ वर्षांपासून रखडलेल्या नदीचं पुनर्जीवन झालं...कौतुक तर कराल?

लखनदेई नदी नेपाळच्या सर्लाही जिल्ह्यातून भारतात येते. लखनदेई म्हणजे लक्ष्मण रेषा. भारतात या नदीला ‘जलजीवन’ आणि हरयाली’ नावाने ओळखलं जातं. सीतामढी भागात ही नदी नागमोडी होत संपूर्ण सीतामढीला पाणी पुरवण्याचं काम करते. पुढे ती बागमती नदीला जाऊन मिळते. या नदीच्याच पाण्यावर आजवर तिथलं मानवी जीवन पोसलं गेलं आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात निसर्गाच्या या चक्रात अडथळे आले आहेत.

अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे लखनदेई नदी जवळजवळ आटली आहे. एवढी की नदी नेमकी कुठे आहे हे सांगणही कठीण जाऊ लागलं. याचे गंभीर परिणाम काही दशकांपासून  दिसत होते. नदीवर अवलंबून असलेल्या लोकांना प्रदूषित पाणी मिळत होतं. सिंचन नसल्यामुळे शेतीवर संकट आलं होतं. नदी असूनही या भागातली पाण्याची भूगर्भ पातळी २२५ फुट खोल गेली आहे.

नदी जवळजवळ नष्ट झाली असताना बिहारच्या आयएएस अभिलाषा कुमारी शर्मा यांच्या पुढाकारामुळे लखनदेई नदीला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे. लखनदेई नदीला पुनरुज्जीवन देण्याची गोष्ट आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

लखनदेई नदीची ही समस्या गेल्या ८२ वार्षापासूनची आहे. नदीला वाचवण्यासाठी नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांकडून प्रयत्न होणं गरजेचं होतं, पण दोन्ही देश कधीच एकत्र आले नाहीत. भारताकडूनही स्वतः पुढाकार घेऊन काम करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. शेवटी ७ ते ८ वर्षांपूर्वी या समस्येवर बिहारकडून गंभीरपणे काम सुरु झालं. या कामाला गती मिळाली ती जिल्हा दंडाधिकारी अभिलाषा कुमारी शर्मा यांच्या नियुक्तीनंतर.

ऑगस्ट २०१९ साली अभिलाषा कुमारी शर्मा यांची नियुक्ती झाली. एकेकाळच्या जीवनवाहिनी नदीची दयनीय परिस्थिती बघून त्यांनी लवकरात लवकर कामाला सुरुवात केली.

सुरुवातीला स्थानिक शेतकऱ्यांना आणि खासकरून ज्यांची शेती नदीच्या तीरावर आहे अशा शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलं. यासाठी अभिलाषा कुमारी या स्वतःहून शेतकऱ्यांना भेटल्या. त्यांनी नदीच्या पुनरुज्जीवनाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.

नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जवळजवळ २३ एकर जागा हवी होती. या जागेत शेतकऱ्यांच्या लहानसहान शेतजमिनी होत्या. अभिलाषा कुमारी यांनी प्रत्येक शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला दिला. आपली शेतजमीन जाणार ही भीती शेतकऱ्यांच्या मनातून नाहीशी झाली. चांगली  गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना नदीच्या पुनरुज्जीवनाचं महत्त्वं समजलं.

कामाचं स्वरूप काय होतं ?

योजनेनुसार लखनदेई नदीला दुलार्पूर घाट ते भार्संड पर्यंत जोडण्यात येणार होतं. पुढे तिला नेपाळच्या भागात जोडायचं होतं. सध्या हे काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आश्चर्य वाटेल पण कामाला सुरुवात होऊन अवघे २ महिने झालेत.

अभिलाषा कुमारी यांच्या धडाडीच्या कामाला जलसंपदा विभागाने साथ दिली. लवकरात लवकर आवश्यक निधी जारी करण्यात आला. त्यामुळे काम वेळेत सुरु झालं. या कामात मोठा हाथभार हा तिथल्या शेतकऱ्यांचा होता. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे तिथे एक म्हण तयार झाली आहे - “वह हमारे नायक है, हम उनके सहाय्यक है”.

मंडळी, लखनदेई ही बिहार आणि उत्तर प्रदेश भागात या शतकात पुनरुज्जीवित झालेली पहिली नदी ठरली आहे. या प्रकल्पामुळे अशाच आणखी प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल. यासाठी अभिलाषा कुमारी शर्मा, स्थानिक शेतकरी आणि सरकारी यंत्रणेचं कौतुक.

सबस्क्राईब करा

* indicates required