computer

मांजरीचा खून करणाऱ्या कुत्र्याने अमेरिकेतल्या तुरुंगात नवीन पद्धत कशी जन्माला घातली ?

या कुत्र्याचं नाव आहे ‘पेप दि ब्लॅक’. त्याला एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं होतं.  त्याने एका मांजरीचा खून केला होता. हा पोरकटपणा वाटत असला तरी या कथेला एक वेगळी बाजू पण आहे.

कथेला सुरुवात  होते १९२० साली. फिलाडेल्फियाच्या ‘इस्टर्न स्टेट पॅनटेन्शरी’ या तुरुंगाभोवती ही कथा फिरते. कैद्यांच्या सुधारणेसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या सुरुवातीच्या मोजक्या तुरुंगापैकी हा एक तुरुंग होता. त्याकाळी जुन्या परंपरेप्रमाणे  कैद्यांना शिक्षा म्हणून सक्तीच्या मजुरीच्या कामाला जुंपलं जायचं.

पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर गिफर्ड पिंचॉट यांना या पद्धतीत सुधारणा आणायची होती. त्यांना विश्वास होता की कैद्यांना सुधारता येऊ शकतं आणि त्यांना पुन्हा एकदा मुख्यप्रवाहात आणता येऊ शकतं.

(पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर गिफर्ड पिंचॉट)

या गिफर्ड पिंचॉट साहेबांकडे एक कुत्रा होता. त्याचं नाव पेप. हाच आपल्या कथेचा हिरो. गिफर्ड पिंचॉट यांच्या एका नातेवाईकाने तो त्यांना भेट म्हणून दिला होता. नव्या  घरात आल्यानंतर काही दिवसातच पेप आणि घरातल्या लोकांची गट्टी जमली.

१९२४ च्या दरम्यान पेपला एक वाईट सवय लागली. तो सोफ्याच्या गाद्या कुरतडत बसायचा. त्याच्या कृत्याची शिक्षा ही त्याला मिळालीच पाहिजे या मताचे गिफर्ड पिंचॉट होते. त्यांनी त्याला शिक्षा म्हणून ‘इस्टर्न स्टेट पॅनटेन्शरी’पाठवण्याचा निर्णय घेतला. पण या मागचं कारण त्याला खरोखरची शिक्षा देणं हे नव्हतं तर ते पेपचा वापर कैद्यांवर उपचार म्हणून करणार होते. पिंचॉट हे मेन राज्याच्या दौऱ्यावर असताना एका ठिकाणी त्यांनी कुत्र्यांचा वापर कैद्यांच्या सुधारणेसाठी करताना पाहिलं होतं. या पद्धतीचा अवलंब त्यांनी ‘इस्टर्न स्टेट पॅनटेन्शरी’मध्ये केला होता.

या प्रकरणाने मात्र भलतंच वळण घेतलं. एका स्थानिक वृत्तपत्राने एक काल्पनिक कथा रचली आणि  गिफर्ड पिंचॉट यांना व्हिलन करून टाकलं. वृत्तपत्रातील कथेप्रमाणे एका मांजरीला मारल्याची शिक्षा म्हणून पेपला तुरुंगात डांबण्यात आलं होतं. या कथेवर विश्वास ठेवण्यात आला. त्याला कारणही तसंच ठोस होतं.

पेपला जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा त्याचे कैद्यांसारखे मगशॉट घेण्यात आले होते. त्याच्या गळ्यात कैद्यांना दिला जाणारा बिल्ला पण दिसत होता.

(पेप दि ब्लॅक)

गिफर्ड पिंचॉट यांच्या एकूण चरित्रालाच या घटनेने कायमचा  डाग लागला. पण त्यांचं उद्देश्य साध्या झालं. कैद्यांमध्ये तो लवकरच प्रसिद्ध झाला. पेप आणि कैद्यांमध्ये एवढी चांगली मैत्री झाली की जेव्हा १९२९ साली नवीन तुरुंग बांधण्यात आला तेव्हा कामगारांसोबत पेप पण फेऱ्या मारायचा.

काही  वर्षांनी पेपला नैसर्गिक मृत्यू आला आणि त्याचं दफन तुरुंगाच्याच आवारात करण्यात आलं. १९७१ साली ‘इस्टर्न स्टेट पॅनटेन्शरी बंद पाडण्यात आलं. सध्या ही जागा पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.  पेपची कथा ही अनेक पर्यटकांना ‘इस्टर्न स्टेट पॅनटेन्शरी’पर्यंत खेचून आणते.

तुरुंगातील सुधारणा.

गिफर्ड पिंचॉट यांनी पेपच्या मार्फत राबवलेली कल्पना पुढे अमेरिकेतल्या सर्व तुरुंगात राबवण्यात येऊ लागली. आजच्या काळात अमेरिकेतल्या बहुसंख्य तुरुंगांमध्ये ‘प्रिझन अॅनिमल प्रोग्रॅम’ राबवला जातो.प्राण्यांच्या माध्यमातून कैद्यांना एक नवा मित्र मिळतो तसेच त्यांच्यात करुणा उत्पन्न होते. ‘प्रिझन अॅनिमल प्रोग्रॅम’च्या फायद्याबद्दल अनेक अभ्यासकांनी चांगलं मत दिलं आहे.

पेप येण्यापूर्वी तुरुंगात अशी कल्पना राबवली जात नव्हती का? होती, पण त्याला प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम पेपने केलं. हे या घटनेचं वेगळेपण आहे.

तर मंडळी, शेवटी काय तर गिफर्ड पिंचॉट यांनी पेपला तुरुंगात सोडून एका दगडात  दोन पक्षी मारले होते. पहिला फायदा म्हणजे कैद्यांचा उपचारासाठी पेपचा वापर झाला, आणि दुसरा म्हणजे गाद्या कुरतडणारा कुत्रा घराबाहेर गेला.

सबस्क्राईब करा

* indicates required