computer

स्वतःच्या जीवाचे बलिदान देऊन शेकडो गावातील हजारो लोकांचे प्राण वाचवणारे गाव !!

शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? पण ते खरं आहे. रोगाचा संसर्ग पसरू नये म्हणून एक दोघांनी नव्हे तर संपूर्ण गावाने आपले जीवन समर्पित करण्याची ही आगळीवेगळी घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. या जगात अशी काही माणसे अस्तित्वात असतात म्हणून जगातील चांगल्या वाईट गोष्टींमध्ये समतोल साधला जातो. चला तर मग जाणून घेऊया की कश्या प्रकारे एका छोट्याश्या गावाने आपले बलिदान देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवले.

ही घटना आहे इसवीसन १६६५ मधली, इंग्लंडच्या डर्बीशायर विभागातील एयम या गावातली. त्या भागातील इतर छोट्या छोट्या गावांप्रमाणे हे सुद्धा आपल्याच धुंदीत शांत निवांत आयुष्य जगत होतं. गावातील विविध व्यवसाय करणारे लोक एकमेकांच्या साहाय्याने रोजचे व्यवहार पार पाडत असत. एकंदरीत सगळं सुरळीत सुरू होतं. पण मंडळी, त्याच वेळी इंग्लंड मध्ये मोठ्याप्रमाणात प्लेगची साथ पसरली होती. इंग्लंडची जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या संसर्गजन्य प्लेगच्या तडाख्यात सापडली होती. आपले हे एयम गाव तसे मुख्य शहरांपासून बरेच लांब असल्याने अद्याप प्लेग तिथे पोहोचला नव्हता. डर्बीशायर विभागाला आतापर्यंत तरी प्लेगचा सामना करावा लागला नव्हता. 

मग उजाडला तो दिवस… गावातल्या जॉर्ज व्हीकर्स या शिंप्याने आपल्या व्यवसायासाठी इंग्लंडमधून एक कापड मागवले होते आणि ते कापड त्याला मिळाल्यावर असे लक्षात आले की ते फारच ओलसर, दमट आहे. अश्या वेळी साधारण शिंपी जे करेल तेच त्याने केले. त्याने कापड वाळावे म्हणून थोडी शेकोटी करून त्याच्या बाजूला ते टांगून ठेवले. पण मंडळी, त्याला कल्पना नव्हती की ते फक्त कापड नसून कापडाच्या रुपात गावात मृत्यूने प्रवेश केला आहे! होय, त्या कापडावर होत्या उंदरांच्या अंगावरून आलेल्या प्लेग पसरवणाऱ्या महाभयंकर संसर्गजन्य पिसवा! प्लेगपासून आतापर्यंत दूर असणारे शांत निवांत एयम गाव आता प्लेगच्या तावडीत सापडले होते.

एक आठवड्यातच जॉर्जच्या मृत्यू झाला. प्लेगने आपले काम चोखपणे सुरू केले होते. त्यानंतर काही दिवसातच आणखी पाच जण मृत्युमुखी पडले आणि त्यापुढच्या काही दिवसात आणखी तेवीस जणांना प्लेगचा संसर्ग झाला. अर्थातच, आता सर्वांना कळून चुकले होते… गावात प्लेगचा शिरकाव झालाय! अश्या वेळी इतर लोक जे करतात तेच करण्याचा निर्णय गावकरी घेऊ लागले. तो निर्णय म्हणजे, गाव सोडणे आणि इतरत्र जाऊन राहणे. पण मंडळी, गावातल्या चर्चचे प्रमुख विल्यम मोंन्टेसन यांच्या डोक्यात मात्र निराळेच विचार सुरू होते. जर गावकरी गाव सोडून इतर गावात जातील तर सोबत प्लेग घेऊन जाणार हे निश्चित होते. म्हणजेच त्या विभागातील इतर गावे जी अद्यापपर्यंत प्लेगमुक्त होती, ती गावे सुद्धा प्लेगच्या तावडीत सापडणार. त्यामुळे विल्यम यांनी एक कठोर निर्णय घेतला. अख्खे गावच इतर जगापासून तोडण्याचा! संपूर्ण गाव इतर जगापासून वेगळे ठेवले, क्वारंटाईन केले, तर प्लेग गावातच राहील आणि इतरत्र तो पसरणार नाही. मात्र ही कल्पना जेवढी इतरांसाठी चांगली होती तेवढीच गावासाठी धोकादायक होती. कारण गावात राहून मृत्यूला सामोरे जाणे हा एकमेव पर्याय गावकऱ्यांपुढे असणार होता. 

त्यांनी सर्व गावाला एकत्रित करून ही कल्पना त्यांच्यासमोर मांडली. गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी त्यांचा सहकारी थॉमस स्टॅनली याचीही मदत घेतली. दोघांच्या अथक प्रयत्नाला यश आले आणि गाव सोडून कुणीही बाहेर जाणार नाही असे एकमताने ठरवले गेले. मंडळी, केवढे हे धाडस! विचार करा… समोर मृत्यू दिसत असूनही पळून न जाता स्वतःच्या मर्जीने त्याला कवटाळणे हा वेडेपणा नव्हे काय? पण अशी वेडी माणसे या जगात असतात म्हणून तर हजारो जीव सुरक्षित होतात मंडळी. धन्य तो त्याग! धन्य ते समर्पण!!

जेव्हा ही गोष्ट आजूबाजूच्या गावात समजली तेव्हा तेथील लोक स्वयंस्फूर्तीने एयम गावच्या वेशीवर अन्नधान्य, पैसे आणून ठेऊ लागले. एयम गावातील कुणीही भुकेने मरणार नाही याची काळजी आसपासच्या गावातील लोकांनी आवर्जून घेतली. पण प्लेग आपला रंग दाखवणे थांबवतो थोडाच? एयम गावची लोकसंख्या होती तीनशे पन्नास आणि सन १६६६ मधील नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्लेगने मरणारी संख्या होती २६०! या मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विल्यम मोंन्टेसनची पत्नी कॅरोलिनचा सुद्धा समावेश होता. 

मंडळी, स्वतःच्या जीवाचे बलिदान देऊन विभागातील शेकडो गावातील हजारो लोकांचे प्राण वाचवणारे हे एयम गाव इतिहासातील एक सुवर्ण पान समजावे लागेल. आजही येथील घरांवर एकाच कुटुंबातील किती सदस्यांचा मृत्यू झाला याच्या नावासह पाट्या लावलेल्या दिसतील. या निस्सीम समर्पणाला बोभाटाचा सलाम!

सबस्क्राईब करा

* indicates required