computer

या बाईने लैंगिक स्वैराचार केला, पण त्यामुळे विवाहित स्त्रियांवरचे स्वैराचाराचे खटले का थांबले?

आपला इतिहास नेहेमीच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो किंवा प्रेरणादायक इतिहासच आपल्या नजरेस आणून दिला जातो. इतिहासाची काही पानं अशी पण असतात जी काही वेळा आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावतात आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायला लावतात की आमचे पूर्वज असेही वागत होते ????? 

आज ज्या स्त्रीची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती रणरागिणी नाही, कुटुंबासाठी त्याग करणारी त्यागमूर्ती नाही,  कोणत्याही पवित्र किंवा आदरार्थी संबोधनाने उल्लेख करावा अशी तर नक्कीच नाही. ग्राम्यभाषेत 'वेश्या' किंवा त्यासारख्या अभद्र शब्दाने इतिहासात नोंद व्हावी अशा एका स्त्रीची ही कथा आहे. पण सबूर ...या तिच्या आयुष्याला आपली पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे हे लक्षात आल्यावर कदाचित तिला काय म्हणावं हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील.

चला तर वाचू या ‘कुरीयेधाथू थात्री’ या स्त्रीची कहाणी. हे नाव वाचायला कठीण आहे म्हणून आपण तिचे नाव सावित्री किंवा धात्री आहे असे समजू या. ही दोन्ही तिच्या नावाची भाषांतरे आहेत.

ही कथा घडली १९०५ साली म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला! केरळच्या जातीप्रधान संस्कृतीला, उच्च आणि नीच, स्त्री आणि पुरुष या सगळ्या समाजांना एका रात्रीत धुळीला मिळवणारी ही घटना म्हणजे सावित्रीचा स्मार्थविचारम हा खटला! या खटल्याची पूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी त्यावेळी केरळमधली (कोचीन मधील) समाजरचना काय होती ते समजून घेऊ!! 

त्या काळात केरळमध्ये नंबूद्री ब्राह्मणांची सत्ता होती. हे ब्राम्हण स्वतःला परशुरामाचे वंशज म्हणवून घ्यायचे. तत्कालीन समाजात ब्राह्मणांच्या इतर अनेक शाखा होत्या. उदाहरणार्थ तमिळ पत्तर ब्राह्मण, एंब्रातीरी थूळू ब्राह्मण वगैरे.  पण नंबूद्री म्हणजे जगात भारी समजले जायचे. त्यावेळच्या समाजव्यवस्थेने त्यांना अत्युच्च स्थान दिल्याने त्यांच्या वाट्याला प्रचंड श्रीमंती आली होती. त्यांना कोणतेही काम करयची आवश्यकता नसायची, कारण ते सर्वोच्च होते. पण या सर्वोच्च समाजातले नियम मात्र माणूसकीला लाज आणणारे होते.

(नंबूद्री ब्राह्मण)

बुद्री कुटुंबात मोठा मुलगा त्याच जातीतल्या मुलीशी लग्न करायचा. बाकीच्या भावांना लग्न करण्याची परवानगीच नव्हती. त्यांनी इतर जातीच्या स्त्रियांसोबत "संबंधम" ठेवायचे, पण लग्न करायचे नाही. मोठ्या भावाने पहिला विवाह केल्यावर त्याला आणखी अनेकदा अनेक स्त्रियांशी लग्न करायला हरकत नव्हती. 

नंबूद्री मुलींच्या वाट्याला जे आयुष्य यायचे ते तर नरकासमान होते. नंबुद्री मुलगी वयात आली की ती "अंथेर्जनम" म्हणजे फक्त घराच्या चौकटीपुरते मर्यादीत व्हायची. घराबाहेर पडणे नाही, पुरुष नातेवाईकांशी बोलणे नाही, बोलणे राहू द्या, त्यांच्या नजरेसही पडायचे नाही. घर म्हणजे बंद घरात आयुष्य जायचे. विवाह फक्त नंबुद्री मुलाशी.  पण मुळातच फक्त ज्येष्ठ मुलांची लग्ने होत असल्याने अविवाहित मुलींचं प्रमाणही तितकंच जास्त होतं.  

विवाहित मुलींचे आयुष्य काही वेगळे नसायचे. त्यांनाही घराबाहेर पडण्याची सोय नव्हती. दागिने घालण्याची परवानगी नव्हती. एक पांढरेशुभ्र साडीसारखे वस्त्र नेसण्याची मुभा होती. कपाळावर कूंकू नाही. अंगावर दागीना नाही. घराबाहेर पडायचे झाले तर अंगावर ब्लँकेटसारखे एक वस्त्र गुंडाळून, डोक्यावर एक छत्री धरून प्रौढ वयाच्या दासीच्या निगराणीखाली बाहेर पडायचे. घरात त्यांचे देवघरही वेगळे असायचे. त्यांनी ऐकू जातील अशा आवाजात प्रार्थना करणे पण मना होते. घरात जेवणासाठी पतीची उष्टी पत्रावळच तिने वापरायची. एक ना दोन अशा अनेक रुढींनी स्त्रियांना जखडून टाकले होते. 

मुलीच्या जन्माला आले की एकच गोष्ट मनावर बिंबवली जायची की तिचे या जगात दुय्यम स्थान आहे आणि मरेपर्यंत ते तसे राहील. नंबूद्रींना अनेक बायका असल्याने नवर्‍यासोबत शरीरसंबंध येण्यासाठी त्यांना वाट बघावी लागायची. समजा तसे झाले आणि दिवस गेले तर "पूंसवन" या संस्काराला सामोरे जावे लागायचे. हा संस्कार "मुलगाच" जन्माला यावा यासाठीच केला जायचा. घरात मान नाही, समाजात स्थान नाही, शरीराची भूक भागेल याची खात्री नाही अशा अवस्थेत संपूर्ण आयुष्य निघून जायचे. समजा जर शरीराची भूक अनावर झाली आणि एखाद्या बाईचा पाय घसरला तर? असं काही झालं तर त्या स्त्रिला व्यभिचाराच्या ‘स्मार्थविचारम’ला सामोरे जावे लागायचे.

हा स्मार्थविचारम खटला जातीतल्या विद्वान पंचांसमोर चालवला जायचा. त्यासाठी कोचीनच्या महाराजांची परवानगी घ्यावी लागायची. ज्या बाईवर हा दावा ठोकला जायचा तिच्या पित्याने खटल्याचा खर्च करावा असा नियम होता. 'जारण' म्हणजे त्या महिलेशी शरीरसंबंध ठेवण्याचा आरोप असलेल्या पुरुषाला बोलावले जायचे. वैयक्तिक किंवा लोकांच्या मताला या खटल्यात काहीही स्थान नव्हते. 

खटल्याच्या सुरुवातीला दासीविचारम म्हणजे घरात असलेल्या दासीची साक्ष काढली जायची. जर त्या साक्षीत काही तथ्य असेल तर आरोपी स्त्रीला अचंपूअरीकायल म्हणजे एकांतवासात रवाना केले जायचे  स्वरुपमचोल्लल म्हणजे माहिती जमा करून राजाची परवानगी घेतली जायची. त्यानंतर एक न्यायाधीश आणि चार पंच यांच्यासमोर व्यभिचाराचा  पाढा वाचला जायचा. जारण आणि जारिणी यांना समोरासमोर आणून चौकशी केली जायची. एकमेकांच्या अंगावरच्या खुणा पटवल्या जायच्या. जर आरोप सिध्द झाला तर 'देहविच्छेदम' म्हाणजे  दोघांनाही जातीतून बहिष्कृत केले जायचे किंवा जातीबाहेर टाकले जायचे. त्यानंतर स्त्रिच्या घरच्या नातेवाईकांनी ती मेली असे जाहीर करून तिचा श्राध्दविधी करायचा. अर्थात शेवटी गाव जेवणाचा कार्यक्रम असायचाच.

आता वळू या आपल्या कथेच्या नायिकेकडे. सावित्रीचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी रामन नंबुद्री नावाच्या एका साठ वर्षाच्या म्हातार्‍यासोबत झालं होतं. या थेरड्याला वेश्यागमनाचा नादही होता. अशाच एका वेळी तो वेश्या समजून ज्या बाई सोबत झोपला ती त्याचीच बायको आहे असं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने सावित्रीवर खटला भरला. सावित्री इतर नंबुद्री बायकांसारखी बापडी नव्हती. तिने चौकशी दरम्यान ६४ पुरुषांसोबत शय्यासोबत केल्याचं जाहीर केलं. हा आकडा ऐकल्यावर स्मार्थविचारम करणार्‍या पंचांना फेफरं यायचंच बाकी होतं. समाजात एकच चर्चा सुरु झाली. हे प्रकरण निपटण्यासाठी कोचीनच्या राजाने एका नामवंत जातवेदम नंबुद्री न्यायाधीश बनवलं.

सावित्रीने आपल्या जबानीत पुन्हा एकदा ६४ पुरुषांचा नावासकट उल्लेख केला. सोबत एक मागणी पण केली ती अशी की जर मी दोषी असेन तर हे पुरुष पण दोषी आहेत. 
खटल्यातून जी शिक्षा तिला मिळेल तीच शिक्षा त्यांना पण व्हायला हवी. अशी मागणी आजपर्यंत करण्याचे धैर्य कोणत्याही बाईने स्त्रीने केले नव्हते ते सावित्रीने केले. 

कोण होते हे पुरुष? कथाकलीचे कलाकार, गायक वादक, सरकारी अधिकारी, विद्वान पंडीत, नोकरचाकर, आणि असे अनेक !

सावित्रीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. एकेका पुरुषाचे नाव त्याच्या अंगावरील खूणांसकट सांगितले. चाळीस दिवस हा खटला चालत होता. पासष्टाव्या माणसाचं नाव विचारल्यावर तिने फक्त त्याने भेट दिलेली अंगठी दाखवली. ही अंगठी दाखवल्यावर कोचीनच्या महाराजांनी खटला संपल्याचे जाहीर केले. असे म्हणतात की पासष्ठावा अंगठी बहाद्दर म्हणजे कोचीनचे महारजाच होते. या कबूलीजबाबानंतर सावित्रीला जातीबाहेर काढण्यात आलंच पण सोबत इतर ६४ पुरुष पण जातीबाहेर गेले. ३० नंबुद्री ब्राह्मण, १० अय्यर ब्राह्मण, १३ अंबावासी, ११ नायर या उच्च जातीच्या पुरुषांचा समावेश त्यात होता. काही घर सोडून पळून गेले, काही मानहानीने मरण पावले, काही रस्त्यावर आले, काही कायमचे देश सोडून गेले.

शेवटी एकच प्रश्न उरतो तो म्हणजे सावित्रीचे काय झाले ? 

काही दिवस ती नजरकैदेत होती. त्यानंतर ती तमिळनाडूत निघून गेली. एका गोर्‍या साहेबासोबत तिचे लग्न झाले असे म्हटले जाते. 
अशा प्रकारचा हा शेवटचा खटला होता. यानंतर असे व्यभिचाराचे खटले कधीच उभे राहीले नाहीत. कारण कदाचित एकच असावे की पुरुषांच्या हे लक्षात आले होते की बायका पण बोलू शकताता आणि बंड करू शकतात.

सावित्रीने असे का केले असावे ?

पैशासाठी? -तिला आवश्यकता नव्हती. मौज म्हणून ? नाही. सुरुवातीच्या एका प्रकरणानंतर बरेचसे संबंध ब्लॅकमेलींग मुळे आले होते. एका अर्थाने हे लैंगीक स्वातंत्र्याचे बंड होते. जे पुरुष करू शकतात ते बायका पण करू शकतात हे सांगण्याचा तो एक प्रकार होता.

सावित्रीच्या कथेवर आधारित ‘मातमपु कुन्हुकट्टन’ यांनी लिहिलेली ‘Outcaste’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. वासंती शंकरनारायण यांनी ती इंग्रजीत भाषांतरित केली आहे.

वाचकहो, तुम्ही तेव्हा त्या परिस्थीतीत न्यायाधीश असातत तर तुम्ही काय केले असते हे नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required