बोभाटाचा फॉण्ट हा चक्क हस्ताक्षरावरून बनवलाय? कोणाचे अक्षर आहे आणि कुणी बनवला आहे हा?

सध्या तुम्हाला ‘बोभाटा’वर दिसणारी वळणदार अक्षरं ही शरद देशपांडे यांच्या हस्ताक्षराचीच देणगी आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मोठमोठ्या ब्रँडच्या लोगोपासून सोशल मिडीयावर फिरणाऱ्या कविता, संतवचनांपर्यंत अनेक प्रकारची देवनागरी लिखाणं सध्या या फॉन्टमध्ये लिहिलेली दिसतात. या सुंदरशा फॉन्टच्या निर्मितीची कथाही तितकीच रंजक आहे. हा फॉन्ट ज्यांच्या हस्ताक्षरावरून डिझाईन करण्यात आला आहे, ते म्हणजे शरद देशपांडे. १९६२पासून मराठी भाषेतील ग्राहकप्रिय आणि वाचकांच्या संग्रही राहिलेल्या हजारो जाहिराती लिहिणारे मराठी कॉपीरायटर, शरद देशपांडे (‘घराला घरपण देणारी माणसं...’ हे शब्द त्यांचेच). भाषेवर, लिखाणावर भरभरून प्रेम करणाऱ्या शरद देशपांडे यांनी पुण्यातल्या ‘सेतू अडव्हर्टायझिंग’ या जाहिरात कंपनीची स्थापना केली. समस्त सेतू परिवाराचे लाडके ‘काका’ असलेल्या देशपांडे यांनी मराठी कॉपीरायटिंगची कला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली.
अक्षर हा मनाचा आणि विचारांचा आरसा असतो, जितकं नेटकं, सुवाच्च अक्षर तितके स्वच्छ विचार, हे कायमच म्हणलं जातं. काकांच्या सुंदर विचारांना काकांच्याच अक्षराचं कोंदण शोभायचं. त्यांची अगदी रोजची डायरी असो, किंवा एखाद्या क्लायंटसाठी कॉपी लिहायची असोत, ती त्यांच्या हस्ताक्षरातच पानावर उमटायची.
नंतर या सुंदर हस्ताक्षरालाच दृष्ट लागली. २००५ साली पॅरालिसीसच्या सौम्य अॅटॅकचं निमित्त झालं आणि अक्षरावर मनापासून प्रेम करणाऱ्या काकांना लिहिणं कठीण झालं. विचारांचा आणि लिखाणाचा ओघ जुळेनासा झाला. लिहिण्याची जिद्द कायम होती म्हणून त्यांनी कॉम्प्युटरचा वापर सुरू केला. पण, प्रत्यक्ष लिहिण्याचं समाधान मात्र त्यात नसायचं. ‘आपल्याला आपल्या अक्षरामध्ये लिहिता येत’ नाही, ही खंत काकांच्या मनामध्ये होती. त्यांच्या ७५व्या वाढदिवसाला काही तरी वेगळं गिफ्ट द्यायचं या विचारातून त्यांच्या मुलांनी, म्हणजे ऋग्वेद आणि ऋतुपर्ण देशपांडे यांनी २०१५ साली ‘शरद ७५’ हा यांच्या हस्ताक्षरावर आधारित फॉन्ट साकारला.

मुंबईच्या किमया गांधी यांनी या फॉन्टच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. फॉन्ट तयार करायच्या कामामध्ये काकांनी लिहिलेल्या जाहिरातींचा मजकूर, डायरीतल्या लिखाणाची पानं यांची हाय रिझोल्युशन स्कॅन्स घेतली गेली. प्रत्येक अक्षराचा खूप बारकाईने अभ्यास केला गेला. आपण प्रत्यक्ष लिहिताना दरवेळी प्रत्येक अक्षर एकसारखं येईलच असं नसतं. त्यामुळं ‘क’ या अक्षराची निवड करताना वेगवेगळ्या प्रकारे लिहिले गेलेले ‘क’ शोधले आणि त्या सर्वांचं वैशिष्ट्य सामावणारं अक्षर हे फॉन्टच्या पहिल्या व्हर्जनसाठी - ‘शरद ७५’ साठी फायनल केलं गेलं. नंतर हस्ताक्षरामध्ये लिहिण्याच्या अनुभवाच्या अधिकाधिक जवळ जाता यावं म्हणून फॉन्टच्या पुढच्या व्हर्जनमध्ये – ‘शरद ७६’मध्ये प्रत्येक अक्षराची व्हेरीएशन्स देण्यात आली. त्यामुळे एकाच शब्दातील अथवा ओळीतील दोन ‘क’ एकसारखे दिसत नाहीत. हस्ताक्षरासारखंच प्रत्येक अक्षर वेगळं दिसतं. एकाच अक्षराचं व्हेरिएशन देणारा हा एकमेव देवनागरी फॉन्ट असून तो सेतूच्या वेबसाईटवर (http://setuadvertising.com/sharad76/ )नि:शुल्क डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
काकांसाठी म्हणून तयार करण्यात आलेला हा फॉन्ट २०१५ पासूनच सर्वांना वापरण्यासाठी खुला आहे... हल्ली तो वेगवगेळ्या माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर वापरला जातोय... आज काका हयात नाहीत... पण त्यांचं लिखाणावरचं प्रेम ‘शरद ७६’ च्या वळणदार अक्षरांमधून आत्ता अगदी या लेखाच्या माध्यमातूनही ‘टाईप केलेल्या’ लिखाणाला आणखी जिवंत करत आहे.