computer

जगातली सर्वात मोठी डेअरी- आरे डेअरीच्या स्थापनेमागची कथा, कुरघोड्या आणि राजकारण!!

दुसरे महायुद्ध संपले आणि मुंबईचे “टंचाईपर्व” सुरु झाले.  नोकऱ्यांची टंचाई, अन्नधान्याची टंचाई, पाण्याची टंचाई यासोबत एक नवीन टंचाई उत्पन्न झाली ती म्हणजे दुधाची टंचाई. युध्दामुळे लोणी, क्रीम आणि तुपाची मागणी वाढलेली होती. पंजाब आणि उत्तर प्रदेश (त्यावेळी त्याला युनायटेड प्रॉव्हीन्सेस असे म्हटले जायचे ) या दूधदुभत्याच्या राज्यांमधून दुभत्या म्हशी राज्याबाहेर पाठवण्यावर निर्बंध होते. मुंबईत मात्र दुधाचे भाव वाढतच जात होते. चार आण्याला शेर(म्हणजे आताचा अर्धा लीटर) मिळणार्‍या दूधाचा भाव बारा आणे शेर झाला होता. त्या वेळी अनेक नागरिकांनी सरकारला पत्रे  लिहून, पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. परिणामी सरकारने अनुदानित भावाने दूध वाटप करण्याचे ठरवले.

या योजनेनुसार दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना, गर्भवती स्रियांना आणि नवजात शिशुंच्या आयांना सहा आणे शेर दराने दूधाचा कोटा देण्याची सुरुवात झाली. मुंबईत वितरणाची केंद्रे उभी करण्यात आली. आधी  रेशन कार्डावर -नंतर मिल्क कार्डावर म्युनिसीपालिटीच्या अनेक केंद्रातून दुधाचे वितरण सुरु झाले. काही दिवसांतच दरदिवशी ६३००० हजार लिटरपर्यंत हा आकडा पोहचला.  पण दुधाची कमतरता कायमच राहिली. याच दरम्यान सरकारने हॉटेल चालकांना ताजे दूध वापरण्यास मनाई केली. ताज्या दुधाऐवजी दुधाची भुकटी वापरण्याचे आदेश देण्यत आले. ही दुधाची भुकटी सरकार आयात करून त्यावर नफा कमवून हॉटेलला विकत असे. अनुदानित दूध वाटपातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी हा साचलेला नफा 'मिल्क फंड' मध्ये जमा होत असे.

मुंबईत एकीकडे दुधाचे दुर्भिक्ष्य जाणवायला लागले होते, तर दुसरीकडे मुंबईतल्या रस्त्यांवरती मोकाट जनावरांची मोठी समस्या उभी राहिली होती. सर्वसाधारण म्हैस किंवा गाय माजावर येऊन पहिली वीण झाल्यानंतर जवळजवळ नऊ महिने दूध देते. नंतरचा मधला काही काळ कोरडा जातो. गाई म्हशींच्या एकूण आयुष्यात साधारण ५ ते ६ वीण होईपर्यंत जनावर भाकड होत नाही.

मुंबईत मात्र अशा दूध उडलेल्या गाई-म्हशींची व्यवस्था ठेवली जात नसे. त्यामुळे ही जनावरं मोकाट फिरत असत. कृत्रिम रेतन करण्याची व्यवस्था मुंबईत नव्हती. दोन विणीचे हंगाम होऊन गेल्यावर या जनावरांवर कोणी फारसे लक्ष देत नसल्याने त्यांची रवानगी खाटिकखान्यात होत असे. १९४७-४८ च्या दरम्यान ४६,००० च्या आसपास म्हशी कत्तलखान्यात गेल्याच्या नोंदी इतिहासात बघायला मिळतात. हे जनावर तर जीवानिशी जायचेच, पण त्याचे उरलेले विणीचे हंगाम पण सोबत वाया जायचे. साहजिकच मुंबईत दुधाचा दुष्काळच पडला. 

या समस्येचे निराकरण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मुंबईसाठी “मिल्क कमिशनर” नेमला. या कमिशनरवर मुंबईला पुरेल एवढे दुध पुरवण्याची जबाबदारी होती. यातून जन्माला आली “बॉम्बे मिल्क स्कीम” (BMS). 

पण दुध आणायचे कुठून? गुजरातमधल्या कैरा जिल्ह्यात सरदार पटेल यांच्या प्रेरणेने दुध सोसायट्या १९४५ साली सुरु झाल्या होत्या. या सर्व सोसायट्यांचे दुध मुंबईकडे यायला सुरुवात झाली. यात मेख अशी होती की कैरासारख्या दुध सोसायट्या थेट BMS ला पुरवठा करू शकत नव्हत्या. त्याचे कारण असे की दुध हा नाशवंत पदार्थ आहे. तो टिकून राहण्यासाठी पाश्चरायझेशन करावे लागते. सोसायटीचे सर्व सदस्य अडाणी शेतकरी असल्याने त्यांना पाश्चरायझेशनसारख्या संकल्पना माहिती नव्हत्या. म्हणून सर्व सोसायट्या जमा झालेले दुध ‘पोल्सन’ कंपनीला दुध पुरवायच्या.

पोल्सन पाश्चरायझेशन करून तेच दुध BMS ला द्यायचे. पोल्सनकडे  एकाधिकार असल्याने शेतकऱ्यांना दुधाचे पैसे वेळेवर मिळायचे नाहीत. दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव मिळायचा नाही. त्याखेरीज पोल्सन दुधाला वास येत आहे, दुधात माशा पडल्या आहेत, अशी अनेक कारणं सांगून दुध खरेदी करायचं नाकारायचे. 

पोल्सनची ही मक्तेदारी त्रिभुवनदास पटेल नावाच्या शेतकऱ्याने मोडून काढायचे ठरवले. त्रिभुवनदास पटेल सल्ला घेण्यासाठी वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेले. पटेलांनी एकच वाक्यात सल्ला दिला. तो असा की “पोल्सनने काढी मुको” (पोल्सनला हाकलून द्या).

(त्रिभुवनदास पटेल)

त्रिभुवनदास पटेलने बॉम्बे मिल्क कमिशनरला आग्रह केला की त्यांनी पोल्सनला मध्यस्थ न ठेवता थेट शेतकऱ्यांकडून दूध घ्यावे. तो ब्रिटिश काळ होता, पोल्सन ही देखील ब्रिटीश कंपनी होती. त्यामुळे ब्रिटीश मिल्क कमिशनरने शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावली. यातून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला आणि गुजरातमधले शेतकरी १५ दिवसांच्या संपावर गेले. त्या पंधरवड्यात जमा झालेले सर्व दुध शेतकरी रस्त्यावर फेकून दिले. परिणामी मुंबईत दुधाच्या नावाने ठणठणाट झाला.

बॉम्बे मिल्क कमिशनरने दारा खुरोडी या असिस्टंट कमिशनरला शेतकऱ्यांशी बोलणी करण्यास पाठवले. खुरोडींनी पोल्सनला वगळून थेट सोसायटीतून दुध घेण्याचा सल्ला मिल्क कमिशनरला दिला. नंतरच्या काळात पोल्सन -कैरा सोसायटी- दारा खुरोडी या सर्वांमध्ये अंतर्गत राजकारण सुरु झाले. कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीचे(नंतरचे नाव अमूल) वर्गीस कुरीयन आणि दारा खुरोडी यांच्या कुरबुरीची ती कथा आपण नंतर वाचूच, पण या कुरबुरीतूनच  'आरे मिल्क कॉलनी'चा जन्म झाला.

('आरे मिल्क कॉलनी'च्या उद्घाटनाच्यावेळी जवाहरलाल नेहरू)

गोरेगावच्या जंगलाच्या आत गोठे उभे राहिले, सोळा हजार गायी म्हशींचे पालन सुरु झाले, दूधावर प्रक्रिया करणार्‍या यंत्रणा उभ्या झाल्या. या सर्व कार्याला सुरुवात झाली १९४९ साली. १९६१ साली या कॉलनीचे औपचारिक उदघाटन पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते झाले. तरीसुध्दा दूध पुरेनासे झाले तेव्हा दारा खुरोडींनी दुधाचा एक नवा प्रकार शोधून काढला- तो म्हणजे टोन्ड मिल्क.

टोन्ड मिल्क म्हणजे काय हे समजण्याआधी स्किम्ड मिल्क म्हणजे काय ते बघू या. दुधात स्निग्ध आणि अ-स्निग्ध असे घटक असतात. म्हशीच्या दुधात हे स्निग्ध पदार्थ जास्त असतात. हे काढून घेतल्यावर जे उरते ते स्किम्ड मिल्क. या स्किम्ड मिल्कपासून दूधाची भुकटी तयार होते. दारा खुरोडी यांनी म्हशीचे दूध + पाणी + स्किम्ड दूधाची पावडर यांचे संतुलीत प्रमाण ठरवून त्या मिश्रणाचे दूध बनवले. या दुधात  स्निग्ध पदार्थांचे प्रमाण २ ट्क्क्याच्या आसपास होते. या नव्या दुधामुळे एकूण उपलब्ध दुधाचे प्रमाण तर वाढलेच, आणि सोबत भावही निम्म्यावर आले. सुरुवातीला या दुधाला विरोध झाला. पण त्यानंतर लोकांनी हे दूध स्वीकारले. शुध्द दुधही (निळ्या रंगाचे झाकण) वितरणास उपलब्ध होते, पण ते टोन्ड दुधाच्या (लाल रंगाचे झाकण) दुप्पट भावात असायचे.

(दारा खुरोडी)

महाराष्ट्रात दूधाचे सहकारी तत्वावर वितरण सुरु होईपर्यंत आरे कॉलनीचे दुग्धोत्पादन दिवसाला तीन लाख लिटर पर्यंत पोहचले होते. दुर्भिक्ष्याच्या काळात या खुरोडी फॉर्म्युलाने मुंबईला हात दिला. खुरोडींचा हा फॉर्म्युला कालांतराने युनिसेफने जगभर राबवला. आपले संपूर्ण आयुष्य दूग्धोत्पादन व्यवसायाला वाहून घेतलेल्या दारा खुरोडींचा सन्मान १९६३ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने झाला.  हा पुरस्कार त्यांना कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीच्या डॉ. वर्गीस कुरीयन आणि त्रिभुवन पटेल यांच्यासोबत देण्यात आला. एकाच कार्याला वाहून घेतलेल्या दोन कट्टर विरोधकांना एकाच वेळी एकाच सन्मानाने विभूषित करण्याची ही पहिलीच वेळ होती. म्हणूनच या लेखाच्या शेवटी आपण वाचू या आरेचे दारा खुरोडी आणि कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीचे पटेल आणि कुरीयन यांचे वैर कसे उत्पन्न झाले?

(वर्गीस कुरीयन)

त्रयस्थाच्या नजरेतून बघायचे झाले तर हे वैर निर्माण झाले एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून!! सुरुवातीला मुंबईला दूध गुजराथमधून यायचे. तेव्हा मुंबई आणि गुजराथ वेगळे नव्हतेच. महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायची होती. त्यामुळे एकाच इलाक्यातील दोन पुढार्‍यांचे भांडण जसे असते तसे या कुरबुरीचे स्वरुप होते. दारा खुरोडी सरकारी अधिकारी होते, त्यामुळे त्यांचा तोरा पटेल आणि कुरीयन यांना सहन व्हायचा नाही. पटेल आणि कुरीयन यांच्या मते खुरोडी पोल्सनचे हस्तक होते, तर खुरोडींच्या मते कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटी अडाणी लोकांची गर्दी होती. १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र जन्माला आला आणि हे दोन कट्टर विरोधक वेगवेगळ्या राज्यात गेले. मुंबईत आरे  तर गुजरातमध्ये कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटी आपापले कामकाज करायला लागले.

पण वाचकहो, कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटी रुपांतर आता देशव्यापी 'अमूल' मध्ये झाले आहे, तर एकेकाळी जगातील सगळ्यात मोठी आरे डेअरी मावळण्याच्या बेतात आहे. अमूलची कथा आपण नंतर कधीतरी वाचूच.  पण त्याआधी पुढच्या आठवड्यात आपण वाचू या कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीच्या दूधाच्या भुकटीचा प्रकल्पाची कहाणी!!

सबस्क्राईब करा

* indicates required