computer

'हायकोर्टाचे किस्से'-भाग १-लहरी न्यायाधीश

घटना आहे सन १९९० मधील. आज हयात नसलेले माझे एक कॉलेजपासूनचे वर्गमित्र संजय सुर्ते त्यावेळी हायकोर्टात ‘क्रिमिनल बी ब्रँच’मध्ये नोकरीला होते. फौजदारी प्रकरणे निकाली निघाल्यानंतर पुढील उस्तवार करण्याचे काम या ऑफिसमध्ये चालते. त्यापैकी एक ठराविक काम सुर्ते यांच्याकडे होते. प्रत्येक न्यायाधीशाने दिलेल्या निकालपत्रांचे संकलन करून वर्षअखेर, तारखेच्या क्रमानुसार लावून, त्याचे एक बाईन्डिंग केलेले पुस्तक बनवायचे ही जबाबदारी सुर्ते यांच्याकडे होती. दुपारी जेवणाच्या सुटीत मी संजयकडे गप्पा मारायला जायचो. तो कामाच्या कटकटीने नेहमीच त्रासलेला असायचा. एक दिवस तो खूपच कावलेला दिसला. कारण विचारता त्याने सांगितले की, माझी सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये बदली झाली आहे. पण माझे काम अपूर्ण आहे म्हणून माझा जो रीलिव्हर आहे तो चार्ज घ्यायला तयार नाही.
 

झाले होते असे की, न्या. शरद मनोहर यांनी त्याआधीच्या दोन वर्षांत जामिनाची ७० हून अधिक मॅटर्स एक ओळीचे त्रोटक आदेश देऊन निकाली काढली होती. पण सविस्तर निकाल दिले नव्हते. यामुळे त्या दोन वर्षांची  न्या. मनोहर यांची बाईन्डिंग केलेली फाईल तयार न करता आल्याने संजयला इतर शेकडो निकालपत्रांचे कागद सुट्या स्वरूपात सांभाळावे लागत होते. चुकून त्यातील काही कागद गहाळ होण्याची भीती होती. म्हणूनच संजयचा रीलिव्हर हे सुटे कागद स्वीकारून चार्ज घ्यायला तयार नव्हता. बदलीच्या रूपाने या कटकटीतून सुटण्याची संधी असूनही प्रत्यक्षात सुटका होत नाही म्हणून संजय कावला होता.
एवढा त्रास करून घेण्यापेक्षा तू न्या. मनोहर यांना ‘तुमची अमूक अमूक निकालपत्रे द्यायची राहिली आहेत’ असे का काळवत नाहीस, असे मी संजयला विचारले. पण न्यायालयीन प्रशासनाच्या शिस्तीनुसार असे करता येत नाही, असे संजयचे म्हणणे. मग मीच यात काही तरी करावे या उद्देशाने न्यायालयाच्या रजिस्ट्रारना भेटलो. पण त्यांनीही न्यायमूर्ती महाशयांना ‘निकालपत्रे द्या’, असे सांगणे तर सोडाच पण याचे त्यांना स्मरण करून देण्यासही हतबलता प्रदर्शित केली.
 

जे करायला न्यायालयाचे प्रशासन तयार नव्हते ते मी केले आणि याची बातमी प्रसिद्ध केली. ती  न्या. मनोहर यांनी वाचली व  ‘आपली एवढी जजमेंट द्यायची राहिली आहेत हे मला पेपरमध्ये बातमी आल्यावर कळते. तुम्हाला सांगता येत नाही़?’ असे म्हणून त्यांचे पीए व स्टेनो श्री. जोशी यांनाच धारेवर धरले. त्या सर्व मॅटर्सची ब्रीफं डिपार्टर्मंटमधून मागवून घेण्यास सांगून न्या. मनोहर जोशींना म्हणाले, ‘इथे कोर्टाच्या रोजच्या कामाच्या व्यापात हे राहिलेले काम करायला वेळ मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर माझ्या घरी या. रोज कोर्टात येण्याच्या आधी डिक्टेशन देऊन काम संपवून टाकू’. पुढील दोन दिवसांत त्या सर्व मॅटर्सच्या ब्रिफांचे गठ्ठे न्या. मनोहर यांच्या चेंबरमध्ये हारीन रचून ठेवलेले दिसले.
आधी दिलेल्या बातमीचा ‘फॉलोअप’ घेण्यासाठी आठ-दहा दिवसांनी न्या. मनोहर यांच्या चेंबरमध्ये गेलो तेव्हा जोशी वैतागले दिसले. चौकशी करता त्यांनी काय घडले ते कथन केले. त्याचीही बातमी छापली. 
 

झाले होते ते असे: डोंबिवलीला राहणारे हे जोशी न्या. मनोहर यांनी सांगितल्यानुसार पुढील आठ दिवस रोज, सकाळी सहाची लोकल पकडून, सात-साडेसात वाचता न्या. मनोहर यांच्या मलबार हिलवरील सरकारी निवासस्थानी जात राहिले. पण एकही दिवस ठरल्याप्रमाणे राहिलेल्या निकालपत्रांचे डिक्टेशन दिले गेले नाही. एक दिवस काय म्हणे तर ‘हिज लॉर्डशिप’ ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते ते साडे आठनंतर घरी आले. जोशींना पाहिल्यावर त्यांना बोलावल्याची आठवण होऊन न्यायमूर्तींनी खुलासा केला की, त्याच इमारतीत राहणारे इतर न्यायाधीश भेटले व त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ गेला. आणखी एक दिवस जोशी गेले तेव्हा न्यायमर्ती गाण्याचा रियाझ करत बसले होते! घरातील नोकर काही साहेबांना ‘डिस्टर्ब’ करायला तयार होईना. थोडक्यात, ते आठ दिवस काम काही झाले नाही व जोशी, साहेबांच्या घरीच नाश्टा करून त्यांच्यासोबतच कोर्टात येत राहिले !!
 

यानंतर काही महिन्यांनी हायकोर्टातील पाच न्यायाधीशांविरुद्ध वकील संघटनांनी अविश्वासाचे ठराव करण्याची अभूतपूर्व घटना घडली. यात न्या. मनोहर यांच्याही समावेश होता. सुरुवातीस वकिलांचा रोष शांत करण्यासाठी, मुख्य न्यायाधीशांनी या पाचही न्यायाधीशांकडून सर्व न्यायालयीन काम काढून घेतले. काही दिवसांनी न्या. मनोहर वगळून बाकी चार न्यायाधीशांच्या अन्य हायकोर्टांत बदल्या केल्या गेल्या. न्या. मनोहर यांना निवृत्त व्हायला काही महिने शिल्लक होते. तोपर्यंतच्या मधल्या काळात त्यांनी चेंबरमध्ये बसून त्या राहिलेल्या निकालपत्रांचे डिक्टेशन देण्याचे काम पूर्ण केले आणि आमचा मित्र संजय बदलीच्या ठिकाणी सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये रुजू व्हायला मोकळा झाला!
आज न्या. मनोहर हयात नाहीत. अशा नोकरीला कंटाळलेल्या जोशींनी पुढे वकिलीची पदवी घेतली व ते आता ठाणे व मुंबईत वकिली करतात. पण या सर्व प्रकरणातून माझी न्या. मनोहर यांच्याशी चांगली दोस्ती झाली.

लेखक:अजित गोविंद गोगटे
व्यवसाय: निवृत्त पत्रकार (लोकसत्ता,मुंबई-२९ वर्षे आणि लोकमत, मुंबई १० वर्षे)
विशेष प्राविण्य: कायदा आणि न्यायालये यासंबंधीची पत्रकारिता. 

सबस्क्राईब करा

* indicates required