भारतातल्या आदिवासी समाजातला मुलगा युकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर कसा झाला? वाचा त्याची यशोगाथा !!

जात, रंग, वर्ण सोडून माणुसकी हाच सर्वात वरचा धर्म आहे. हे सर्वांना माहिती आहे, पण ते किती पाळलं जातं? अजूनही अनेक ठिकाणी वर्णद्वेष केला जातो. खालच्या जातीचा म्हणून हिणवलं जातं. त्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवलं जातं. असाच एक केरळमधील आदिवासी समाजातला मुलगा, अतिशय हालाखीच्या परिस्थितीत असूनही स्वतःला संगणक अभियंता (सॉफ्टवेअर इंजिनीअर) म्हणून कसा सिद्ध करतो याची कहाणी पाहुयात.
बिनेश बालन हा आदिवासी समाजातला मुलगा. आर्थिक संघर्ष हा लहानपणापासूनच पाचवीला पुजलेला. शाळेत कायम हीन वागणूक दिली जायची. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागायचे नाही. कसं बसं पास होऊन पुढच्या वर्गात जायचं. घरात दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. साधा भातही नसल्यामुळे फणसाच्या बिया खाऊन पोट भरायचे. शाळेत मुलं आणि शिक्षक खूप चिडवायचे, "शाळा सोडून मजुरी कर" असा सल्ला दिला जायचा.
अश्यातच सातवीत असताना तो एक मित्राबरोबर व्हिडिओ गेम खेळायला इंटरनेट कॅफेमध्ये गेला. तिथे बिनेशची संगणकाशी पहिल्यांदा ओळख झाली. बिनेशला त्याबद्दल खूप कुतूहल वाटले. त्याला संगणकावर सगळं शिकून घायचे होते. त्याने त्याबद्दल सगळी चौकशी केली. त्याने संगणकाची माहिती गोळा करायला सुरुवात केली. बरीच पुस्तके वाचली त्यामधून त्याला Programming Language बद्दल कळले. त्याने कॉम्पुटर Languageचा सराव केला. त्यात हळूहळू तो पारंगत झाला. बऱ्याच ऑनलाइन परीक्षेमध्ये त्याने उत्तम गुण मिळवले. त्याचे संगणक कौशल्य बघून काही शिक्षकांनीही त्याची मदत मागितली. पुढे त्याने अर्थशास्त्राची (Developmental Economics) पदवी घेऊन एमबीए पूर्ण केले.
पदवी अभ्यास करतानाच त्याला ससेक्स विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाली. त्यासाठी बिनेश युकेला गेला. शिष्यवृत्तीची रक्कम पुरेशी मिळत नसल्यामुळे त्याला ससेक्समध्ये सकाळी १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत सफाई कामगार म्हणून काम करावे लागले.
नंतर बिनेशने नेदरलँड्स (हॉलंड) येथील ॲमस्टरडॅम विद्यापीठात संशोधक म्हणून काम सुरू केले. तिथे बिनेशने वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी ओपन बँकिंग सॉफ्टवेअर बनवले. ते खूप यशस्वी ठरले. नुकतेच याचे अँप लाँच झाले आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्याचे हे यश खरंच प्रेरणादायी असेच आहे.
प्रतिकूल परिस्थतीमुळे हार न मानता जे यश प्राप्त होते ते जास्त मौल्यवान असते. बिनेश बालनला पुढच्या वाटचालीसाठी बोभाटाच्या शुभेच्छा.
लेखिका: शीतल दरंदळे