सुएझ कालव्यात ट्राफिक जॅम करणारं हे जहाज आहे तरी काय?

आजपर्यंत तुम्ही एक मोठ्या कंटेनर ट्रकमुळे महामार्ग अडलेला आणि त्यामुळे झालेले ट्राफिक जॅमबद्दल ऐकले असेल. तो मोठा ट्रक असा काही रस्त्याच्या मध्येच बंद पडतो किंवा अडकतो की मागे वाहनांच्या रांगा लागतात आणि प्रवासी तासनतास खोळंबतात.हे झाले रस्त्यांवर!! पण समुद्रात असं ट्राफिक जॅम झालेले तुम्ही कधी ऐकले आहे काय? होय! असे खरोखर झाले आहे. चीनहून नेदरलँडसच्या दिशेने जाणारे मालवाहतूक करणारे अवाढव्य जहाज सुएझच्या कालव्यात अडकले आहे. यामुळे समुद्रात जहाज कोंडी झाली असून मालवाहतूक करणारी अनेक जहाजे समुद्रात खोळंबली आहेत.
नक्की काय घडलं आहे हे जाणून घेऊया.
सुएझ कालवा हा १९३.३ किमी लांबीचा असून भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला हा कालवा जोडतो. मंगळवारी सुएज कालवा पार करताना एवरग्रिन नावाचे भले मोठे कंटेनर जहाज अडकून पडले. हे जहाज पनामा देशात रजिस्टर केलेले आहे आणि ते एव्हरग्रीन कंपनीद्वारे चालवले जाते. या जहाजाची लांबी तब्बल ४०० मीटर लांब, तर रुंदी ५९ मीटर आहे. हे अडकलेले जहाज हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या कामात मोठ्या प्रमाणात टग बोट्स मदतीला आल्या आहेत. टग बोट म्हणजे जहाजाला धक्का देणाऱ्या बोट्स. तिथे वाऱ्याचा वेग इतका जोरदार आहे की जहाज हलवण्यास खूप वेळ लागत आहे.
सुएज कालवामार्ग हा जगातील गजबजलेल्या जलमार्गांपैकी एक आहे. अरेबियन आखाती देशांतील खनिज तेल युरोपकडे नेण्यासाठी हा मार्ग अनेक तेलवाहू जहाज वापरतात. त्यामुळे हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून प्रवास करण्याचा हिशोब काढला तर तो ताशी तब्बल ४००मिलियन डॉलर म्हणजे २९०० रुपये कोटी इतका आहे. याचा अर्थ जहाज अडकल्याने २९०० रुपये कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. २०२० या एका वर्षांत इजिप्त सरकारने या कालव्याद्वारे ५ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावले आहे. २०१० सालापासून कालव्यातून दररोज ४७ जहाजे जातात.

एव्हरग्रीन या जहाजाच्या चालकांनी सांगितले की, सुएझ कालवा पार करत असताना एक मोठे वादळ आले. त्यामुळे जहाजाची दिशा बदलली. जहाजाची दिशा परत फिरवण्याचा प्रयत्न करताना हे जहाज अडकले. आता अनेक प्रयत्नांनी हे जहाज हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत इतर जहाजांना दुसऱ्या मार्गाने वळवता येईल काय हा प्रयत्न सुरू आहे.
ही जहाज कोंडी कशी सुटते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.
लेखिका: शीतल दरंदळे