computer

समजून घ्या सुएझ कॅनॉलची समस्या: दर्यावर्दी बाळासाहेब पाटोळे यांच्याकडून !!

आता हे सर्वश्रुतच आहे की जगातील अत्यंत जुनी, प्रचंड मोठी आणि पूर्वापार चालत आलेली विश्वसनीय अशी जर सामान वाहतूक व्यवस्था कोणती असेल तर ते ती म्हणजे (सागरी) जलमार्गे वाहतूक व्यवस्था. आणि अशी व्यवस्था मग जागतिक होण्यास असा कितीसा कालावधी लागला असेल? आज जगात लाखो जहाजे आणि करोडो खलाशी या कामात शेकडो वर्षपासून व्यस्त आहेत आणि प्रत्येक देशात शेकडो कंपन्या या व्यवसायात कार्यरत आहेत.

जलमार्गे वाहतुकीचे फायदे म्हणजे एकतर सुरक्षित मार्ग असतो, दुसरा फायदा म्हणजे त्या त्या सामानानुसार तशी विशिष्ट जहाजे उपलब्ध असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अफाट अश्या क्वांटीटी मध्ये अगदी माफक भाड्यात वाहतूक सहज शक्य असते. हवाईमार्गे ही वाहतूक शक्य असते,  आहे, पण त्याची वाहक क्षमता छोटी आणि भाडे जास्त असे असते. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर जलमार्गे वाहतूक हीच जास्ती वापरात आणि सहजमान्य आहे.

पृथ्वीवरील समुद्र आणि भुखंडांचा विचार केल्यास जवळपास सगळे खंड अगदी विनासायास आपापसांत समुद्राने जोडले गेलेले आहेत, समुद्र मार्ग हा कांही खोदून किंवा बांधकाम करून तयार करावा लागत नाही त्यामुळे इथं असंख्य मार्ग उपलब्द्ध आहेत. पण जर आशियातुन अमेरिका किंवा उत्तर युरोपला जायचे असेल तर संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जायला लागणार. हा वळसा घातल्याने काय होते ते पाहू.

एक सामान्य जहाज गृहीत धरता..

१. आफ्रिका खंडाला वळसा घालण्यासाठी किमान १० ते कमाल १५ दिवस अधिक लागतात.

२. या अधिक दिवसात जहाजाचा इंधनाचा अफाट खर्च अधिक सोसावा लागतो.

३. या कालावधीत जहाजातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा एकूण पगार करोडच्या आसपास जातो.

४. या अधिक कालावधीत इतर दुसरे भाडे घेता येत नाही.

हे आणि इतर अनेक मुद्दे गृहीत धरल्यास हे 15 दिवस म्हणजे वेळ आणि पैश्याचा अपव्यय आहे.

मग याला ईलाज काय???

आहे तर........ आणि तो ईलाज शोधला होता इसवी सन पूर्व १८७४ मध्ये इजिप्तचा राजा सेनाऊसरात ३ याने (हा मुद्दा थोडा वादातीत आहे). इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र (भूमध्य समुद्र) आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉलची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉलच्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि नैसर्गिक अडचणी यात हा प्रोजेक्ट शेकडो वर्षे बनवण्याच्या प्रक्रियेत अडकून होता.

इजिप्त आणि इस्रायल या देशाचा याच्या मालकीवरून वाद आणि लढाई ही नेहमीची बाब आहे. पण शेवटी इजिप्शियन ऑथोरिटी आणि कांही विदेशी कंपनी यांनी मिळून हा प्रोजेक्ट १७ नोव्हेंबर १८६९ रोजी पूर्ण करून व्यावसायिक वाहतुकीसाठी खुला केला. सुएझ कॅनॉलची एकूण लांबी १९३.३ किलोमीटर इतकी अफाट आहे. तर रुंदी ६० मीटर आहे. हा कॅनॉल क्रॉस करणयास एका सामान्य गतीच्या जहाजाला किमान १२ तास लागतात.

या १९३ किलोमीटर च्या लांबीत मध्ये ३ छोटे मोठे नैसर्गिक तलाव (सरोवर) ही आहेत. त्या तलावांना गृहीत धरूनच कॅनॉलचे खोदकाम करण्यात आले आहे. जगातील एकूण समुद्री वाहतुकीच्या १० टक्के वाहतूक ही सुएझ कॅनॉल मधून होत असते. दिवसाला सरासरी ५० ते ६० जहाजे इथून क्रॉस होतात. वाहतूक रात्रंदिवस चालू असते. कॅनॉलची रुंदीही अशी आहे की दोन्ही दिशेने एकाच वेळी वाहतूक चालू असते. या कॅनॉलची पाण्याची खोली गृहीत धरूनच जहाज पूर्ण क्षमतेने भरलेलं असताना यातून जाईल किंवा नाही याचं गणित आखून जहाजे बनवली जातात. यांनाच आम्ही सुएझ मॅक्स जहाजे म्हणतो. अगदी हाच नियम पनामा कॅनॉल ला ही लागू पडतो मात्र त्याची आकडेवारी आणि भौगोलिक परिस्थिती सुएझ कॅनॉल पेक्षा अतिशय भिन्न आहे.

सुएझ मॅक्स जहाजात खालील व्यवस्था या कायमस्वरूपी केलेल्या असतात..

१. सुएझ कॅनॉल लाईट (भलामोठा 2000 वॅट चा फोकस लाईट)

२. सुएझ कॅनॉल क्रू केबिन

सुएझ क्रॉस करण्यासाठी करोडो रुपये फी आकारली जाते आणि तो क्रॉस करताना खालील गोष्टी ह्या केल्याच जातात...

सुएझ क्रॉस करताना सुएझ ऑथोरिटीचे अधिकारी आणि क्रू जहाजात येतात, जहाज पूर्णतः त्यांच्या ताब्यात दिले जाते. जहाज सुएझ ला पोचण्याआधी 24 तास त्यांनी पाठवलेल्या चेकलिस्ट नुसारच अत्यावश्यक असणाऱ्या मशिनरी चालवून ट्रायल घेऊन सुस्थितीत असल्याचे ग्वाही पत्र कॅप्टन तिकडे पाठवतो. सुएझ कॅनॉल लाईट सुएझ कडे येण्याआधीच जहाजातील कर्मचारी लावून तयार करून ट्रायल घेऊन ठेवतात. ती लाईट ऑपरेट करण्यासाठी सुएझ कॅनॉलचाच एक अतिरिक्त असा इलेक्ट्रिशियन जहाजात आलेला असतो तसेच सोबत चार सुएझ क्रू फायबरची लहान यांत्रिक होडी घेऊनच जहाजात आपत्कालीन व्यवस्था म्हणून आलेले असतात. एखादया वेळेस जहाज बंद पडलेच तर ताबडतोब ती लहान बोट पाण्यात उतरवून बंद पडलेली जहाज कडेला घेऊन बांधता यावी हा त्यामागचा उद्देश असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जहाज चालवण्यासाठी विशेष ट्रेनिंग घेतलेला सुएझ कॅनॉल औथोरिटीचाच पायलट ही आलेला असतो आणि जहाज पूर्णतः सुएझ क्रॉस होईपर्यंत टेक्निकली त्याच्याच ताब्यात असते. जहाजाचे स्पीड आणि दिशा नियंत्रण हे ही तोच करत असतो.

आणि याच कारणांमुळे जहाज क्रॉस करवून देण्यासाठी भरमसाठ फी आकारली जाते.

आता थोडं माझ्या स्वतःच्या याच कॅनॉलच्या अनुभवा विषयी बोलू.

साल २००६, नोकरीची १० वर्षे पूर्ण झालेली. या १० वर्षाच्या काळात बऱ्याच विविध प्रकारच्या जहाजात काम केलं होतं. आता मात्र केमिकल कॅरीअर जहाज मिळाले होते. ते जहाज मोरोक्को ते भारत अश्या रन मध्ये होते त्यामुळे साहजिकच सुएझ कॅनॉल क्रॉस करणे क्रमप्राप्तच होते. १९९८ साली मी पहिल्यांदा आणि त्यानंतर बऱ्याच वेळेस सुएझ क्रॉस केला होताच, त्यामुळे ती सर्व प्रक्रिया अगदी मुळात माहीत होती.

सुएझ क्रॉस करून मोरोक्कोला पोचलो आणि केमिकल लोड करून भारतासाठी निघालो. २४ तास आधी सुएझच्या चेकलिस्ट नुसार सर्वकांही चेक केले आणि जहाजात सर्व सुस्थितीत असल्याचे कळवले गेले.

पण.......

कॅनॉलच्या पोर्ट साईड या भागात पोचायच्या फक्त १० तास आधी दोन पैकी एक जनरेटर अगदीच निकामी झाले. म्हणजे आमच्याकडे आता पॉवरची अतिरिक्त व्यवस्था अजिबात नव्हती.

हे सर्व कंपनीला आणि त्यानंतर सुएझ ऑथोरिटीला कळवण्यात आले. आमचं मुंबई ऑफिस हादरून गेलेलं. जहाज पोर्ट साईड ला पोचताच जहाजाला सुरक्षित जागी हलवून पार्क करण्यात आले. आणि अश्या अवस्थेत जहाज क्रॉस करण्यास असमर्थ असल्याचेही सांगण्यात आले. कारण सुएझ क्रॉस करताना एकमेव चालू असणारे जनरेटर जर कांही कारणाने बंद पडले तर जहाज थेट कोणत्या तरी कडेवर किंवा समोरच्या जहाजवर जाऊन धडक मारणार.

मुंबईहून आमचे बॉस थेट इजिप्तला जहाजात पोचले. जनरेटर दुरुस्तीच्या पलीकडे खराब झाले होते. जहाज भारतात आणणे अनिवार्य होते, कारण कार्गो जहाजात अडकला होता. यावर उपाय म्हणूम सुएझ औथोरिटी ने एक सल्ला दिला की ठराविक रक्कम भरून आमच्याकडून मदत घ्या आणि जहाज क्रॉस करवून घ्या. ती मदत म्हणजे दोन छोटे टग बोट (आकाराने छोट्या पण ताकदीने भरपूर अश्या वजन ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी) भाड्याने घ्यायच्या, जहाजाला मागे एक आणि पुढे एक लावायची आणि जहाज ओढत सुएझ क्रॉस करायचे.

त्याची फी ऐकून आमचा बॉस जागच्या जागी थंडगार झाला. त्याला कांही सुचेना. मग चीफ इंजिनिअर आणि त्यांनी मिळून एक आयडिया काढली, की आपल्या जहाजाच्या कपॅसिटीचे जनरेटर भाड्याने आणायचे आणि डेक वर ठेऊन त्याचा सप्लाय इंजिन रूमला न्यायचा.

एका दिवसात ती ही सोय झाली. जनरेटर बसवण्यापासून केबल लावण्यापर्यंत आणि उपलब्ध सप्लायचे टेस्टिंग मी स्वतः माझ्या देखरेखीखाली करून घेतलं, कारण जहाजाचा एकमेव असा इलेक्ट्रिकल इंजिनीअर मीच.

आम्ही सगळे आनंदात की आता समस्या संपली. हे सर्व तयार झाल्यावर सुएझ औथोरिटीला पाहण्यास आणि पास करण्यास बोलावण्यात आले. त्यांना ते ठीक वाटले पण आवडले नाही आणि त्यांनी ते रिजेक्ट केले.... कारण त्यांचं म्हणणं होतं, की जहाजाचे हे एकमेव जनरेटर जहाज क्रॉसिंग होत असताना कांही कारणास्तव बंद पडले तर हे डेक वरचे जनरेटर ऑटोमॅटिक चालू व्हायला पाहिजे. दुर्दैवाने ते जनरेटर फक्त बटन स्टार्टच होते पण ऑटोमॅटिक स्टार्ट ची सोय अजिबात नव्हती.

आता पुन्हा पंचाईत...

आमचे बॉस लोकल एजंटला सांगून असा टेक्निशियन शोधायला लागले. दोन दिवस गेले तरी इजिप्तच्या या भागात तसा कोणी मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी मी मग न राहवून ही जबाबदारी माझ्यावर घेतली. आणि मुंबईच्या बॉस ला कागदावर ड्रॉईंग काढून माझी आयडिया समजावून सांगितली. त्याला ती खूप आवडली. मग मी माझ्या याच ड्रॉईंगनुसार वर्कशॉप मध्ये टेस्ट सर्किट बनवले आणि लाईट गेल्या गेल्या फक्त ५ सेकंदात दुसरी पावर कशी ऑन होते याचं प्रात्यक्षिक दाखवले. हे टेस्टिंग यशस्वी झाले आणि मग रात्री ११ वाजता ते सर्किट जनरेटरला जोडण्यास मी उभा राहिलो. रात्री ३ वाजता सर्किट जोडून तयार झाले. आणि मग टेस्टिंग साठी पुन्हा बॉसला उठवून आणले. जहाजाची लाईट गेल्या गेल्या पाच सेकंदात हे बाहेरचे जनरेटर चालू झाले आणि काय तो इतका मोठा हुद्याचा बॉस अगदी लहान मुलासारखा मला आलिंगन देत अक्षरशः नाचला.

'यार इतना टेलेनटेड इलेक्ट्रिकल इंजिनीअर मैने अपनी करीअर मे पहली बार देखा है' हे त्याचं वाक्य आजही माझ्या कानात जसेच्या तसे घुमते.

'अरे साब आपने मेरा हाल्फ मिलियन (५ लाख) डॉलर बचाया है' असं ही ते म्हणाले. आणि मग मला कळले की त्याकाळी मी हे काम करून कंपनीचे ३ करोडचे होणारे नुकसान वाचवले होते.

याच मी बनवलेल्या सिस्टम वर आम्ही सुएझ कॅनॉल अगदी यशस्वीरीत्या क्रॉस केला. आणि सुएझ क्रॉस झाल्यावर ते जनरेटर पुन्हा काढून नेण्यात आले आणि बॉस ही तेथून थेट अगदी आनंदाने आणि अभिमानाने  मुंबईला विमानाने गेले. एकच जनरेटर वर आम्ही भारतात पोचलो.

जहाज मेंगलोरला पोचले तर तेच बॉस दोन रिपेअर कंपनीचे प्रतिनिधी घेऊन आमच्या आधी मेंगलोरला पोचले होते. विमानात प्रवासात त्यानी माझी इतकी प्रशंसा या लोकांकडे केली होती की ते लोक जहाजात आल्या आल्या कॅप्टनला न भेटता थेट माझ्या केबिनमध्ये आले आणि साहेब तुमच्या कामावर किती फिदा झालेत याचे पाढेच वाचू लागले. हा क्षण माझ्या त्यावेळपर्यंतच्या करिअरमधील उच्च आणि अभिमानाचा क्षण होता. पुढे दोनच महिन्यात या बॉस ने माझी शिफारस केली आणि २००७ मध्ये माझी थेट LNG गॅस वाहक जहाजात नेमणूकही बक्षीस स्वरूपात करण्यात आली आणि तेंव्हापासून आजतागायत मी याच LNG फिल्डमध्ये एक स्पेशालिस्ट म्हणून फेमस आहे. त्यामुळे या सुएझ कॅनॉल चा माझ्या कारकिर्दीत एक वेगळा आणि अभिमान वाटण्यासारखा सहभाग आहे. या नंतरही इतर जहाजांत बरेच प्रॉब्लेम सोल्व केले आहेत पण वरील प्रॉब्लेम सोलविंग ने माझं करिअर वेगळ्या आणि अद्भुत वाटेवर नेले.

(LNG)

आता थोडं या मागील कांही दिवसापूर्वी झालेल्या अपघाताबद्दल बोलू.

जसे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सुएझ कॅनॉल क्रॉस होताना जहाज हे पूर्णतः कॅनॉल औथोरिटीच्या स्वाधीन असते त्यामुळे नेमकं त्यावेळी त्या जहाजातील कर्मचाऱ्यांची चुकी असण्याची शक्यता फार कमी आहे.

माझ्या अंतर्गत माहितीनुसार त्या जहाजाची स्टेअरिंग सिस्टम फेल झाली होती. यासाठी मात्र जहाजातील कर्मचारी हे वेळच्या वेळी होणाऱ्या देखभालीत कमी पडले असावेत किंवा कंपनीने अपेक्षित असणारे स्पेअर पार्ट किंवा बाहेरची मदत वेळेत उपलब्ध करून दिली नसावी. याला आपण ह्यूमन एरर म्हणतो. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे वरतीपैकी कोणाचीही चूक नसतानाही यंत्र हे कधीही बंद पडू शकते आणि तसे होणे किंवा त्याला त्याचवेळी थांबवणे हे किमान मनुष्यजातीला शक्य नाही आणि यालाच आपण मशिनरी फेलूर म्हणतो.

जे कांही घडलंय ते कांही दिवसाच्या चौकशी नंतर कळेलच पण या अपघाताने कितीतरी लोकांना सुएझ कॅनॉल ही कुठंतरी आहे आणि त्याने जागतिक दर्जाची वाहतूक बंदी केली हे मात्र कळून गेले हे बाकी नक्की.

पुढील पोस्ट ही पनामा कॅनॉल बद्दल असेल आणि अगदी मनातून सांगतो त्या कॅनॉलबद्दलची माहिती अगदी तोंडात बोट घालून आणि डोक्यात शॉट घेत घेत वाचण्यासारखीच आहे.

चला मग कळले ना सुएझ कॅनॉल काय आहे आणि त्याने काय होते?

 

माझं नाव : बाळासाहेब हिंदुराव पाटोळे

पद : इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर

कंपनी : के लाईन शिपिंग कंपनी, टोकियो जपान.

मुळगाव : कोल्हापूर, महाराष्ट्र.

सध्या वास्तव्य: टोकियो, जपान.

 

गेली २५ वर्षे जहाजात कार्यरत असुन समुद्र किनारा असलेले जवळपास सर्व देश फिरून झाले आहेत. इतक्या दीर्घ कार्यकालीन सेवेत असे बरेच चांगले वाईट अनुभव घेतले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required