computer

तालकडू : वाळवंटात गाडल्या गेलेल्या मंदिरांचं शहर....

अंदाजे १००० वर्षांपूर्वी दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यात पश्चिम गंग वंशाचे राजे राज्य करत होते. कावेरी नदीच्या काठी वसलेले तालकडू शहर हे पश्चिम गंग वंशाचे राजधानीचे शहर होते.

म्हैसूर शहरापासून हे शहर ४५ किलोमीटर लांब असून या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी भरभराटीला आलेल्या ह्या शहरात जवळपास ३० मंदिरे होती. पण अचानक बदललेल्या कावेरी नदीच्या प्रवाहामुळे हे शहर वाळवंटात बदलले. परंतु आजही लोकांना असे वाटते की या मागे एक शाप आहे.

इसविसन ३४५ सालात पश्चिम गंग वंशाचा राजा हरीवर्मन याची राजधानी तालाकडू होती. तालाकडू शहराचे नाव कसे ठेवले गेले याबद्दल माहिती मिळालेली नाही, पण स्थानिक लोक त्याबद्दल एक आख्यायिका सांगतात. आख्यायिकेप्रमाणे दोन जुळे भाऊ होते ताल आणि कडू. ते लाकूडतोड्याचे काम करत असत. एके दिवशी असेच ते एक झाड तोडत होते, झाड तोडल्यानंतर त्यांनी पाहिले की दोन हत्ती येऊन तेथे प्रार्थना करत होते. तोडलेल्या झाडाजवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना शंकराची प्रतिमा दिसली आणि ते हत्ती नसून साधू होते. काहीतरी चमत्कार घडल्यासारखे ते झाड परत जागेवर उभे राहिले आणि त्याठिकाणी तालाकडू शहराची निर्मिती झाली.

इसविसन १००० मध्ये चोळ राजांनी पश्चिम गंग वंशाचा पराभव केला आणि राजधानीचे नाव बदलून राजराजापूर असे ठेवले.

नंतर इसविसन १११७ मध्ये राजा विष्णूवर्धन याने चोळांचा पराभव करून ते शहर जिंकले आणि त्याचे परत नाव बदलून तालाकडूगोंडा असे ठेवले. तिथे राजा विष्णूवर्धन याने किर्तीनारायण मंदिर उभारले.

सतराव्या शतकात कावेरी नदीचा प्रवाह बदलायला सुरुवात झाली आणि पूर्ण शहर वाळूखाली दबून गेले. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार असे होण्याचे कारण म्हणजे चौदाव्या शतकात तालाकडू शहराच्या उत्तरेस कावेरी नदीवर एक धरण बांधले गेले. या धरणामुळे नदी पात्र उथळ झाले आणि नदीपात्रातील वाळू दिसायला सुरुवात झाली. दक्षिण-पश्चिम वाऱ्यामुळे ही वाळू उडून जून्या तालाकडू शहरावर पसरू लागली.

पुढच्या दोनशे वर्षापर्यंत ही वाळू तालाकडू शहरावर पसरत राहिली आणि या अचानक आलेल्या संकटामुळे कंटाळून तालाकडू शहरातील लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. त्यातूनच नवीन तालाकडू शहराची निर्मिती झाली. जुन्या तालाकडू शहराची प्रतिकृती असलेले हे शहर आता हॉर्टीकल्चरमध्ये म्हणजे फुलांच्या शेतीत आणि वाइन बनवण्यात प्रगती करत आहे.‌

तालाकडू आता उत्कृष्ट प्रतीची वाईन, अर्टीसन चीज, ताजे पारंपारिक खाद्यपदार्थ आणि वेगवेगळ्या पाककृतींसाठी प्रसिद्ध आहे. त्याला बंगळूर शहराची गोरमेट व्हॅली असे म्हणले जाते.

पण शेवटी वाळू उडून शहरावर कशी पसरली गेली आणि संपूर्ण शहर वाळूत कसे बुडून गेले, हे अद्याप कुणीही सिद्ध करू शकले नाही. स्थानिक तिथल्या दांतकथेप्रमाणे एका शापामुळे पूर्ण शहर वाळूखाली गेले आहे.

झाले असे की सतराव्या शतकात, विजयनगर साम्राज्याचा राजा तिरुमला राय तालाकडू शहरातील वैद्येश्वर मंदिरात दर्शनासाठी आला. नवसाला पावणारा देव आणि आजार बरे करणारा देव असा या देवाचा लौकिक होता.

आपला असाध्य आजार बरा करून घेण्यासाठी तिरुमला राय यांनी वैद्येश्वराला प्रार्थना केली. नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी तालाकडू शहराचा कार्यभार आपली पत्नी अल्मेलाम्मा हिच्यावर सोपवला आणि ते निघून गेले.  ही संधी साधून राजा तिरुमला राय याचा मांडलिक असलेला म्हैसूरचा राजा वडियार याने अल्मेलाम्मावर आक्रमण केले. राजा वडियारच्या गुंड सैनिकांपासून पळून जाताना ती कावेरी नदीच्या किनाऱ्यावर पोचली. त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने कावेरी नदीत उडी मारली. बुडता बुडता तिने तीन वाक्यात शाप दिला.

"तालाकडू शहराचे वाळवंट होईल, ह्या नदीत भोवरा तयार होईल, आणि म्हैसूरच्या राजाचा निर्वंश होईल."

ह्या भविष्यवाणीमुळे तालाकडू शहराचे वाळवंटात रूपांतर झाले आणि वडीयार राजाचा निर्वंश झाला. त्याचा एकुलता एक मुलगा वारला आणि त्याच्या राज्यासाठी कुणीही वारस उरला नाही.

वडीयार राजाला पश्चाताप झाला आणि प्रायश्चित म्हणून त्याने अलामेलम्माची सोन्याची प्रतिमा महालात स्थापित केली. तिची देवता म्हणून पूजा केली. म्हैसूरच्या महालात अजूनही अलामेलम्माची सोन्याची प्रतिमा पाहायला मिळते.

तर अशी होती वाळवंटात हरवलेल्या तालाकडू शहराची गोष्ट. दंतकथेवर तुमचा विश्वास नसला तरी वाळूने संपूर्ण शहर गिळंकृत करण्याचं गूढ नक्कीच अभ्यासण्यासारखं आहे.

 

लेखिका: क्षमा कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required